
>> डॉ. शेखर सी. मांडे
देशभरात झालेले सीरो सर्वेक्षण असे सांगते की, कोरोनाच्या विरोधात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्याचे प्रमाण शहरी लोकसंख्येत अधिक आहे. छोटय़ा आणि कमी घनतेच्या ठिकाणी ही क्षमता विकसित होऊ शकली नाही. त्यामुळेच अशा ठिकाणी आता नवे रुग्ण दिसत आहेत. एक खरे की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलो आहोत, परंतु जी खबरदारी आपण सुरुवातीपासून घेत आहोत, त्याबाबत अजिबातच बेफिकिरी दाखवता कामा नये.
अनेकदा हट्टाचा परिणाम चांगला होतो. कोविडच्या महामारीला हरविण्यासाठी हिंदुस्थान आणि हिंदुस्थानी नागरिक ज्या प्रकारे दिवस-रात्र एक करीत आहेत, ते पाहता या आजारावर विजय मिळविण्याचा दिवस दूर नाही. प्रदीर्घ काळ संसर्गावर नियंत्रण ठेवल्यानंतर देशाच्या काही राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, परंतु सातत्याने दक्षता बाळगून आणि लसीकरणाच्या जोडीने आपण या आजारावर कायमस्वरूपी विजय मिळवू शकतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दररोज सुमारे एक लाख नव्या रुग्णांची नोंद होत होती. आता देशात रोजच्या संसर्गाचे प्रमाण 10 ते 15 हजारांवर आले आहे. हिंदुस्थानची दाट लोकसंख्या, पायाभूत आरोग्य सुविधांची कमतरता आणि अन्य प्रतिकूल पैलूंकडे पाहिल्यानंतर ज्या तज्ञ मंडळींना हिंदुस्थानातील संसर्गग्रस्तांची संख्या अमेरिकेपेक्षा वाढेल असे वाटत होते, त्यांचे काय म्हणणे आहे हे जाणून घ्यायला हवे. कारण आजमितीस अमेरिकेत संसर्गग्रस्तांचा आकडा 2.8 कोटींवर आहे तर हिंदुस्थानचा आकडा 1.1 कोटीपर्यंतच पोहोचल्याचे दिसत आहे.
कोविड-19 च्या मॉडेलवर काम करण्यासाठी आपल्या सहकाऱयांसमवेत हिंदुस्थानात आलेले युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनचे संसर्गजन्य रोगतज्ञ भ्रमर मुखर्जी असे मानतात की, मार्चच्या अखेरपर्यंत नवीन रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होईल असे दिसते. सेंटर फॉर डिसीज डायनॅमिक्स अँड पॉलिसीचे संसर्गजन्य रोगतज्ञ रमणन लक्ष्मीनारायण यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानात दुसऱया लाटेची शक्यता नाही. जरी आलीच तरी ती खूपच सौम्य असेल. अर्थात, मान्सूनच्या आगमनाबरोबर रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागण्याची शक्यता काही तज्ञ वर्तवितात. कारण त्या मोसमात तापाच्या रुग्णांची संख्याही नेहमीच वाढते. हिंदुस्थानात संसर्गावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्याबाबत ज्या तज्ञांना आशा आहे, ते सर्व असेही म्हणतात की, देशवासीयांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शारीरिक अंतर, मास्कचा वापर, कन्टेन्मेन्टचे उपाय गांभीर्याने अमलात आणणे, नव्या स्ट्रेनवर बारीक लक्ष ठेवणे असे उपाय योजताना थकून चालणार नाही. त्याचप्रमाणे लोकांचे लसीकरण वेगाने व्हायला हवे.
महाराष्ट्र आणि केरळसह उत्तर हिंदुस्थानातील काही राज्यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. जनजीवन पूर्ववत करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. अशा वेळी आणखी फक्त काही दिवसच संयम दाखविण्याची गरज आहे. आपल्या आचार-विचारांनी आणि व्यवहारातील वर्तनानेच या आजाराला अस्मान दाखवावे लागेल.
कोरोनाच्या संसर्गाशी आपली लढाई सुरू होऊन जवळ जवळ वर्ष होत आले आहे. आपण या आजारावर विजय संपादन करण्याच्या दृष्टीने वेगाने आगेकूच केली आहे हे खरे असले तरी थोडासा बेसावधपणाही गंभीर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकतो. प्रदीर्घ कालावधीनंतर काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. अशा महत्त्वाच्या वळणावर या महामारीविषयी आपल्याला अत्यंत सावध आणि सतर्क राहावे लागेल. लस उपलब्ध झाली आहे आणि लसीकरणाची मोहीम गतीने सुरू आहे. सध्या कोरोनाची रुग्णसंख्या पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. याचाच अर्थ जास्तीत जास्त लोकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील द्विधावस्था संपुष्टात यायला हवी. त्याचबरोबर कोरोनाला दूर ठेवण्यासाठी जे उपाय आपण योजतो आहोत, त्याही बंद करता येणार नाहीत. या वळणावर ढिलाई कामाची नाही.
लसीच्या बाबतीत काही लोकांच्या मनात शंका आहेत, परंतु लसीच्या बाबतीत संशय बाळगण्याची किंवा घाबरण्याची आवश्यकता नाही. यासंदर्भात कोणतीही द्विधावस्था मनात असता कामा नये. कोरोनापासून बचावासाठी लस आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. जसजसा कोरोराचा प्रभाव कमी होत जाईल तसतशी लोकांमध्ये बेफिकिरी वाढताना दिसते आहे. लग्न आणि अन्य समारंभांमध्ये बेसुमार गर्दी वाढत आहे आणि शारीरिक अंतराच्या नियमांचे कसून पालन होताना दिसत नाही. याबाबतीत आपण कोणताही धोका पत्करता कामा नये. कारण कोरोनाविरुद्धची लढाई आपण अद्याप जिंकलेली नाही. आपण कोरोनापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकलेलो नाही. अशा वेळी कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन शंभर टक्के करावे लागेल.
हिंदुस्थानात लसींचे दोन डोस देण्यात येणार आहेत हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. यातील एक पहिल्या दिवशी आणि एक 28 व्या दिवसानंतर. पहिला डोस देण्याची सुरुवात 26 जानेवारीपासून झाली. त्यामुळे दुसरा डोस मिळालेले खूप कमी जण आजघडीला आहेत. त्यामुळेच आज आपल्याला लस घेऊनही कोरोना झालेले काही जण दिसून येत आहेत. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरामध्ये अँटिबॉडीज तयार होण्यास किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. 28 दिवसांनी दुसरा डोस घेतल्यानंतर 10 दिवसांनी या अँटिबॉडीज अधिक सशक्त होतात. म्हणजेच साधारणतः लस घेतल्यानंतर किमान 45 दिवसांनंतर शरीरात इम्युनिटी तयार होते.
लसीमुळे आपले कोरोनापासून 80 ते 90 टक्के संरक्षण होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळेच लस घेतल्यानंतरसुद्धा कोरोना होण्याची शक्यता नजरेआड करता येत नाही. वस्तुतः विविध लोकांमधील रोगप्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. लसीकरणानंतर एकाची रोगप्रतिकारशक्ती खूपच वाढली आणि एखाद्यावर अपेक्षित परिणाम झाला नाही असे घडू शकते. त्यामुळे एकच लस दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये दोन वेगवेगळे परिणाम दाखवू शकते. त्यामुळेच लस घेतल्यानंतर कोरोना होणारच नाही, असे छातीठोकपणे सांगणे शक्य नाही. म्हणूनच लस घेतल्यावरसुद्धा कोरोनापासून बचावासाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे शंभर टक्के पालन झाले पाहिजे. आगामी काळात मोठय़ा प्रमाणावरील लोकसंख्येला लसींचे दोन डोस दिले जातील. हे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोना झालेली काही उदाहरणे दिसू शकतील; पण त्यांची संख्या अत्यल्प असेल. याउलट मोठय़ा प्रमाणावर म्हणजेच जवळपास 80 ते 90 टक्क्के लोकांच्या शरीरामध्ये कोरोनाविरोधातील संरक्षण कवच तयार झालेले असेल.
रोगप्रतिकारशक्तीचा विचार करायचा झाल्यास दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद अशा दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये जे सर्वेक्षण झाले, त्यानुसार बहुतांश लोक ‘सीरो पॉझिटिव्ह’ असल्याचे आढळून आले आहेत. म्हणजेच, बऱयाच लोकांना कोरोना होऊन गेला आहे, परंतु महाराष्ट्र आणि केरळमधील मध्यम आणि लहान आकाराच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. त्याचे कारण असे की, लहान शहरांमध्ये लोक ‘सीरो पॉझिटिव्ह’ लोक कमीच आढळतात. म्हणजेच, ज्या कालावधीत संसर्ग मोठय़ा प्रमाणावर होत होता, त्या कालावधीत हे लोक संसर्गापासून बचावले. त्यामुळे त्यांच्यात अँटिबॉडीज तयार होऊ शकल्या नाहीत. त्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. एक गोष्ट मात्र तूर्तास निश्चित आहे ती अशी की, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊन पोहोचलो आहोत, परंतु त्याचबरोबर हेही समजून घेतले पाहिजे की, जी खबरदारी आपण सुरुवातीपासून घेत आहोत, त्याबाबत अजिबातच बेफिकिरी दाखवता कामा नये. लस टोचून घेतल्यानंतरसुद्धा मास्कचा वापर नियमितपणे केला पाहिजे. हात सॅनिटाईझ करत राहिले पाहिजे, एकमेकांत शारीरिक अंतर राखले पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. तरच आपण कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकू.
(लेखक ‘सीआयएसआर’चे महासंचालक आहेत.)






























































