ठसा – विलासराव पाटील-उंडाळकर

>> गोरख तावरे

सातारा जिह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग 35 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याचा विक्रम करणारे विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये समाजातील उपेक्षित, मागासवर्गीय, पददलित व इतर समाजातील होतकरू कार्यकर्त्यांना राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रात संधी देण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात केवळ उंडाळे (ता. कराड) येथे सातत्याने स्वातंत्र्यसैनिकांचे अधिवेशन घेण्याचा उपक्रम राबवला तर समाज प्रबोधन साहित्य संमेलनातून प्रबोधनाची चळवळ सुरू ठेवली होती. विलासकाका पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळामध्ये सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, वस्त्राsद्योग, भूकंप पुनर्वसन व विधी व न्याय खात्याचा कार्यभार सांभाळला होता. कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये सत्तांतर करण्यामध्ये विलासकाका पाटील यांची नेहमी महत्त्वाची भूमिका राहिली आहे. सातारा जिह्यातील राजकारणावर विलासकाकांची पकड होती. विलासकाका म्हणतील त्यापद्धतीने सातारा जिह्यातील राजकारण होत होते. अनेक सहकारी संस्थांची निर्मिती विलासकाकांनी केली आहे. त्या सक्षमपणे आजही सुरू आहेत. कराड दक्षिण मतदारसंघांमध्ये सुसज्ज रस्ते, आरोग्य सुविधा, समाज मंदिरे उभी केली आहेत. उपेक्षित समाजाबद्दल विलासकाकांना कणव आणि जिव्हाळा होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षापासून संचालक पदापर्यंत ते दीर्घकाळ कार्यरत होते. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिह्याचा उल्लेख होत होता, तो केवळ विलासकाका यांच्यामुळेच. राज्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या लाटा आल्या. मात्र कराड दक्षिण मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासकाकांनी कायम राखून ठेवला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर निस्सीम प्रेम करणाऱया विलासकाकांनी ‘यशवंत विचार’ रुजवण्याचा प्रयत्न पन्नास वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये प्रामाणिकपणे केला.

सहकार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने होणारे बदल लक्षात घेऊन मेळावे व शिबिरे घेऊन महाराष्ट्रातील विचारवंतांना पाचारण करीत असत. शासनाला याबाबतचा अहवाल देऊन कायद्यांमध्ये बदल करण्याचा आग्रह नेहमी धरत असत. कार्यकर्ता ते लोकनेता असा विलासकाकांचा प्रवास अत्यंत संघर्षमय असा आहे. अनेक राजकीय वादळांमध्ये विलासकाकांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेस विचार सोडला नाही. सातारा जि. प. सदस्य ः 1967 ते 1972, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवती बँक (1967 ते आजअखेर संचालक), अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, सहकार चळवळ अभ्यासासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मन, फ्रान्स, थायलंड दौरा केला होता. कराड दक्षिण मतदारसंघाचे 1980 ते 2014 पर्यंत सलग 35 वर्षे आमदार म्हणून केलेले काम जनतेच्या नेहमी स्मृतीत राहील असे आहे.

शिवाय राज्याचे दुग्धविकास, पशुसंवर्धनमंत्री 1991 ते 1993 विधी, न्याय व पुनर्वसनमंत्री 1999 ते 2003. सहकार व वस्त्राsद्योगमंत्री 2003 ते 2004 अशी मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. 1975 पासून उंडाळे येथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक अधिवेशन, समाजप्रबोधन मराठी साहित्य संमेलन, देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पाची निर्मिती, जलसिंचनाच्या माध्यमातून दक्षिण मांड सिंचन पॅटर्नची निर्मिती, राज्यात मतदारसंघ विकासात अव्वल, डोंगरी विकास निधीचे शिल्पकार म्हणून विलासकाकांचा उल्लेख होतो. कोयना सहकारी दूध उत्पादक संघ लि., कराड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लि., शेती उत्पन्न बाजार समिती कार्यक्षम व सक्षम करण्यासाठी विलासकाकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण विकास शिक्षण संस्था (उंडाळे), स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था (उंडाळे), कोयना सहकारी बँक लिमिटेड (कराड), रयत सहकारी साखर कारखाना लि. (शेवाळेवाडी) या संस्था विलासकाकांनी पुढाकार घेऊन स्थापन केल्या आहेत. धर्मांध परिषद, तांबवे, (ता. कराड), शैक्षणिक चिंतन परिषद, (कराड), विज्ञान परिषद (कराड), डोंगरी परिषद, काळगाव (ता. पाटण), घटना बचाव परिषद (कराड) अशा वैचारिक परिषदा घेऊन समाज प्रबोधनाची चळवळ विलासकाकांनी प्रखरपणे राबवली आहे.

विलासराव पाटील-उंडाळकर हे नाव संघर्षातून तयार झालेले आहे. विकासाची दृष्टी असणारे सक्षम नेतृत्व, लोकनेते, जनसामान्यांचा बुलंद आवाज, उपेक्षितांचा तारणहार, समाजप्रबोधनाचा आग्रह धरणारे व्यक्तिमत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करणारे संवेदनशील नेते, साहित्य चळवळ अखंडित सुरू राहावी, वाचन संस्कृती वाढावी, यासाठी ग्रामीण भागामध्ये संमेलनाचे आयोजन करणारे साहित्यप्रेमी अशा विविध नामावलीने विलासकाकांना संबोधले जात असे. माजी मंत्री, आमदार विलासकाका पाटील यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांनी घालून दिलेल्या आदर्श पायवाटेने वाटचाल करावी, यासाठी रयत संघटनेची निर्मिती केली गेली आहे. जनसामान्यांशी शेवटपर्यंत नाळ जोडलेले नेते म्हणून विलासकाका पाटील-उंडाळकर हे सातारकरांच्या कायम स्मरणात राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या