‘मुक्तांगण’च्या कार्यात प्रेम आणि आपुलकीची जादू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ममता क्षेमकल्याणी

‘सगळ्यांना प्रेम आणि आपुलकीने वाढवणारी जादू’ व्यसनाधीन व्यक्तीला समृद्ध जगण्याचा विचार करण्यास भाग पाडते. कोणत्याच प्रकारचे भेद न मानता प्रत्येकाला इथे समान वागणूक दिली जाते. शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. या सगळ्यामुळे गेल्या सात वर्षांपूर्वी व्यसनमुक्त झालेले विजयकुमार बोठे यांची ही यशोगाथा!

आपल्याकडे एखाद्या व्यसनी व्यक्तीला ‘व्यसन करू नको, ती चांगली गोष्ट नाही’ असे शहाणपण सांगणारे अनेक जण असतात. अगदी कुटुंबातील व्यक्तीदेखील केवळ बोलत राहतात आणि विषय सोडून देतात. मात्र, व्यसनाधीन व्यकीला व्यसनमुक्त करायचे म्हणजे करायचे हा ध्यास घेऊन खरं तर हा हट्ट करून काम करणारी संस्था म्हणजे ‘मुक्तांगण’. मी व्यसनमुक्त होण्यास ‘मुक्तांगण’मधील प्रत्येक व्यक्तीचा हा आग्रह आणि हट्टच कारणीभूत ठरला आणि अगदी संपण्याच्या टोकापर्यंत गेलेले माझे आयुष्य मला पुन्हा परत मिळाले ते ‘मुक्तांगण’मुळेच’’, हे सांगताना विजयकुमार बोठे यांचा ऊर अभिमानाने भरून येत होता.

मूळचे नगरचे असलेले विजयकुमार सध्या रत्नागिरी येथे जीएसटी कार्यालयात राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयीन काळात मित्रांनी केलेल्या आग्रहाला विजयकुमार बळी पडले आणि एका हुशार, उमद्या आणि कष्टाळू तरुणाचे रूपांतर अक्षरशः खंगलेल्या व्यसनी व्यक्तीमध्ये झाले. विजयकुमार यांच्या या मद्यसेवनाच्या व्यसनाने पाहता पाहता इतके टोक गाठले की, घर-संसार, कुटुंब, शरीर, आरोग्य, अर्थकारण हे सगळे खरोखर उद्ध्वस्त झाले. शिक्षणाची आवड असलेल्या विजयकुमार यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतले असून त्या त्या संबंधित क्षेत्रात नोकरी करण्याचा दांडगा अनुभवदेखील त्यांच्याकडे आहे. आपल्या शरीरसंपदेविषयीदेखील ते सुरुवातीपासून जागरूक होते. मात्र, ऐन तारुण्यात फिरलेल्या मतीमुळे त्यांच्या नशिबाचे वासे फिरले. नोकरीच्या ठिकाणी उत्तम कामाचा परफॉर्मन्स देणारे विजयकुमार कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात अपयशी ठरले ते दारूच्या व्यसनामुळेच. संध्या या उच्चशिक्षित आणि हुशार तरुणीशी त्यांचा विवाह झाला. दोन कन्यारत्नांनी त्यांचा संसार परिपूर्ण केला, पण विजयकुमार यांच्या व्यसनाधीनतेमुळे नेहमी होणारी आर्थिक ओढाताण, भांडणे, झटापट या सगळ्यामुळे शब्दशः वैतागून आणि शिणून गेलेल्या त्यांच्या पत्नीने ‘‘एकतर व्यसन सोडा, नाहीतर मी तुम्हाला सोडते’’ अशी भूमिका घेत थेट माहेर गाठले. तब्बल पाच वर्षे त्या त्यांच्या दोन्ही मुलींना घेऊन विजयकुमार यांच्यापासून वेगळ्या राहिल्या. विजयकुमार यांच्या सगळ्या जीवनाची आणि कुटुंबाची झालेली वाताहत ही इतर नातलग आणि परिचितांसाठी केवळ चर्चेचा विषय ठरली. वाट चुकून भरकटलेल्या विजयकुमार यांना जीवनाच्या समृद्ध मार्गावार आणण्यासाठी फारसे कोणी पुढे येत नव्हते. अशातच त्यांचे परिचित असलेले प्रा. राम दराडे सर यांनी त्यांच्याशी पुण्यातील व्यसनमुक्ती पेंद्राविषयी चर्चा केली. नगर येथे ‘मुक्तांगण’चे समुपदेशक नितीन देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मीटिंगला विजयकुमार गेले आणि त्यांची भेट घेतली. त्यावेळी देऊस्कर यांनी विजयकुमार यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून त्यांना तातडीने ‘मुक्तांगण’मध्ये अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यावेळी व्यसनाधीनतेमुळे झालेल्या आपल्या अवस्थेविषयी ‘कळतंय, पण वळत नाही’ अशा परिस्थितीत असलेल्या विजयकुमार यांनी ‘मुक्तांगण’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हातात असलेल्या कामांचे कारण देत विजयकुमार यांनी एक महिन्याचा कालावधी मागून घेतला. या एका महिन्यात मनसोक्त मद्यपान करून घेण्याचा त्यांचा मनसुबा यशस्वी ठरला, पण प्रा. राम दराडे यांनी सुचवलेला ‘मुक्तांगण’चा मार्ग विजयकुमार यांना नवीन जीवन प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा ठरला. आपण अशाच पद्धतीने मद्यसेवन करीत राहिलो तर लवकरच आपला मृत्यू निश्चित होणार या उपरतीमुळे भानावर आलेले विजयकुमार ‘मुक्तांगण’मधील प्रत्येक कृतीला, उपक्रमाला, व्यक्तीला आणि विचारांना सकारात्मक प्रतिसाद देऊ लागले. त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी अतोनात प्रयत्न करणाऱया प्रत्येक घटकाचे महत्त्व त्यांनी नेमकेपणाने जाणले होते. व्यसनामुळे खंगलेले विजयकुमार ‘मुक्तांगण’मध्ये दाखल झाले तेव्हा त्यांचे वजन 53 किलो इतके झाले होते, पण ‘मुक्तांगण’मधील सगळ्या रूटिनचे तंतोतंत पालन केल्यामुळे महिनाभरात त्यांचे वजन सहा किलोने वाढले. ‘मुक्तांगण’च्या प्रत्येक सत्रातून मिळणारी ऊर्जा शरीर आणि मन या दोन्हीला उभारी देणारी ठरली. मुख्य म्हणजे ‘मुक्तांगण’मधून घरी परत आल्यावर दर महिन्याच्या फॉलोअपसाठी न चुकता ‘मुक्तांगण’ला जाणे, सातत्याने समुपदेशकांच्या संपर्कात राहणे, व्यसनी मित्रांपासून दूर राहणे आणि कायम सकारात्मक विचार करणे यांचा व्यसनमुक्त राहण्यासाठी खूप उपयोग झाला.

‘मुक्तांगण’च्या उपचार पद्धतीमध्ये एक जादू आहे, असे विजयकुमार आवर्जून सांगतात. ‘सगळ्यांना प्रेम आणि आपुलकीने वागवणारी जादू’ व्यसनाधीन व्यक्तीला समृद्ध जगण्याचा विचार करण्यास भाग पाडते. कोणत्याच प्रकारचे भेद न मानता प्रत्येकाला इथे समान वागणूक दिली जाते. शिस्तीचे पालन काटेकोरपणे केले जाते. इथला सात्त्विक आहार, मन आणि शरीराचे विविध व्यायाम, मनाचे पोषण करणारे विचार या सगळ्याचा योग्य तो परिणाम होऊन व्यक्ती व्यसनमुक्तीच्या मार्गावर वाटचाल करू लागतो.

विजयकुमार यांच्या पत्नी संध्या यांनादेखील ‘मुक्तांगण’च्या विचारांची दिशा पटली. व्यसनमुक्तीकडे वाटचाल करणाऱया आपल्या पतीला पुन्हा सोबत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे विजयकुमार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनात मोलाची भर पडली. आज उच्च शिक्षण घेणाऱया दोन मुलींसह विजयकुमार आणि संध्या यांच्या संसाराची गाडी समृद्धीच्या मार्गावरून पुढे जाते आहे.

‘मुक्तांगण’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्तिशः दिलेले लक्षदेखील मोलाचे ठरले. आज विजयकुमार स्वतः ‘मुक्तांगण’च्या कार्यात पूर्णपणे सक्रिय नसले तरी त्यांना भेटणाऱया प्रत्येक व्यसनी व्यक्तीला ‘मुक्तांगण’ची सविस्तर माहिती देऊन व्यसनमुक्त होण्याचा मार्ग विजयकुमार दाखवतात.

[email protected]