
>> प्रशांत गौतम
राज्याचे माजी शिक्षण संचालक, तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर सर म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात नव्या पिढीसाठी दीपस्तंभच होते. उत्तुंग व्यक्तिमत्त्व, विद्वान, विनम्र अभ्यासक ही तर त्यांची सर्वदूर ओळख होती. एक माणूस आणि शिक्षक म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी छाप होती. हाती घेतलेल्या कामातील लहान-लहान तपशील त्यांच्या सदैव स्मरणात असायचा. शिस्तप्रियतेमुळे ते अनेकांचे मार्गदर्शक, विद्यार्थीप्रिय शिक्षक राहिले. राज्याचे शिक्षण संचालक या नात्याने त्यांनी भरीव कार्य केले. तद्वतच पब्लिक स्कूल, विवेकानंद अकॅडमी. ज्येष्ठ नागरिक संस्था या संस्थेचे ते आधारवड होते. ‘बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे वैचारिक व भावनिक प्रदूषण वेळीच लक्षात घेतले नाही, तर एका फार मोठ्या विनाशाला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे, अन्य कुणाला नसली तरी किमान विद्यार्थ्यांची पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना याची जाणीव असलीच पाहिजे. शिक्षणाच्या क्षेत्रात ही जाणीव निर्माण व्हावी, यासाठी चिपळूणकर यांनी सतत चिंतन, मनन व लेखन केले आणि म्हणूनच त्यांच्या शैक्षणिक विचारांच्या अभ्यासाची गरज आहे. विद्याधर विष्णू तथा वि. वि. चिपळूणकरांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी मुंबई येथे झाला आणि नव्वदाव्या वर्षी त्यांचा प्रवास संभाजीनगरात विसावला. माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांचा 1948 साली शिक्षण क्षेत्रात प्रवेश झाला. नंतर त्यांनी शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य ते राज्याचे शिक्षण संचालक अशा चढत्या क्रमाने त्यांचा शैक्षणिक प्रवास गतिमान होत गेला. 1987च्या सुमारास शिक्षण संचालकपदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणून काही काळ त्यांनी काम केले. चिपळूणकर बालभारतीचे माजी संचालकही होते. विशेष म्हणजे ‘बालभारती’च्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
चिपळूणकर समितीच्या अहवालामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली. तेव्हा त्याचे ‘उद्धरावा स्वंय आत्मा’ हे ब्रीदवाक्यही त्यांची ओळख अधोरेखित केली पाहिजे. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिक्षणमंत्री सुधीर जोशी होते. रात्रीच्या शाळा निकाल कमी लागतात म्हणून बंद कराव्यात, अशी शिक्षण क्षेत्रातील काहींची सूचना होती. त्यावर विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीकडून तशीच शिफारस होती. मात्र, चिपळूणकरांनी सुचविलेल्या सूचनांवर अनेकांची सहमती मिळाली आणि रात्रशाळांचा मार्ग सुकर झाला. चिपळूणकर यांनी शिक्षकांनी कोणती भूमिका बजवावी, यासंदर्भात शिक्षण क्षेत्रासाठी मौलिक मार्गदर्शन केले. ‘‘परीक्षांच्या चिखलात रुतून बसलेले शिक्षणाच्या रथाचे चाक बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत’’ असे ते म्हणत. 1977 पासून इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये विद्यार्थ्यांना नापास करू नये, असे आदेश काढले होते. ते 2001 साली मागे घेण्यात आले. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ कार्य केले. मात्र, त्यांनी आपल्यातील शिक्षक संपू दिला नाही. पद आणि सत्तेचा त्यांनी कधी गर्व बाळगला नाही. गीता अभ्यासाचे फार मोठे अधिष्ठान त्यांना लाभले होते. ज्ञानेश्वरीचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्यातूनच त्यांची प्रतिज्ञानेश्वर अशीही ओळख निर्माण झाली. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे सुंदर, रसाळ विवेचन ते करीत असत. नवहिंदुस्थानच्या निर्मितीसाठी नव्या पिढीला चिपळूणकर सरांनी आत्मभान दिले.






























































