लेख – महाराष्ट्राभिमान म्हणजे काय?

>> योगेंद्र ठाकूर

मराठी माणसाच्या अंगी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांचे थोडक्यात वर्णन थोर साहित्यिक, पत्रकार आणि संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचे एक अग्रणी आचार्य अत्रे यांनी आपल्या ‘नवयुग’ अंकातील एका लेखात असे केले आहे. ‘‘मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान आणि बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. तत्त्वासाठी आणि ध्येयासाठी तो वाटेल ते मोल द्यावयाला तयार होईल. देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्याचा जणू काही त्याने विडाच उचललेला आहे. सिंहाच्या गुहेत जाऊन त्याच्या दाढेत हात घालण्याची त्याला विलक्षण हौस. शत्रूला नि मृत्यूला भिणे म्हणजे काय हे त्याला मुळी माहीतच नाही.’’ महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जे जे महापुरुष होऊन गेले, त्या सर्वांच्या चारित्र्यांमधून आणि कार्यातून या मराठी बाण्याचे यथार्थ दर्शन आपल्याला घडते.

…तर न्या. गोविंद महादेव रानडे म्हणतात की, ‘‘आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवाजी महाराज सापडले हे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे संकट होय.’’ कारण समजा त्याप्रसंगी महाराजांच्या जिवाला काही बरे-वाईट झाले असते तर मराठी स्वराज्याची सारी इमारतच रसातळाला गेली असती आणि महाराष्ट्र कायमचा पारतंत्र्याच्या गर्तेत जाऊन पडला असता. पण औरंगजेबाच्या रूपाने मृत्यूसमोर अक्राळविक्राळ जबडा आ वासून बसला असताना शिवाजी महाराजांनी त्याच्या दरबारात त्याच्या तोंडावर त्याला आव्हान द्यायला कमी केले नाही. त्यांनी मराठी बाण्याची चुणूक दाखवली.

मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा जो रामसिंग त्याच्याबरोबर शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले असता त्यांचा अपमान करण्यासाठी औरंगजेबाने त्यांना मागच्या रांगेत उभे केले. तेव्हा शिवाजी महाराज एखाद्या सिंहाप्रमाणे रामसिंगावर कडाडले. ‘‘मी कोण आहे ते तुम्हाला माहीत आहे. तुमच्या वडिलांना माहीत आहे. तुमच्या बादशहाला माहीत आहे. तरीही तुम्ही मला सर्वांच्या नंतर इतक्या मागे मुद्दाम उभे केले. तुमची ही मनसब मी फेकून देतो. तुमची खिलात मला नको. बादशहा मुद्दाम ज्याअर्थी मला जसवंतसिंगांनंतर बसवतोय त्याअर्थी मला त्याची मनसब नको आहे. मला त्याची चाकरी नको. मला ठार करा. तुरुंगात टाका, काय वाटेल ते करा. बादशहाची खिलात मी कधी घालणार नाही’’ असे म्हणून शिवाजी महाराज ताडकन् उठले नि बादशहाकडे पाठ फिरवून चालते झाले. यालाच मराठी बाणा आणि महाराष्ट्राभिमान म्हणतात.

1857 सालच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे नेते नानासाहेब पेशवे यांना पकडून आणण्यासाठी इंग्रजांनी जाहीर फर्मान काढले. तेव्हा त्यांना उद्देशून नानासाहेबांनी इंग्रजांना छातीठोकपणे सांगितले की, ‘‘पुन्हा आपण रणांगणातच भेटू. तुमच्या रक्ताच्या नद्या वाहतील. गुडघ्याइतका लोंढा वाहील. मी तर प्राणांवर उदार झालोच आहे. मी एकटा बलाढ्य इंग्रजांचा शत्रू म्हणून उभा आहे. त्यातच मला समाधान आहे. मृत्यू हा कधी तरी येणारच. मला भय ते कसले? जे लोक आज तुमचे म्हणून आहेत, तेच तुमच्यावर उलटतील आणि तुम्हाला ठार करतील. मृत्यू कधी तरी येणारच, तर मी अपमानाने का मरावे? माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्याशी लढणारच. मी मारला जावो. मी जे जे करीन ते तलवारीनेच करीन!’’

संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या वेळी डॉ. सी. डी. देशमुख यांनी मराठी बाण्याची धार तत्कालीन सरकारला दाखवली. जुलै 1956 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी साधक-बाधक चर्चा न करता तत्कालीन सरकारने मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला. मुंबई शहरात मराठी माणसांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या बेछूट गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला. तेव्हा लोकसभेत डॉ. सी. डी. देशमुख यांनी कडाडून विरोध करत आपल्या केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. डॉ. सी. डी. देशमुख रामशास्त्राr प्रभुण्यांच्या निःस्पृहतेने कडाडले की, ‘‘तुम्ही शुद्ध हुकूमशाहा आहात. महाराष्ट्राबद्दल तुम्हा राज्यकर्त्यांच्या मनात वैरभाव आहे. त्यांचे या मराठी बाण्याचे काwतुक महाराष्ट्राने नाही तर देशातील जनतेने केले.’’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर मराठी माणसात कणखर मराठी बाणा रूजवला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाला ताठपणे उभे केले. शिवसेनेच्या माध्यमातून ताठ कण्याचे शिवसैनिक तयार केले. मराठी माणसाच्या नसानसात महाराष्ट्राभिमान भिनवण्याचे कार्य केले. दुर्दैवाने आज सत्ताधाऱयांमध्ये हा मराठी बाणा मोडून पडलेला दिसत आहे. महाराष्ट्रावरील केंद्राचे आक्रमण चोहोबाजूने होत आहे. महाराष्ट्रातील थोरपुरुषांचा अपमान होत असताना सध्याचे राज्यकर्ते सहन करीत आहे. मुंबई-महाराष्ट्रातले मराठीपण संपवण्याचे कटकारस्थान दिल्ली करीत असताना त्याला विरोध न करता महाराष्ट्रातील राज्यकर्ते साथ देत आहेत.