ठसा : डॉ. यशवंत पाठक

277

>> प्रशांत गौतम

साहित्य आणि संत साहित्याच्या क्षेत्रात मौलिक योगदान देणारे डॉ. यशवंत पाठक गेले. त्यांच्या निधनाने या दोन्ही क्षेत्रांची अपरिमित हानी झाली. मराठी आणि संस्कृत या दोन्ही विषयांत त्यांचा हातखंडा होता. त्यामुळेच ते दोन्ही भाषेत एम.ए.ची पदवी यशस्वीरीत्या प्राप्त करू शकले. वडील गौतमबुवा कीर्तनकार होते. त्यांच्या संस्कारांमुळे यशवंत पाठक कीर्तन परंपरेचा सखोल अभ्यास करू शकले. संत साहित्याचे बाळकडूही यशवंतरावांना वडिलांकडून मिळाले. 1978 साली त्यांनी हाच विषय पीएच.डी. साठी निवडला. पुणे विद्यापीठातून ही पदवी त्यांनी उत्तम अभ्यासाने प्राप्त केली. ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ (प्रबंध) ‘अंगणातले आभाळ’ (आत्मकथन), ‘येणे बोधे आम्हा असो सर्वकाळ’, (सोनोपंत दांडेकर यांचे अभ्यासपूर्ण चरित्र), ‘निरंजनाचे माहेर’ (समीक्षा) या चार पुस्तकांना शासनाचे राज्य पुरस्कार प्राप्त झाले. त्याचप्रमाणे ‘ब्रह्मगिरीची सावली’(ललीत), ‘मोह मैत्रीचा’, ‘आभाळाचं अनुष्ठान’, ‘मनाच्या श्लोकाचे मर्म’, ‘चंद्राचा एकांत’, ‘आनंदाचे अवतार’, ‘नक्षत्रांची नाती’(व्यक्तिचित्रे), ‘तुकारामाचे निवडक अभंग’, ‘समर्थांची स्पंदने’ (समीक्षा) अशी साहित्य संपदा पाठक यांच्या नावावर आहे. मनमाड येथे म. फुले महाविद्यालयातून 36 वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त झाले. पुढे पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात संत ज्ञानेश्वर अध्यासन केंद्रात प्रमुख प्राध्यापक म्हणून कार्य केले. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक अशी ओळख लाभलेल्या पाठक यांची ज्ञानेश्वरीवरील व्याख्याने ऐकणे, विविध अ.भा. मराठी साहित्य संमेलनांच्या व्यासपीठावरून परिसंवादात केलेले मनोज्ञ चिंतन हे अभ्यासपूर्ण असे. डॉ. पाठक यांनी दिलेल्या संत साहित्य, साहित्य या क्षेत्रातील लेखन योगदानसाठीचा सन्मान ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’, ‘संत ज्ञानदेव’, ‘संतकवी विष्णुदास’, ‘उत्तुंग’, ‘निर्भय’, ‘महात्मा फुले’, ‘संत साहित्य’, ‘संत सेवा’, ‘प्रा. पा. ना. कुलकर्णी’ आणि ‘चतुरंग’ आदी पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. ‘राष्ट्रसंतांचे महाराष्ट्रात योगदान’ या विषयावर पाठक यांनी महाराष्ट्रभर व्याख्यान दिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेवर ते अतिशय रसाळ पद्धतीने विवेचन करीत असत. ‘विवेक आणि वैराग्य’ या विषयावर त्यांनी मांडलेले चिंतन खरोखरच विचार प्रवर्तक आहे. पाठक या विषयाचे समग्र चिंतन मांडताना म्हणतात, विवेक आणि वैराग्य म्हणजे आदर्श मानवी जीवनासाठी लागणाऱया अपरिहार्य पायऱया आहेत. विचारांना जाणिवेची जोड मिळते. तेथे विवेक जन्म घेतो, सुख-दुःखाची बाधा न होण्याचा अभ्यासही होतो व तेथे वैराग्य जन्म घेते. कर्तव्य समजून प्रपंचरत राहताना त्यातील लिप्तपणा टाळण्याचे कसब साधले गेले की, हा प्रपंचाचा देव्हारा बनतो. समर्थांचा विवेक वैराग्यवाद या विषयावर प्रकाश टाकताना पाठक म्हणतात, केवळ विचार उपयोगाचा नाही तर विचाराला जाणिवेची जोड असली पाहिजे. असे झाले म्हणजे विवेक प्रकटतो. विचार हा निरीक्षणातून जन्म घेतो, निरीक्षण हे तपशिलातून येते, तपशील तारतम्य भावातून जन्म घेतो, तर तारतम्य द्वैतातून जन्म घेते. अन् द्वैत ‘मी’पणातून जन्मणाऱया अधोगतीला नेणाऱया नुसत्या विचाराला जाणिवेची जोड दिली गेल्यास जीवनाचे साध्य माणसांच्या दृष्टिक्षेपात येते. विवेकाचीही पाठक यांनी फार सुंदर व्याख्या केली आहे. त्यांच्या निरूपणात ते संत ज्ञानेश्वरांचे एक वचन उद्धृत करतात. ‘चंद्र तेथे चंद्रिका। संत तिथे विवेक’।। समृद्ध मानवी जीवनाची पायाभरणी करणारा विवेक हा संतांच्या ठिकाणी वास करतो. त्यासाठी आपण संतचरणाची महत्त्वाकांक्षा जीवनात ठेवून अनोखी अनुभूती घेतली पाहिजे, असे रसाळ विवेचन पाठक मांडत. ‘सगुण-निर्गुण’ या शीर्षकाचे पाठक यांनी एका दैनिकासाठी प्रदीर्घ काळ सदर लेखन केले. त्याचे पुस्तकही आले. या पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने त्यांनी सखोल चिंतन अभ्यासकांसमोर ठेवले. सगुण-निर्गुण हे सदर संत साहित्याशी थेट संबंधित नाही तर अध्यात्माची वैयक्तिक अनुभूती त्यातून मांडली. डॉ. यशवंत पाठक हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक म्हणून सर्वश्रुत होते. संत ज्ञानेश्वर हे ऊर्जास्रोत आहे. यासंदर्भात त्यांचे रसाळ विवेचन अनेकदा ऐकले. ‘‘जे जगणं सहज असतं, तिथं अस्सलता असते. आपण दिखावू जगतो. वारीतल्या वारकऱयांच्या जगण्यातील सहजता आणि प्रेम बघून अंगावर काटा येतो. त्यांना जगण्याची ऊर्जा ही ज्ञानेश्वरीतून मिळते, किंबहुना ‘ज्ञानेश्वरी’ हाच वारकऱयांच्या जगण्याचा आधार असतो. एका प्रवचनात पाठक यांनी ‘माऊली’ या शब्दाचा रसाळ अर्थ उलगडून सांगितला होता. त्यात ते म्हणतात, ‘माऊली’ या शब्दाचा खरा अर्थ मानवता, उदात्तता आणि लीनता हाच आहे. ही मूल्ये अंगभूत करून विश्वासाला कवेत घेतो, त्याला आपण माऊली म्हणतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत कोणतीही क्रतवैकल्ये, पूजा सांगितली नाही. आपल्याकडे कोणत्याही संतांनी चमत्कार सांगितला नाही, असे सांगत पाठक त्यासाठी ज्ञानेश्वरील ओव्यांचे दाखले देतात. भक्तीची साक्षेपी मीमांसा मांडताना पाठक सांगतात, ‘भक्ती ही वृत्तीत असते, ती सहज होते. भक्तास स्थिर वृत्तीची गरज लागते, त्याला प्रदर्शन अथवा डेकोरेशनची गरज लागत नाही. निरपेक्ष आणि निरागस भाव त्यासाठी आवश्यक असतो. डॉ. यशवंत पाठक यांच्या निधनाने आपण संत साहित्याचा गाढा अभ्यासक गमावला आहे. थोर प्रतिभावंत सारस्वत आता चिरंतनाच्या प्रवासास निघून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या