रोखठोक – त्यांनीही बांगडय़ा भरलेल्या नाहीत!

अखेर निवडणूक प्रचारात पाकिस्तान आलेच. पाकिस्तानला बांगडय़ा घालायला लावू, अशी गर्जना नरेंद्र मोदी यांनी केली. पाकिस्तानच्या अणुबाम्बला घाबरत नसल्याचे मोदींनी जाहीर केले. जिंकण्यासाठी मोदी त्यांचे लोक काहीही करू शकतात. त्यांनीही बांगडय़ा भरलेल्या नाहीत!

पाकिस्तानला बांगडय़ा घालायला लावू,” अशी नवी गर्जना पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केली. पाकिस्तानकडे अणुबाम्ब आहे. त्यामुळे आपणही जपून राहिले पाहिजे, अशी पोपटपंची काँग्रेसच्या मणिशंकर अय्यरसारख्या नेत्यांनी केली ती मोदी यांच्या पथ्यावरच पडली. तेव्हापासून त्यांनी भाजपच्या प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा जिवंत केला. मोदी पाकिस्तानला बांगडय़ा घालायला लावणार आहेत, पण कधी? हा प्रश्न आहे. नवाज शरीफ यांना स्वत:च्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी वेळी खास निमंत्रण देणारे मोदीच होते व त्यानंतर शरीफ यांच्या वाढदिवशी खास शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानात उतरणारे व शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापणारे मोदीच होते. पाकिस्तानने उरीपासून पुलवामापर्यंत अनेक हल्ले करूनही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानच्या हातात बांगडय़ा भरल्या व स्वाभिमानी बाणा दाखवला असे कधीच दिसले नाही. भाजप व त्यांच्या लोकांना प्रचारात पाकिस्तानचा विषय हवाच आहे व असे मुद्दे त्यांना काँग्रेसवालेच मिळवून देतात. पाकव्याप्त कश्मीर आम्ही पुन्हा भारतात आणू. म्हणून भाजपला मते द्या, असे आवाहन अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पालघर येथे केले. पालघर हा आदिवासींचा राखीव मतदारसंघ. भाजपने आदिवासींच्या वन जमिनीचे हक्कच नाकारले. त्यावर अमित शहा बोलत नाहीत. पाकव्याप्त कश्मीर भारतात आणू असे ते आदिवासींना सांगतात. गेल्या दहा वर्षांत पाकव्याप्त कश्मीर भारतात आणण्यापासून यांना कोणी रोखले होते? पाकव्याप्त कश्मीरची भाषा निवडणूक प्रचारात व तीही पालघरच्या आदिवासी भागात करण्यापेक्षा श्रीनगरात जाऊन करायला हवी. मोदी-शहा पाकिस्तानवर बोलतात. मग एकनाथ शिंदे तरी मागे कसे राहतील. काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत व आता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत, असे शिंदे म्हणतात. नरेंद्र मोदी हे देशाचे संविधान बदलू इच्छित आहेत व त्यासाठी त्यांनी भ्रष्ट मार्गाने 400 जागा जिंकायचे ठरवले आहे, हे सत्य गांधी मांडतात, यात पाकिस्तानचा संबंध कोठे आला? सत्य असे की, मुसलमान, पाकिस्तान असे विषय घेतल्याशिवाय या मंडळींचा प्रचार पूर्णच होत नाही.

प्रिय देश!

पाकिस्तान हा भाजपचा, म्हणजेच मोदी-शहांचा प्रिय देश आहे. पाकिस्तानमध्ये लोकशाही नाही. मोदी-शहा यांनी पाकिस्तानप्रमाणेच भारतातील लोकशाही खतम केली. पाकिस्तानात निवडणूक आयोग, न्यायालये, निवडणुका हा फार्स ठरतो. भारतात सध्या त्यापेक्षा वेगळे चित्र नाही. राजकीय विरोधकांच्या हत्या, त्यांना तुरंगात टाकायचे, शरण आणायचे हे पाकिस्तानात नेहमीच चालते. इम्रान खान, नवाज शरीफ यांच्यासारखे नेते एकाच तुरंगात आहेत किंवा परागंदा आहेत. मोदींच्या भारतात हाच पाकिस्तानी फार्म्युला वापरला जात आहे. सर्व घटनात्मक संस्था पाकिस्तानात लष्करी सत्ताधीशांच्या हाती गुदमरल्या आहेत. भारतात ते स्थान संघ परिवार, मोदी-शहांसारख्या लोकांनी घेतले. पाकिस्तान प्रत्येक घडलेल्या गोष्टीमागे भारताला दोष देते. भारतीय नेते पाकिस्तानावर खापर फोडतात. पाकिस्तानची अर्थव्यवस्था मूठभर जमीनदारांच्या हाती एकवटली. भारतात मोदी-शहांच्या मित्रांनी अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवला. मोदी-शहांकडे मुसलमान व पाकिस्तान याशिवाय प्रचाराचे कोणतेही मुद्दे नाहीत. देशाचा पंतप्रधान फक्त प्रचार सभा घेत सुटला आहे व वेळ मिळेल तेव्हा ‘रोड शो’देखील करतो. हे सर्व त्यांना पंडित नेहरूंमुळे करावे लागते का? नेहरूंनी विज्ञानाची कास धरली. तशी पाकिस्तानने धरली नाही. विज्ञान आणि विचारांचा आधार घेऊन नेहरू पुढे गेले. तसा पाकिस्तान गेला नाही. त्या पाकिस्तानचा जप सध्याचा भाजप रोज करतोय.

2029 लाही तेच

पाकिस्तानला बांगडय़ा भरायला लावू, असे मोदी म्हणतात. 2029 च्या निवडणुकीतही ते याच बांगडय़ांचा खणखणाट करतील. अणुबाम्ब जसा पाकिस्तानकडे तसा तो भारताकडेही आहे. भारताने त्याचा उपयोग पाकिस्तानवर केला नाही. पाकिस्तानने उद्या अणुबाम्ब टाकायचेच ठरविले तर तो भारतावरच टाकणार हे उघड आहे. तो दिल्लीवर टाकला तर काय होईल, याबद्दलची माहिती एका तज्ञाने दिली होती. ब्लास्ट, हीट व न्यूक्लिअर रेडिएशन असे तीन परिणाम अणुबाम्बचे होतात. तीन हजार मीटरवर 20 केटी अणुबाम्बचा स्फोट केला तर दोन किलोमीटरच्या परिसरातील दिल्लीची सर्व दुमजली घरे जमिनदोस्त होतील. साडेतीन किलोमीटरपर्यंतची सर्व माणसे मृत अगर जखमी होतील. आगी लागतील. असंख्य लोक आंधळे व विकलांग होतील. ती राख उडत अंतराळात जाईल आणि ती जेथे पडेल तेथे लोकांना आयुष्यभर त्रास होईल. व्याधी जडतील. जमिनीवरच 20 केटी अणुबाम्बचा स्फोट केला तर 250 किलोमीटर्सपर्यंतच्या भूभागातील सहा लाख लोक ठार होतील. 10 लाख लोक जायबंदी होतील. भारताने पाकिस्तानवर अणुबाम्ब टाकायचे ठरवले तर यापेक्षा जास्त हानी होईल. कारण त्यांचा देश लहान आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात अणुबाम्ब वगैरेंचा मुद्दा जे लोक आणू पाहत आहेत तो प्रकार निरर्थक आहे. मणिपूर अशांत आहे. तेथे मोदी शांतता आणू शकलेले नाहीत. तिकडे लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आहे. त्यांना मोदी बाहेर ढकलू शकलेले नाहीत. कारण बांगडय़ांचा खणखणाट आपल्याच देशात सुरू आहे. पाकिस्तानच्या निवडणुका या एकतर्फी पद्धतीने होतात. मोदी तोच प्रकार आपल्या देशात करू पाहतात. पाकिस्तानात संविधान असे नाहीच. मोदी यांना भारतातील संविधान नष्ट करून स्वत:चे संविधान नव्याने आणायचे आहे. हे सर्व करण्यासाठी त्यांना भारतात मोठे बहुमत मिळवायचे आहे. मोदी काय करू शकतात ते कल्पनाशक्तीपलीकडे आहे. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी हे पाकव्याप्त कश्मीरात सैन्य घुसवतील. पाकिस्तानच्या कंगाल राज्यकर्त्यांना पाचशे-हजार कोटींची बिदागी देतील व पाकव्याप्त कश्मीरात लुटुपुटुची लढाई करून भारतातील मतदारांना प्रभावित करतील. हे असे देशातील लोकांना वाटते. कारण पाकिस्तान व मुसलमान नसतील तर सध्याचा भाजप नाही. मोदी-शहा तर नाहीच नाही. ते जिंकण्यासाठी काहीही करू शकतात.

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]