लेख – स्वरांची वैश्विकता

>> दिलीप जोशी

जागतिकीकरणाच्या सध्याच्या जमान्यात अनेक विचार पुढे येत असतात. त्यातच कुणी ‘जागतिक भाषा’ वगैरे विचारही मांडतात. परंतु ती भाषा कशी बोलली जाणार आणि त्या भाषेची लिपी कुठली वगैरे गोष्टींवरही मतैक्य होणे कठीण. तशा कॉम्प्युटरच्या ‘भाषा’ आहेतच त्या जागतिकच, पण त्या ‘बोलण्याचा’ प्रश्न नसतो. सूर आणि स्वर मात्र उपजतच वैश्विक असतात. अर्थात ते मधुर असायला हवेत. त्यामुळे संगीताची भाषा वैश्विक होऊ शकते. म्हणून तर ‘व्हॉएजर’वरून सूर्यमालेपलीकडे आपल्या ग्रहाची माहिती पाठवताना त्यावर जगातल्या अनेक गायकांचे स्वर नोंदले आहेत. कुठली एक विवक्षित भाषा समजली नाही तरी सुरांवरून या ग्रहावरच्या प्रगत प्राण्याची कल्पना यावी हा त्यामागचा हेतू. त्यात केसरबाई केरकर यांच्या आवाजातील ‘जात कहां हो’ ही चीज नोंदली आहे. यू टय़ुबवर तुम्हालाही ती ऐकता येईल. व्हॉएजर-1 आता खरोखरच सूर्यमालेपलीकडे गेल्याने स्वरांची भाषा वैश्विक झाली आहे. त्याच नोंदीमध्ये कार्ल सेगन या विज्ञान लेखकाने निवडलेली एक अप्रतिम धून आहे. 1756 ते 1791 या काळातील मोझार्ट यांनी तयार केलेल्या धून जगात नंतर अलीकडेपर्यंत वापरल्या गेल्या. 1961 मध्ये ‘छाया’ चित्रपटासाठी संगीतकार सलील चौधरी यांनी मोझार्ट यांच्या 51 व्या धूनवर आधारित ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’ हे गाणं खूप गाजलं आणि गोड संगीत कालातीत तसंच जागतिक असतं हे सिद्ध झालं. हे सगळं काही आठवडय़ांपूर्वी होऊन गेलेल्या जागतिक संगीत दिनावरून आठवलं.

लता, आशा, रफी, किशोर, मुकेश यांची अमर गाणी आजचे ‘लिटिल चॅम्प’ही गातात ही त्यातली संगीताची आणि स्वरांची ताकद. संगीतकार आनंदजी 1964 मधली गोष्ट सांगतात की, ते आफ्रिकेत नैरोबीजवळच्या जंगलात फिरायला गेले असताना त्याना एक झोपडी दिसली. तिथे लता मंगेशकरांचा फोटो होता. तो माणूस स्वाहिली भाषेत म्हणाला, ‘या लता मामा (त्यांच्या भाषेत आई!) आहेत.’ त्याला लताच्या गाण्याविषयी प्रचंड आवड नि आदर होता. आनंदजीना त्याने लताची ‘पंख होते तो उड आती रे’ आणि ‘आयेगा आनेवाला’ ही गाणी त्याच्या पद्धतीने म्हणून दाखवली. संगीताची ‘भाषा’ वैश्विक असण्याचा याहून अधिक पुरावा काय हवा?

एल्विस प्रिस्ले हा 1960 च्या दशकातला प्रसिद्ध गायक. 1962 मधलं त्याचं ‘हू मेक्स माय हर्टबीट लाइक थंडर’ हे शेवटी ‘मार्गारिटा’ असं असलेलं गाणं खूप गाजलं. त्याच चालीसह शंकर-जयकिशन यांनी ‘झुक गया आसमान’साठी वापरलं ते गाणं म्हणजे- ‘कौन है जो सपनों मे आया’ (गायक महंमद रफी) आणि ते हिंदीच वाटलं, ही सुरांची भाषा.
मराठी संगीत रंगभूमीवर बालगंधर्व नावाचा तारा तळपत होता तेव्हा त्यांची मराठी गाणी ऐकायला बहुभाषिक प्रेक्षक येत असत. एवढंच नव्हे तर ती नाटकं अनेकदा पाहत.

संगीत जुनं-नवं काही नसतं. चांगलं संगीत जे कुठल्याही काळातील माणसाच्या कानाला गोड लागतं आणि मग मोहून टाकतं ते! नव्या काळातल्या काही चालीही छान असतात, परंतु प्रत्येक पिढीची एक आवड-निवड असते तशी आमची पिढी लता, आशा, रफी, किशोर, मुकेश, मन्ना डे यांच्या गाण्यांची आवड असणारी. माझा एक मित्र (विलास देशमुख) रोज एक छान हिंदी गाणं ‘साँग ऑफ द डे’ म्हणून पोस्ट करतो. त्याचा हिंदी चित्रपट गीतांचा अभ्यास दांडगा आहे. ‘पँडॅमिक’ काळात त्याने सगळी, मनाला उभारणी देणारी गाणी निवडली. त्याला खूप प्रतिसाद मिळतो.

आयुष्यात गाणं गाता येणं हे तर भाग्याचं लक्षण, पण एखादं गाणं गुणगुणावंसंही वाटू नये असं कुणी क्वचितच असेल. प्रत्येकाला आपल्या आवाजात गावंसं वाटतंच. असे ‘बाथरूम सिंगर’ घरोघर असतात. ‘ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये… गाना आये या ना आये गाना चाहिये’ हे महेंद्र कपूर-आशाचं गाणं! (चित्रपट ‘पती पत्नी और वो’) तर गाणं प्रत्येकजण किमान स्वतःशी तरी गुणगुणतोच. एकदा बाळासाहेबांनी त्यांच्या मिष्किल शैलीत म्हटलं. ‘ते मेघमल्हार वगैरे गाऊन पाऊस पाडू शकणारे गानसम्राट असतील, पण आम्ही गाणं म्हणायला लागलो की बाथरूममधल्या नळाचं पाणी जातं!’

गाणं, संगीत या विषयीचे असे अनेक किस्से अनेकांकडून ऐकलेले. काही गाण्यांच्या बाबतीत स्वतः स्वरसम्राज्ञीने सांगितलेल्या गोष्टी मुलाखतीच्या वेळी रेकॉर्ड करता आल्या.

गाणं माणसाच्या मनाला उभारी देतं. सुख-दुःखापलीकडची एक वेगळीच अनुभूती देतं. शेतात भाताची लावणी करताना, जात्यावर दळण दळताना, मोटेवर पाणी काढतानाची विविध भावभावना व्यक्त करणारी पारंपरिक गाणी आपला सांस्कृतिक ठेवा असतो. सामान्य माणसं त्यांच्या स्वरात आपल्या भावना आपल्याशीच व्यक्त करतात. त्याचा एक हृद्य किस्सा मार्क ट्वेन या विनोदी लेखकाचा. मार्क लहान असताना त्यांच्याकडे कामाला असलेला आफ्रिकन मुलगा सतत स्वतःशी काहीतरी गुणगुणत राहायचा. आई-वडील आणि स्वतःचं कुटुंब नसलेलं, फारसं इंग्लिश न समजणारं ते पोर आपल्याच नादात काम करत राहायचं. मार्कला ते आवडत नसे. त्याने आईला तसं सांगितलं. तेव्हा तिनं दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं. मार्कची आई म्हणाली, ‘त्याचं इथे कोणीच नाही. त्याची भाषा आपल्याला कळत नाही. तो स्वतःशीच काहीतरी गुणगुणत जीव रमवतो. तेही त्याला बंद करायला लावलं तर त्याचा किती कोंडमारा होईल याचा विचार कर?’ मार्कचे डोळे पाणावले. पुन्हा त्याने अशी तक्रार कधीच केली नाही. अमेरिकेतील एकेकाळच्या आफ्रिकन वेठबिगारांच्या वेदनेतून ‘ब्लूज’ गाणी निर्माण झाली, असं म्हटलं जातं. आनंदाप्रमाणे दुःखही जेव्हा शब्दात मांडता येत नाही तेव्हा ते सुरांचा आधार घेतं. ज्याच्या त्याच्या अंतर्मनातले सूर त्याला शांत करतात. म्हणूनच संगीत शब्दांपलीकडे जातं.

आपली प्रतिक्रिया द्या