निरागस – जीवन

>> शमिका कुलकर्णी (आहारतज्ञ)

पाणी आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्यामुळे, अतिउकाडय़ामुळे, अतिश्रमामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. शरीरात पाणी कमी झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पाणी पुरेसा आणि सतत पिणे गरजेचे असते. आता उन्हाळ्याची चाहूल लागताच शरीराला पाण्याची गरज जास्त वाटेल. पाणी पुरेसे पिण्याचे अनेक फायदे –

  • पाणी पुरेसे प्यायल्याने डिहायड्रेशन होत नाही. थकवा येत नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित असल्यामुळे शरीराच्या रासायनिक क्रिया योग्य चालू राहतात.
  • अनेक वेळा तहान लागली असली तरीसुद्धा भूक लागल्याचा भास होतो, गोड किंवा चटपटीत खावंसं वाटते. म्हणून अशा वेळी आधी पाणी प्यावे. मग तरीही भूक लागली तर योग्य आहार घ्यावा.
  • पाण्याच्या योग्य पुरवठय़ामुळे शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकण्यास सोपे जाते. डिटॉक्स होण्यास मदत होते.
  • झोपण्याआधी पाणी प्यायल्याने झोप शांत लागते, शरीरात रात्रभर पुरेसा पाणी पुरवठा होतो, त्यामुळे सकाळीही मरगळ भासत नाही.
  • पाण्याने पचनक्रिया सुधारते, ऍसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत नाही.
  • पाणी शरीराला अत्यावश्यक आल्यामुळे शरीरातील प्रत्येक क्रियेला पाण्याची गरज लागते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मन शांत राहतं, ताण कमी करण्यास मदत होते, एकाग्रता वाढते.
  • सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्याचा समावेश सतत असला पाहिजे. यामुळे कोणत्याही वेळी शरीरात पाण्याची कमतरता होत नाही आणि इतर समस्याही उद्भवत नाहीत.
  • कोमट पाण्यात हळद, सुंठ, लवंग, दालचिनी पूड घातल्याने ते अधिक आरोग्यदायी होतं. पाण्याच्या ऐवजी बिनसाखरेची पेयं जसे लिंबूपाणी, ग्रीन टी, ताक, नारळपाणी प्यावे.

    पण पाणी आरोग्यदायी असलं तरी त्याचा अतिरेक करू नये. ऋतूनुसार पाण्याची गरज बदलते. त्यामुळे एका वेळेस खूप पाणी पिऊ नये तर सतत थोडे थोडे पाणी दिवसभर प्यावे. पाण्याऐवजी फळांचे रस किंवा कृत्रिम पेये पिणे अयोग्य आहे. शुगरफ्री पेयांचा समावेश आहारात करू नये.

आपली प्रतिक्रिया द्या