
>> सीए अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
शक्ती ही आपल्या पुराणांमध्ये स्त्री रूपामध्ये दर्शविली आहे. हीच शक्ती म्हणजे योग तत्त्वज्ञानातील प्रकृती होय. या प्रकृतीपासून सृष्टीचा उद्भव झाला. योग आणि अध्यात्म या दोन्हींचा उगम जितका भगवान शंकरांपासून आहे, तितकाच माता पार्वतीपासूनही आहे.
योगमाया
ही प्रकृती, शक्ती अत्यंत प्रभावी आहे. या प्रकृतीच्या अधीन सर्व प्राणी राहतात आणि आपल्या मूळ आत्मस्वरूपाची त्यांना विस्मृती होते. म्हणूनच या शक्तीला ‘योगमाया’ असेही म्हणतात. या मायेच्या पाशातून सुटून आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्यासाठी आणि अनुभूती होण्यासाठीच योग आणि अध्यात्म आहे. या योगमायेला योगेश्वर शिव आणि विष्णू यांच्या बरोबरीचे स्थान दिलेले दिसून येते. हिंदुस्थानातील स्त्रियांनी प्राधान्याने कर्मयोगाचे अनुसरण केलेले दिसते आणि म्हणूनच संसारातून निवृत्ती घेऊन संन्यास धारण करण्याऐवजी प्रपंच नेटका करून आध्यात्मिक प्रगती साधण्याकडे आपल्याकडील स्त्रियांचा कल दिसून येतो.
हठयोग आणि शाक्त पंथ
हठयोग हा विशेषकरून देवीची उपासना करणाऱया आणि शाक्त पंथामध्ये अनुसरलेला दिसून येतो. देवीच्या काही शक्तिपीठांमध्ये तंत्र साधना आणि हठयोग यांचे अनुसरण होताना दिसते.
योगिनी आणि विदुषी
प्राचीन काळापासून आपल्या देशात अनेक योगी स्त्रिया झालेल्या दिसून येतात. शक्तीची देवता माता पार्वती, धनदेवता माता लक्ष्मी आणि विद्येची देवता माता सरस्वती या सर्वप्रथम येतात. यानंतर गार्गी, मैत्रेयी येतात. लोपामुद्रा, अनुसूया आणि अरुंधती या ब्रह्मवादिनी स्त्रियांचेही उल्लेख प्राचीन हिंदुस्थानात दिसून येतात. राणी चुडाला ही तिचे पती राजा शिखिध्वज यांची आध्यात्मिक गुरू होती. आधुनिक काळामध्ये भैरवी योगिनी हिने रामकृष्ण परमहंसांना तंत्रमार्गाची दीक्षा दिली होती. अर्थात, भैरवी योगिनी ही रामकृष्ण परमहंसांची तांत्रिक मार्गाची गुरू सिद्ध होते.
गोरक्षनाथांचे शिष्य गहिनीनाथ यांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली आणि त्या परंपरेमध्ये मुक्ताबाईंनाही दीक्षा मिळाली मुक्ताबाईंपासून विसोबा खेचर यांनी दीक्षा घेतली आणि नंतर त्यांच्याकडून नामदेवांनी दीक्षा घेतली. अर्थात महाराष्ट्रातील संत परंपरेमध्येही स्त्रीचे स्थान प्रमुख आहे. संत जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, कान्होपात्रा या प्रमुख संत स्त्रिया होत.
www.bymyoga.in




























































