लेख – स्त्रीशक्तीचा जागर आणि सन्मान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रामकृष्ण पांडुरंग पाटील

8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल. आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात.

जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सर्वत्र साजरा होईल. अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. त्यांनी त्यांच्या कामात केलेल्याचे यशोगान गायले जाते. मात्र फक्त याच दिवशी महिलांचा सन्मान न करता तो रोजच व्हायला पाहिजे. महिला दिवस म्हणजे महिलांचा सन्मान वर्षातून एकदाच करायचा का? एक दिवस नाही तर प्रत्येक दिवस महिला दिवस समजून त्यांचा मानसन्मान केला पाहिजे तर तो दिवस महिलांसाठी आनंदाचा असेल.

पूर्वी महिलांविषयी फक्त चूल आणि मूल असं म्हटलं जायचं. म्हणजे महिला म्हणजे फक्त घरात स्वयंपाक व घरची इतर कामे आणि मूलबाळ सांभाळायचं एवढंच तिचं काम असं मानलं जायचं. पण आज परिस्थिती बदललेली आपल्याला दिसतेय. आज महिला या चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. पूर्वी जिथं महिला चार लोकांसमोर बोलायला घाबरत होती किंवा तसं वागल्यावर कमीपणा समजला जायचा त्याच महिलेच्या हाताखाली पन्नास पन्नास लोकं काम करताना आपल्याला दिसतंय. म्हणून तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान व विविध पुरस्कार मिळताना आपण पाहतोय व ऐकतोय.

खरंच आता जग बदललं तशी विचारसरणी पण बदलली ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आज आपण महिलांना संधी देतोय. प्रत्येक कुटुंबात आपली मुलगी शिकली पाहिजे, तिने नोकरी केली पाहिजे असा विचार आज प्रत्येक आईवडील करताना आपल्याला दिसतात. पूर्वी या गोष्टी खूप कमी पाहायला मिळायच्या. आणि समजा एखाद्या वेळेस आईवडील आपल्या मुलीला शिकवायचं आहे आणि जेव्हा ती मुलगी शिकू लागायची तेव्हा तिला व तिच्या आईवडिलांना समाजाचा इतर घटकांशी खूप सामना करावा लागायचा. कारण त्या काळात 15 ते 17 या वयोगटातच मुलीचं लग्न करून मोकळ व्हायचे आणि मनातल्या मनात एक सुटलो बाबा एकदाचा असा सुटकेचा श्वास घ्यायचे. पण आज सर्व बदलले आहे. आज महिला स्वतंत्ररीत्या जगत आहेत, त्यांचे निर्णय त्या आज स्वतः घेऊ लागल्या आहेत. म्हणून तर आज विमानाच्या पायलटपासून तर मेट्रोच्या पायलट पर्यंत त्या आपल्याला पाहायला मिळतात. जिथं महिलेला कमी समजलं जायचं किंवा हे महिलाच काम किंवा हे महिला करू शकत नाही असं समजलं जायचं तिथं आज महिला आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करताना आपण पाहतोय. त्याच महिला पूर्वी घराबाहेर निघायला घाबरायच्या त्याच महिला आज परदेशात नोकरी करून आकाशाला गवसणी घालताना आपल्याला दिसत आहेत. बाकी काहीही असो, 8 मार्च म्हणजे महिलांसाठी नारीशक्तीचा सण म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण आज आपण त्यांना त्यांच्या केलेल्या कामाबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार केला तर त्या त्यांच्या पुढील वाटचालीस नक्कीच प्रेरणा मिळेल व दुसऱया महिला ज्या आज पण घराबाहेर पडायला किंवा काही काम किंवा नोकरी करायला थोडं लाजत आहेत किंवा थोडं समाजाला घाबरत असतील त्यांनासुद्धा या यशस्वी महिलांचा सत्कार व सन्मान पाहून त्यांच्या मनातसुद्धा वाटेल की या महिला करू शकतात तर आपण का नाही? इतर माहिलांसारख्या त्या पण घराबाहेर पडतील आणि त्यांना ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टी त्या करू लागतील. म्हणून ज्या महिला अजून पण स्वतःला मी एक महिला आहे आणि नोकरी करणे आपल्याला जमेल का अस विचार करत असतील तर त्यांनी एक विचार करावा की, आपल्या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या पण एक महिला होत्या. त्यांनी पण त्या वेळेस असा विचार केला असता तर त्या राष्ट्रपती झाल्या असत्या का? म्हणून आपण महिला आहोत आणि आपण हे करू शकत नाही हा विचार काढून, हो मी हे करू शकते असा विचार करून ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे तिथं काम करा. आपल्याला नक्कीच यश मिळेल.