
>> श्रीकांत आंब्रे
रसाळ वक्तृत्व, प्रचंड विद्वत्ता आणि कितीतरी गुणांचा समुच्चय असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक राम शेवाळकर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला भारावून टाकणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कर्तृत्वाची आणि वक्तृत्वाची महती सांगणारी अनेक पुस्तके व लेखसंग्रह उपलब्ध आहेत. तरीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नेमका वेध घेणारे `अमृताचा घनु-राम शेवाळकर’ हे त्यांचे शिष्य नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेले पुस्तकही लक्षवेधक आहे. त्यांनी या पुस्तकात आपल्या गुरूच्या लेखक, वक्ता, कवी, प्राचार्य, आप्त, शिक्षणतज्ञ, संघटक, प्रशासक, आचार्य कुलाचा उपासक इत्यादी पैलूंचा जिव्हाळय़ाने परामर्श घेतला आहे.
या पुस्तकात राम शेवाळकर यांच्या घराण्याच्या इतिहासापासून त्यांच्या जीवनातील अनेक महत्त्वाचे प्रसंग आणि आठवणींना लेखकाने उजाळा दिला आहे. साने गुरुजींवर बालपणापासून उत्तम संस्कार करणारी आई श्यामला जशी लाभली, तशी या रामलाही लाभली. मात्र या दोघांच्या जीवनातील साम्य म्हणजे त्या बालवयात दोघांनाही तिचे अंत्यदर्शन लाभले नाही. कारण शिक्षणासाठी ते दोघे घरापासून दूर होते. कीर्तन विशारद कीर्तनकार वडिलांचा व्यासंग आणि सहवास याची छाप त्यांच्यावर पडली. वाचनाचं प्रचंड वेड, कुशाग्र बुद्धी, मिश्कील वृत्ती, करारी बाणा, न्यायनिष्ठुरता, निरपेक्ष भावनेने काम करण्याची सवय, साधा स्वभाव या त्यांच्या गुणाचं प्रतिबिंब या पुस्तकातील अनेक आठवणींत, प्रसंगांत, त्यांच्या कामात, वागण्या-बोलण्यात पडलेलं दिसतं ते त्यामुळेच. लेखकाने हे सारे प्रसंग आपल्या संवेदनशील लेखणीतून डोळय़ांसमोर उभे केले आहेत.
बोलता बोलता अचानक भावूक होणारे राम शेवाळकर मेणाहून मऊ वाटत असले तरी प्रसंगी ते वज्राहून कठीण झाल्याचे महाराष्ट्राने अनेक वेळा अनुभवले आहे. अशाप्रसंगी आपल्या प्रिय माणसांना खडे बोल सुनावण्यास त्यांनी कधीही मागेपुढे पाहिलं नाही. त्यातून ते दैवत मानत असलेल्या विनोबांचीही सुटका झाली नाही. अशा अनेक प्रसंगांचे दाखले लेखकाने दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या दयाळू स्वभावाचे, कॉलेजच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांबाबत असलेल्या सहानुभूतीचे आपल्या कृतीतून दर्शन घडविणारे राम शेवाळकर इथे अनेक वेळा दिसतात. एखादी व्यक्ती शेवाळकरांसोबत वाईट वागली तरी शेवाळकर त्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागत. कोणत्याही बाबतीत नेहमी चांगलेच पाहावे असे ते म्हणत त्याची अनेक उदाहरणे या पुस्तकात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही, या विचारसरणीने ते वागत, नवोदित लेखकांना प्रोत्साहन देत हे अनेक प्रसंगांत इथे दिसतं. `अमृताचा घनु’ हा त्यांच्या निरूपणाचा कार्पाम मंगेशकरांच्या साथीने प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. तसंच व्याख्यान कसं रंगलं पाहिजे याविषयी त्यांनी दिलेल्या खास टिपा, अनेक गमतीशीर अनुभव पुस्तकाची रंगत वाढवतात. प्रा. नरहर कुरंदकरांची त्यांच्या जीवनावर पडलेली छाप, कविवर्य सुरेश भट यांच्याशी जुळलेले भावबंध, मंगेशकर घराण्याशी जुळलेली कौटुंबिक मैत्री, शेवटच्या आजारपणातही कमी न झालेला त्यांचा मिश्कीलपणा यातून त्यांची स्वभाव वैशिष्टय़े या पुस्तकात ठळकपणे जाणवतात. लेखकाने त्यांच्या साहित्य संपदेबरोबरच त्यांच्या व्याख्यानांतील सुविचारांची, विचारधनाची यादीही सोबत दिली आहे. त्यांची माणसं जोडण्याची सवय, प्रवासाची आवड याचे अनेक किस्सेही यात आहेत. राम शेवाळकरांच्या व्यक्तिमत्त्वाचं वेचक आणि वेधक दर्शन या पुस्तकातून नक्कीच घडेल. विजयकुमार चित्तरवाड यांचं मुखपृष्ठही देखणं आहे.
अमृताचा घनु : राम शेवाळकर
लेखक : नागेश शेवाळकर
प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे : 112 ह मूल्य ः 120 रुपये



























































