आभाळमाया – यशाची पहिली पायरी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणतात. कारण संपूर्ण निक्रियतेमध्ये यशापयाशाचा प्रश्नच नसतो. विज्ञानातले नवे शोध लागताना किंवा प्रयोग करताना अनेक संशोधकांना तसंच विज्ञान संस्थांना कितीतरी वेळा अपयशाचा सामना करावा लागला आहे आणि त्यात काही नवल नाही. अमेरिकेच्या ‘अपोलो’ प्रकल्पात किती वेळा अपयशाची वेळ आली. अपोलो-13 तर अंतराळवीरासकट चंद्राकडे निघालं होतं. पण त्यात अचानक बिघाड होऊन ते कसंबसं परत पृथ्वीवर आणण्यात आलं. रशियालाही अशा अंतरळी अपयशांचे धक्के अनेक वेळा मिळालेले आहेत. यशापयशाच्या बाबतीत हिंदुस्थानची गोष्टही काही जगावेगळी असण्याचं कारण नाही. वेगळेपण असतं ते संशोधनात आणि मोहिमांच्या उद्दिष्टात. चांद्रयान-1 वरूनच गेलेल्या ‘नैसा’च्या उपकरणाने चंद्रावरच्या पाण्याचा पहिला ठोस पुरावा नोंदला हे आपलं यश. कारण, ते उपकरण चांद्रपृष्ठावर ठराविक ठिकाणी ठेवण्याची जबाबदारी आपली होती. आपल्या संशोधकांच्या या कामगिरीचं जगात भरपूर कौतुक झालं. त्यानंतरच्या ‘मंगळयाना’नेही अपेक्षित यश प्राप्त केलं. भूस्थिर कक्षेत म्हणजे पृथ्वीपासून 36800 किलोमीटर दूरच्या कक्षेत उपग्रह स्थिर ठेवण्यासाठी लागणाऱया ‘क्रायोजेनिक’ इंजिनाची मागणी रशियाने नाकारल्यावर आपल्या संशोधकांनी ते स्वतःच सिद्ध केलं.
असे बरेच यशस्वी अंतराळी उपक्रम आपल्या ‘इस्रो’ने केले. एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह अवकाशात सोडून ते सर्व ठरल्या जागी तंतोतंत ठेवण्याची कामगिरी ‘इस्रो’नेच करून दाखवली. एकाच वेळी सर्वात जास्त उपग्रह अवकाशात पाठवू शकलेली संस्था म्हणून ‘इस्रो’चा जगात गौरवही झाला.
परंतु विज्ञान क्षेत्रात गौरवाने हुरळून चालत नाही आणि अपयशाने खचून जाता येत नाही. चांद्रयान-2 तर जगाच्याही दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ‘इस्रो’ने हाती घेतला होता. मात्र चंद्राच्या कक्षेत व्यवस्थितपणे पोचून आपला ‘प्रज्ञान’ रोव्हर चंद्राच्या कधी न पाहिलेल्या भागात उतरायला काही सेकंद राहिले असताना आणि सर्व जगाचे डोळे याकडे लागले असताना घात झाला. केवळ काही क्षणांसाठी ‘प्रज्ञान’ ठेवण्यासाठीची आवश्यक कक्षा चुकली आणि ते भरकटून भलत्याच जागी उतरलं. निमिषार्धात सारे श्रम वाया जाताच संशोधकांचे डोळे भरून आले आणि देशवासीयांनाही वाईट वाटलं.
आता काही दिवसांपूर्वी 7 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजून 18 मिनिटांनी अवकाशात सोडलेल्या आपल्या एका वैशिष्टय़पूर्ण उपग्रहासह आणि एका उपग्रहाची कक्षा ऐनवेळी चुकली आणि दोन्ही उपग्रह वर्तुळाकार कक्षेत स्थिरावण्याऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत जाऊन पडले. आता त्यांचा आपल्याला काहीच उपयोग नाही.
परंतु या मोहिमेचं वैशिष्टय़ असं की आपण पहिल्यांदाच छोटय़ा आकाराच्या (स्मॉल स्केल) रॉकेट प्रक्षेपणाचा यशस्वी प्रयोग केला. कमी वजनाचे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी, मोठय़ा क्षमतेचं रॉकेट वापरून त्यावर होणारा अनाठायी खर्च टाळण्याच्या दृष्टीने हा प्रयोग भविष्यात निश्चितच उपयोगी पडेल.
‘स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग वेहिकल’ अथवा एसएसएलव्ही असं त्याचं नाव- पीएसएलव्ही म्हणजे पृथ्वीच्या धुवीय कक्षेवरून अंतराळात फिरणाऱया उपग्रहांचं प्रेक्षेपण करणार रॉकेट. तर जीएसएलव्ही म्हणजे भूस्थिर उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी वापरण्यात येणारं रॉकेट. या नव्या प्रयोगात लहान (स्मॉल) रॉकेट पाठवण्याचा हेतू सफल झाला.
…पण देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने ‘स्पेस किड्स इंडिया’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 750 शालेय मुलींनी बनवलेला ‘आझाद’ नावाचा उपग्रह यामुळे गळफटला, भरकटला. महाराष्ट्रातील लोणावळा, कोंढूर आणि कोल्हार तसंच गोव्यातील एका शाळेसह देशातल्या सर्व राज्यातल्या 75 शाळांमधल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विद्यार्थिनींनी अतिशय परिश्रमपूर्वक तयार केलेला ‘आझाद’ उपग्रह मात्र अखेरच्या टप्प्यात कक्षा चुकल्याने वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत जाऊन बसला. हा उपग्रह मुलींनीच बनवण्यामागचा उद्देश मुलींना शालेय वयातच सायन्स, टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथेमेटिक्स (स्टेम) या विषयात गती मिळण्याच्या दृष्टीने या उपग्रहाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. 750 मुलींनी त्यांचं काम उत्तम प्रकारे केलं होतं… आणि कक्षा (इयत्ता) चुकली ती उपग्रह सोडणाऱया तंत्रज्ञानाची. त्या मुलींना वाईट वाटणार यात शंकाच नाही. पण अपयशाच्या पहिल्या पायरीनंतर पुढे अमाप यश मिळू शकतं. वय, उत्साह, कल्पकता आणि अभ्यासू वृत्ती त्यांच्याकडे आहेच. त्यांचं अभिनंदन!

[email protected]