
>> वैश्विक, [email protected]
एखादं यान मग ते कुठलंही असेल, किती काळ अव्याहत प्रवास करू शकतं? यानं दूरवर पाठवून त्यांच्याकडून ठरावीक कामं करून घेणं 1957 नंतर अनेक अवकाश प्रकल्पात सिद्ध झालंय, पण त्या प्रत्येकाचा काळ (लाइफ आभाळमाया) ठरावीक मर्यादेचा होता. परंतु एक यान युरेनस-नेपच्युनचा ‘शोध’ आणि बोध घ्यायला 20 ऑगस्ट 1977 रोजी अंतराळात उडालं आणि आजमितीला ते आपली ग्रहमाला पार करून ग्रहमालेच्या ग्रहांच्या कक्षांमधील आणि अगदी नेपच्युनपलीकडच्या अवकाशातील ‘इन्टरस्टेलर सोस’मधील द्रव्यांचा अभ्यास करत आहे. अजूनही त्या यानाकडून संदेश आणि माहिती ‘नासा’ला प्राप्त होत आहे. ‘जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी’ने घडविलेलं ‘व्हॉएजर-2’ हे यान विक्रमी ‘प्रवासवीर’ ठरलं आहे!
त्याची माहिती घेण्यापूर्वी आधी युरेनस आणि नेपच्युन या आपल्या सूर्यमालेतल्या शेवटच्या दोन ग्रहांची थोडक्यात माहिती घेऊ. पूर्वी त्यांच्यापलीकडच्या ‘प्लुटो’लासुद्धा ग्रह मानलं जायचं, पण बिचाऱयाचं ‘ग्रहपद’ गमवावं लागलं आणि तो खुजा ग्रह ठरला. ग्रहमालेतील गुरू आणि शनी यांना वायुरूप ग्रह म्हणतात तर युरेनस-नेपच्युन यांना हिम ग्रह (आयसी प्लॅनेटस्) म्हटलं जातं. हे वर्गीकरण या ग्रहांच्या स्वभाव रचनेनुसार किंवा खरं तर रचनेच्या ‘स्वभावा’नुसार केलं गेलंय. गुरू आणि शनी या महाग्रहांचा बाह्य भाग मुख्यत्वे वायूंनी व्यापलेला आहे. युरेनस-नेपच्युन यांच्या गाभ्याबाहेर बर्फच बर्फाचं वातावरण दिसतं. हे ग्रह एवढे शीतपेटीसारखे असण्याचं कारण म्हणजे सूर्यापासून त्यांचं असलेलं अतिप्रचंड अंतर. पृथ्वी-सूर्य अंतर केवळ 15 कोटी किलोमीटर आहे तर सूर्य ते युरेनस हे अंतर सुमारे तीन अब्ज तर सूर्य आणि नेपच्युनमधील अंतर सुमारे साडेचार अब्ज किलोमीटर एवढं अफाट आहे. युरेनसचा अक्ष 97 टक्के कललेला असल्याने ‘हबल’ अवकाश दुर्बिणीने त्याचा फोटो घेतला तेव्हा त्याचा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेने दिसला. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. त्या तुलनेत युरेनस तर त्याच्या कक्षेत गडगडत जाताना दिसेल. याच पद्धतीने हा घरंगळत फिरणारा ग्रह स्वतःभोवती 17 तासांत तर सूर्याभोवती 84 वर्षांत फिरतो. म्हणजे त्याचा दिवस आपल्या 17 तासांचा तर वर्ष आपल्या 84 वर्षांइतकं असतं.
नेपच्युन तर युरेनसच्याही पलीकडचा. त्याचा दिवस 16 तासांचा तर वर्ष 165 वर्षांचं आहे. युरेनसचा व्यास 51 हजार 118 किलोमीटर तर नेपच्युनचा व्यास 50 हजार किलोमीटर एवढा प्रचंड अंतराचा आहे. पृथ्वीचा व्यास 12 हजार 800 किलोमीटर आहे हे लक्षात घेतले की या हिमग्रहांचं विराट स्वरूप जाणवेल. युरेनसवर 82 टक्के हायड्रोन, 15 टक्के हिलियम आणि उरलेला मिथेन आहे. नेपच्युनवर 79 टक्के हायड्रोन, 18 टक्के हिलियम आणि उरलेला मिथेन वायू आढळतो. युरेनसचा शोध 18 व्या शतकापर्यंत सहाच ज्ञात ग्रह खगोलशास्त्र्ााच्या अभ्यासकांना ठाऊक होते. जर्मन असलेल्या विल्यम हर्शल या खगोल अभ्यासकाने 13 मार्च 1781 रोजी युरेनस शोधला. त्याने त्याला राजा जॉर्जच्या नावाने ‘जॉर्जियन स्टार’ असं नाव दिलं. पुढे ते युरेनस झालं. नेपच्युनचा शोध मात्र न्यूटनच्या तत्त्वानुसार घेण्यात आला. 1830 मध्ये भाकित करून 23 सप्टेंबर 1846 रोजी या ग्रहाच्या अस्तित्वावर वैज्ञानिकांनी शिक्कामोर्तब केलं, मात्र हे ग्रह गॅलिलीओने 1611 मध्येच न्याहाळले असावेत असेही म्हटलं जातं.
‘नासा’च्या व्हॉएजर मोहिमेतील पहिलं यान गुरू-शनीपर्यंत गेलं, पण पुढे जाण्यास त्याला अपयश आलं. अर्थात शनीपर्यंत जाऊन केलेली निरीक्षणे मोलाची होतीच. पुढे व्हॉएजर-2 या यानाने ‘वायुरूप’ आणि ‘हिमरूप’ अशा चार महाग्रहांना भेट दिली. आजवर असा अवकाशी ‘पराक्रम’ करणारे हे एकमेव यान आहे. या यानावर या ग्रहांचं वातावरण आणि ग्रहांच्या मधल्या जागेतील द्रव्याच्या अभ्यासासाठी विविध उपकरणे बसवली होती. या यानाचे ऍन्टेना काहीसे पहिल्या स्पुटनिकसारखे तीन होते. नेपच्युनवर असलेला ‘डार्क स्पॉट’ 12 हजार किलोमीटर लांब आणि 8000 किलोमीटर रुंद असल्याचं दिसलं. तिथल्या मिथेनचा बर्फ साठून ‘व्हाइट क्लाऊड’ तयार झालेलाही दिसला. या दोन्ही ग्रहांचा छोटा गाभा खडकाचा तर त्यावर पाणी आणि आमोनिया व इतर वायू आढळले. दूरच्या ग्रहांची ही माहिती घेण्यासाठी 1977 मध्ये पृथ्वीवरून निघालेलं व्हॉएजर-2 हे यान 1979 मध्ये गुरूजवळून, 1981 मध्ये शनीजवळून पुढे जात 1986 मध्ये युरेनसचं तर 1989 मध्ये नेपच्युनचं जवळून ‘दर्शन’ घेतलं. या यानाचा प्रवास 17 अब्ज 463 कोटी किलोमीटर इतका झाला असून ते सूर्यापासून 17 प्रकाश तास अंतरावर पोचलं आहे. 2020 मध्ये व्हॉएजरचा पृथ्वीशी संपर्क अचानक तुटला. तब्बल आठ महिने त्याचा काहीच पत्ता नव्हता, पण वैज्ञानिकांनी प्रयत्नांची शर्थ करून संपर्क 2 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा प्रस्थापित केला. 12 फेब्रुवारी 2021 रोजी ते पूर्ववत काम करू लागलं आणि त्याचा अव्याहत प्रवास अक्षय गतीने सुरूच आहे. धन्य ते वैज्ञानिक आणि व्हॉएजरही!





























































