फिरस्ती- वाघोबाचा जीवघेणा खेळ!

>>प्रांजल वाघ

सर, टायगर दिसतोय! फेअरीचा बछडा रस्त्यावर दिसतोय!”, असं म्हणत आमच्या जिप्सीच्या ड्रायव्हरने गाडी पिटाळली. मातीचा धुरळा हवेत उडवत, उमरेड-काऱहांडला व्याघ्र प्रकल्पातील रस्ते कापीत आम्ही साधारण 15-20 मिनिटांत वाघ जिथे होता तिथे पोहोचलो.

उमरेडच्या जंगलातील फेअरी वाघिणीला तीन पिल्लं होती. साधारण दीड वर्षाच्या वाघाचे बछडे म्हणजे मनुष्याच्या 15-16 वर्षांच्या मुलांसारखे असतात. अंगापिंडाने बऱयापैकी मजबूत असले तरी या बछडय़ांना स्वतहून शिकार करता येत नाही. त्यामुळे ही पोरं आईवरच निर्भर असतात. या वयात आई त्यांना शिकार करायला शिकवत असते. आम्ही साधारण 5-530 वाजता डेरेदार वृक्षाच्या सावलीत गाडी लावून वाघ दिसण्याची वाट बघत असताना आमच्या गाइडला वाघ दिसल्याची माहिती मिळाली. आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो.

पाहतो तर काय, फेअरीचा ‘मुलगा’ एका रानडुकराच्या पिल्लासोबत ‘खेळत’ होता! रक्तबंबाळ झालेलं ते बिचारं पिल्लू वाघाच्या तावडीतून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते, पण वाघ कसला ऐकतोय? जरा कुठे पळण्याचा प्रयत्न सुरू झाला की, त्याच्या पंजाचा एक फटका त्या पिल्लाला पडायचा आणि ते काही क्षण सुन्न व्हायचे, निपचित पडून राहायचे. वाघाच्या पंजाचा फटका जबरदस्त शक्तिशाली असतो. वाघाच्या एका पंजाच्या फटक्यात एखाद्या पैलवानाचं मुंडकं उडवून लावू शकतो, तिथे या पिल्लाची काय गत? धारदार नखांनी त्याला बरंच जखमी केलं होतं आणि मध्ये मध्ये वाघ त्याचे चावे घेत होता. हे सगळं करताना आजूबाजूला जमा झालेल्या गाडय़ांवर त्याचा एक डोळा होताच.

त्या पिल्लाची हालत पाहून आम्हाला खूप वाईट वाटत होतं. पण एरवी सुंदर भासणारा निसर्ग असाच निष्ठुर आणि ाtढर असतो. एरवी गोंडस दिसणाऱया वाघाच्या बछडय़ाचं ाढाwर्य पाहून काहींनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली खरी, पण तो त्याला निसर्गाने घालून दिलेल्या ‘धर्माचं’ पालन करत होता. वास्तविक त्या छोटय़ा वाघोबाला शिकार करणं ठाऊक नव्हतं. तो नुसताच आपली नखं, जबडा आणि पंजे वापरण्याचा सराव करत होता. वाघ, बिबटे आणि आपल्या घरगुती मांजरी मारण्यापूर्वी अनेकदा आपल्या सावजासोबत असेच खेळतात.

एव्हाना त्या वाघाचं नाक आणि ओठ रक्ताने लाल झालं होतं आणि पंजाखाली धरलेलं ते पिल्लू निपचित पडलं होतं. इतक्यात आमच्यामागून एक गाडी आली आणि त्याचं लक्ष विचलित झालं. सावजावरची पकड ढिली झाली आणि ही संधी साधून रानडुक्कर चपळतेने उठलं आणि ठेचकाळत, धडपडत, तिथून जीव वाचवत पळू लागलं. डुक्कर पळताच वाघाचं लक्ष त्याच्याकडे गेलं, पण तो शांतपणे पाहत राहिला. काही क्षण पिल्लाला ‘स्वातंत्र्य’ उपभोगू दिलं आणि मग परत धावत जाऊन त्याला एक ठोसा लगावला. त्या फटक्याने भेलकांडत ते पिल्लू बाजूच्या गवतात जाऊन पडलं. आम्हाला वाटलं, सगळा खेळ संपला. पण काय आश्चर्य! ते पिल्लू परत उठून चालू लागलं. सैरभैर झालेलं, इतका मार खाऊनही ते पुन्हा वाघाकडे चालत आलं आणि त्याच्या पायांमधून पळ काढायला बघतंच होतं तर या वाघाने काय करावं?

अजूनही लहान असलेल्या या वाघाच्या बछडय़ाला ‘किलिंग स्ट्रोक’ मारणं ठाऊक नव्हतं. काय करावं हे त्याला सुचेना आणि म्हणून तो सरळ त्या डुकराच्या पिल्लावर बसला. इतकं वजनदार धूड अंगावर बसल्यावर त्या चिमुकल्या डुकराची शुद्धच हरपली. आम्ही सगळे थक्क होऊन हे पाहत असताना आमचा गाइड म्हणाला,“सर, आपली वेळ संपत आली आहे. निघायला हवं!” आणखी थोडा वेळ थांबण्याच्या विनवण्या करूनदेखील अभयारण्याचे नियम आम्ही मोडू शकत नव्हतो. नाईलाजाने निघावं लागलं. निघता निघता मागे वळून पाहिलं तेव्हा फेअरीचा हा मुलगा डुकराच्या पिल्लाला घेऊन झाडीत घुसला होता. त्या संध्याकाळी रानडुकराचा अंत लिहिलेला होता. प्रश्न होता, शेवटचा घाव कधी पडेल हा!!!

आम्हाला त्या पिल्लाचे हाल बघून खूप वाईट वाटले, पण त्याच वेळी एखाद्या वाघाच्या बछडय़ाला शिकार कशी करायची याचा ‘स्वाध्याय’ करताना पहिल्यांदाच आम्ही पहिले होते! हे दृश्य मनात साठवून आम्ही परतीच्या वाटेला लागलो!

खरंच, निसर्ग जितका सुंदर तितकाच तो निर्दयी असतो!

[email protected]