
>> मेधा पालकर
लहान वयात तुमच्यामध्ये एखादी गोष्ट करायची जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्हाला यशापासून कोणीच अडवू शकत नाही. पुण्यातील अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीने हे सिद्ध करून दाखवले आहे. इतक्या लहान वयात देशना नहार हिने ‘लिंबो स्केटिंग’ या प्रकारामध्ये ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव कोरत भारताचे आणि पुण्याचे नाव मोठे केले आहे. याआधी चीनमधील एका मुलीने 2015 मध्ये असाच विक्रम 14.15 सेकंदांत पूर्ण केला होता. देशनाने तिचा विक्रम मोडत ही कामगिरी केल्याने तिचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
लिंबो स्केटिंग हा काय खेळ आहे? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर सामान्य स्केटिंग न करता पाय पूर्ण स्ट्रेच करून हे स्केटिंग केले जाते. मेहनत आणि सरावाच्या जोरावर देशनाने केवळ 13.74 सेकंदांमध्ये 20 चारचाकी गाडय़ांखालून 193 फूट अंतर स्केटिंग करत पूर्ण केले आहे. लहान वयात तिने केलेली ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आणि देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. चारचाकी गाडीखालून स्केटिंग करत असताना अनेकदा इजा होण्याची शक्यता असते. देशनालाही हा विक्रम करताना डोक्याला लहानमोठय़ा इजा झाल्या, पण तिने हार न मानता भरपूर सराव करत आपली चमक दाखवून दिली.
देशना पुण्यातील रॉक ऑन व्हील्स या स्केटिंग अॅकेडमीमध्ये विजय मलजी यांच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत असून आतापर्यंत तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. वयाच्या 5व्या वर्षापासून स्केटिंग करणारी देशना पुण्यातील हचिंग्ज स्कूलची विद्यार्थिनी असून ती आता तिसरीमध्ये आहे. तिचे वडील आदित्य रसिकलाल नहार बांधकाम व्यावसायिक असून या स्पर्धेसाठी त्यांनी बरीच तयारी केल्याचे ते म्हणाले. या वर्षी 16 एप्रिल रोजी क्लोव्हर प्लाझा मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये हे रेकॉर्ड करण्यात आले. त्या वेळी गिनीज रेकॉर्डमधून तीन निर्णायक या ठिकाणी आले होते. त्यांनी देशनाची कामगिरी पाहून सर्व स्तरांवर योग्य पद्धतीने चाचणी घेऊन तिला या रेकॉर्डचा मान देण्याचा निर्णय घेतल्याचे देशनाच्या वडिलांनी सांगितले.

























































