सृजन संवाद- रामराज्य – रामाच्या कल्पनेतले!

>> डॉ. समीरा गुजर जोशी

रामराज्य म्हणजे आदर्श राज्य! आजही उत्तम शासन म्हणजे रामराज्य! आता निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तर अनेकदा रामराज्याची ग्वाही दिली जात आहे, पण रामराज्य नेमके कसे असेल? त्याचे स्वरूप काय असावे? त्यात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा? याचे उत्तर रामायणातच एका ठिकाणी आपल्याला सापडते. तौलनिकदृष्टय़ा पाहिले तर रामायणापेक्षा महाभारतामध्ये राजकारणाची चर्चा अधिक सविस्तरपणे केलेली आहे, पण वाल्मीकी रामायणातही अनेक प्रसंग असे आहेत, जिथे राजनीतीचे वर्णन येते. असाच एक प्रसंग जो खरे तर आपणा सर्वांच्या परिचयाचा आहे, पण त्या प्रसंगी झालेली ‘ही’ चर्चा बहुधा आपल्याला ठाऊक नसते. हा प्रसंग म्हणजे राम-भरत भेटीचा प्रसंग. आजोळी गेलेला भरत अयोध्येला परतला. त्याला घडलेले  अशुभ वर्तमान कळले. आई कैकयीच्या हट्टामुळे रामाचे वनवासात जाणे, त्या दुःखाने दशरथ महाराजांचा झालेला मृत्यू हे सर्व कळल्यावर तो आपल्या आईवर संतापला. हे जे काही अकल्पित घडले होते ते बदलण्यासाठी त्याने रामाला परत आणण्याचे ठरविले. त्यासाठी तो वनात निघाला. त्याची आणि रामाची अशा विचित्र परिस्थितीमध्ये भेट होत होती.

मला नेहमीच हा प्रसंग आपल्या हिंदुस्थानी संस्कृतीतील आदर्शभूत प्रसंगांपैकी एक वाटतो. पहा ना! भाऊ-भाऊ एकमेकांशी प्रॉपर्टीवरून भांडत आहेत हे दृश्य आपल्याला सर्रास पाहायला मिळते, पण या ठिकाणी दोन भाऊ एकमेकांना म्हणत आहेत, “हे राज्य तुझे आहे. तू राज्य कर. मला नको हे राज्य.“ किती अद्भुत आहे हे!  हा हिंदुस्थानवासीयांसाठी बंधुत्वाचा आदर्श आहे. याच प्रसंगाच्या निमित्ताने रामाने भरताची कशी समजूत काढली हे गीतरामायणात ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गीतातून किती प्रभावीरीत्या रंगवले आहे, हे आपण सर्व जाणतो. ते गीत जणू जगण्याचे सार आहे. मूळ वाल्मीकी रामायणात याच प्रसंगी राम भरताला काही प्रश्न विचारतो असा प्रसंग आहे. भरत रामाला शोधत त्याच्या समोर येऊन ठेपला आहे. तेव्हा त्याची चौकशी करत असताना भरत आता नव्याने राज्य सांभाळणार या दृष्टीने रामाने त्याला अनेक प्रश्न विचारले आहेत? राजा म्हणून तू हे सारे करतोस ना? असे तो काळजीने विचारतो आहे. यामध्ये रामाला अपेक्षित राजाची कर्तव्ये आपल्या समोर येतात. त्यातून आपल्या डोळ्यांसमोर आपसूक रामाला अपेक्षित आदर्श राज्य कसे होते, याचे चित्र उभे राहते.

भरताने राजा म्हणून काय करणे अपेक्षित आहे हे रामाला सांगायचे आहे, पण तसा थेट उपदेश न करता तो हे तू करतोस ना? अशी विचारणा करतो आहे. समोरच्याचा मान आणि मन राखून उपदेश करण्याची ही खास स्टाइल मर्यादापुरुषोत्तम रामाला शोभून दिसणारी आहे. यात त्याने किती विविध विषयांना स्पर्श केला आहे! त्यातील बारकावे पाहण्यासारखे आहेत. देव, पितर, सेवक, गुरू, वृद्ध आणि विद्वान ब्राह्मण या सर्वांचा मान तू ठेवतोस ना? असे तो विचारतो. पुढे तो मंत्रणेचे अर्थात मसलतीचे महत्त्व सांगतो. राघवा, (रघुवंशी असल्यामुळे भरतही राघव आहे.) मसलत हे राजांच्या विजयाचे मूळ आहे. तू तुझ्यासारखेच शूर, बहुश्रुत, जितेंद्रिय, धोरणी असे मंत्री नेमले आहेस ना? तुझे मंत्री आणि अमात्य यांच्याबरोबर तुझ्या चर्चा गुप्तपणे चालतात ना? त्यांना विचारात न घेता केवळ स्वतच्या मनाने तू निर्णय घेत नाहीस ना? किंवा खूप सल्लागार गोळा करुनही चर्चा करत नाहीस ना?

कौटिल्य आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातही मंत्रिमंडळाला खूप महत्त्व देतो. तोही मंत्र्यांची संख्या किती असावी याविषयी चर्चा करतो. त्याचे मत आहे की, जे अंतरंग मंत्री आहेत (कॅबिनेट मिनिस्टर) ते खूप नसावेत. एकच मंत्री जवळचा असेल तर तो डोईजड होण्याची भीती! दोन असतील तर ते आपापसात भांडतील आणि खूप मंत्री असतील तर योजना गुप्त राहणे अवघड होईल. म्हणून तीन ते चार मंत्र्यांचे कॅबिनेट असावे. त्यातही एका योजनेवर एका वेळी दोनपेक्षा अधिक मंत्री नसावेत असेही तो सांगतो. तेव्हा रामाचा उपदेश हा कौटिल्याने केलेल्या उपदेशासारखाच आहे. त्याचवेळी राम किती प्रॅक्टिकल विचार करतो आहे पहा? तो भरताला विचारतो, “तू वेळेवर जागा होतोस ना? आणि वेळी – अवेळी निद्रेच्या स्वाधीन होत नाहीस ना?” योग्य वेळी झोपणे आणि पहाटे (ब्राह्म मुहूर्तावर) उठणे याचे महत्त्व आज जगाला नव्याने कळते आहे आणि ते सांगण्यात भारतीय विचारवंताचाच सहभाग मोठा आहे.

रॉबिन शर्मा याच्या  `5 AM Clubची लोकप्रियता तर आपण जाणतोच. सहसा मंत्रणा पहाटेच्या वेळी करावी असे रामाने सुचविले आहे. त्यासाठी वेळेवर उठणे गरजेचे आहे. शिवाय राजाचा संपूर्ण दिनक्रम अतिशय थकवणारा असतो. त्यात शारीरिक, बौद्धिक श्रम आहेत. त्यासाठी शरीराला आणि मेंदूला पूर्ण विश्रांती मिळायला हवी. म्हणून राम झोपेची चौकशी करतो आहे. हा उपदेश राम आजच्या काळात करत असता तर काय म्हणाला असता बरं? आज या प्रश्नावरच थांबू या. पुढील उपदेशाचे मुद्दे पुढील लेखात पाहू.

[email protected]

 (निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाची अभ्यासक)