प्रासंगिक – व्हॅलेंटाईन डे आणि सावधानता

800

>> विलास पंढरी

प्रेमाचे प्रतीक असलेला पाश्चिमात्य संस्कृतीमधील ‘व्हॅलेंटाईन डे’ दरवर्षी 14 फेब्रुवारीला का साजरा केला जातो. जसे 1 जानेवारी या दिवसाला  सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक, वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक असे  महत्त्व नसूनही हा दिवस  ‘नूतन वर्ष दिन’  म्हणून  धुमधडाक्यात साजरा केला जातो, तसेच काहीसे व्हॅलेंटाईन डेचेही आहे. आपण हिंदू संस्कृतीमधील सणांमधील पावित्र्याबद्दल  म्हणतो, तसे पाश्चात्त्य संस्कृतीविषयी म्हणणे धाष्टर्याचे ठरेल. कारण व्हॅलेंटाईन डे सप्ताहाच्या नावाखाली जे वेगवेगळे दिवस साजरे केले जातात ते पाहिले की, पावित्र्य शोधणे कठीण आहे. विशेष म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीतील हा दिवस हिंदुस्थानात तरुणाईचा एक आवडता दिवस झाला आहेच, पण हल्ली पूर्ण आठवडाभर साजरा करण्याची पद्धत रुजली आहे.

7 फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होते ‘रोझ डे’ने. प्रेमाचं प्रतीक असलेलं गुलाबाचं फुल देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. लाल गुलाब हे प्रेमाचं प्रतीक असल्याने लाल गुलाबाला विशेष पसंती दिली जाते.

 8 फेब्रुवारी

व्हॅलेंटाइन वीकमधला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. या दिवशी आपल्या आवडीच्या व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या जातात.

9 फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस हा ‘चॉकलेट डे’ म्हणून साजरा केला जातो. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी तोंड गोड करून करण्याची आपली परंपरा आहे. चॉकलेटच्या गोडव्याप्रमाणे प्रेमाचा गोडवा वाढण्यासाठी  आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन हा दिवस साजरा केला जातो.

10 फेब्रुवारी

प्रेमात पडल्यावर प्रिय व्यक्तीला ‘टेडी बिअर’ भेट देण्याची पद्धत आहे. व्हॅलेंटाईन वीकमधील चौथा दिवस ‘टेडी डे’ म्हणून साजरा केला जातो. चॉकलेटस्प्रमाणे त्यातही अनेक ऑप्शन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या प्रियकराची आवड ओळखून छानसा टेडी भेटवस्तू म्हणून दिला जातो.

11 फेब्रुवारी

रोझ, चॉकलेट आणि टेडी गिफ्ट करून प्रेमाचा इजाहार झाल्यावर वेळ येते, एकमेकांना वचन देण्याची. त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी ‘प्रॉमिस डे’ साजरा केला जातो. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये सुरुवातीपासूनच कमिटेड असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ‘प्रॉमिस डे’ला तुमच्या प्रिय व्यक्तीला प्रेमात वचन देता तेव्हा त्याचा किंवा तिचा तुमच्यावरील विश्वास आणखी दृढ होतो आणि नातं मजबूत होत जातं आणि लग्नाची पायाभरणी होते.

12 फेब्रुवारी

‘हग करणं’ म्हणजे मिठी मारणं. प्रेम व्यक्त करण्याचं ते एक सुंदर माध्यम असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कुशीत असता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत आणि निवांत वाटतं. आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

13 फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन वीकमधील  महत्त्वाचा आणि रोमॅण्टिक दिवस म्हणजे ‘किस डे’. कारण या दिवशी प्रेमीयुगूल करून त्यांच्या मनातील प्रेमभावना एकमेकांना व्यक्त करत असतात. दोघांतील अंतर संपल्याचे हे द्योतक असते.

14 फेब्रुवारी

‘व्हॅलेटाईन डे’च्या आठवडय़ातील सर्वात महत्त्वाचा दिवस, 14 फेब्रुवारी! प्रेम करण्याऱ्या व्यक्तीसाठी ‘व्हॅलेंटाईन डे’ हा एक स्पेशल दिवस असतो. ‘व्हॅलेंटाईन डे’ हा या आठवडय़ाचा जरी शेवटचा दिवस असला तरी प्रेमवीरांसाठी त्यानंतरचा प्रत्येक दिवस तितकाच खास असतो. म्हणूनच तरुण मुलं-मुली हा दिवस अगदी जल्लोषात साजरा करतात. हे सगळे दिवस आणि त्यांची साजरा करण्याची पद्धती पाहिल्यास प्रेमासारख्या पवित्र भावनेचे बाजारीकरणच झाल्याचे जाणवते. यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते असा याचा अर्थ होतो.

‘इंटरनॅशनल बिझिनेस टाइम’ या ई-दैनिकानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी सुसाईड हेल्पलाइनला सर्वात जास्त फोन येतात. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा, निराशा आणि उद्विग्नता ही त्यामागची कारणे आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’ या प्रेमाच्या सणाची ही दुसरी बाजूदेखील विचार करायला लावणारी आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’. आपण पाश्चात्त्यांच्या चुकांतून काही शिकणार आहोत की नाही? व्हॅलेंटाईन डे साजरा करताना सावधानताही पाळायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या