ठसा – पंकज उधास

>> प्रशांत गौतम

चिठ्ठी आयी है वतन से चिठ्ठी आयी है’, ‘चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल’, ‘थोडी थोडी पिया करो’, ‘एक तरफ उसका घर…’ अशा जादुई गीतांनी गझल गायकीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणारे प्रख्यात गझलगायक पद्मश्री पंकज उधास यांच्या निधनाने गझलेचे विश्व पोरके झाले. गझलप्रेमींचे मन उदास झाले. गझल क्षेत्र आणि हिंदी सिनेमासृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून यायची नाही. गझलेच्या प्रांतात स्वच्छंदीपणे विहार करणारा मधाळ गळय़ाचा गायक आपल्या अजरामर गझल, सिनेगीत मागे ठेवून आता चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे.

गुजरातमधील जेतपूर येथे जमीनदार कुटुंबात 17 मे 1951 रोजी जन्म झालेल्या पंकज उधास यांचा प्रवास वयाच्या 73 व्या वर्षी विसावला. जमीनदार कुटुंब असले तरी संगीताचा वारसा वडील केशूभाई आणि आई जितूबेन यांच्याकडून लाभला. वडील शेतकरी होते व उत्तम इसराज वादक होते. तर पंकज यांचे बंधू मनहर आणि निर्मल यांनी संगीताचे शिक्षण राजकोट येथे संगीत अकादमीत घेतले होते. पंकज यांनी आपल्या मधाळ व गोड गळ्याने चित्रपट गीतांना लोकप्रियता प्राप्त करून दिली; मात्र संगीताचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चित्रपटसृष्टीचे महाद्वार काही लवकर खुले झाले नाही, यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला. पहिला चित्रपट ‘कामना’मध्ये त्यांनी सर्वात प्रथम गीत गायले; पण तो चित्रपट फार गाजला नाही. स्टेज शो करण्याच्या प्रवासात त्यांनी पहिला स्टेज शो स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत केला. या लोकप्रियतेनंतर ते गझलकडे आकर्षित झाले. गझल गायकी संपन्न आणि समृद्ध करायची तर चांगले उर्दू आले पाहिजे. यासाठी ते उर्दू शिकले. चिठ्ठी आयी है, चांदी जैसा रंग है तेरा, आप जिनके करीब होते है, एक तरफ उसका घर, एक तरफ मयकदा, मोहे आयी ना जग से लाज, ना कजरे की धार अशा गझलांची मैफल त्यांची कमालीची रंगत असे. दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ‘नाम’ चित्रपटात ‘चिठ्ठी आयी है’ ही गीत गझल कमालीची हिट झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रवासाकडे मागे वळून बघितले नाही. विशेष म्हणजे ती पंकजवरच चित्रित झाली आहे, ती विराणी आहे.

या गाण्यासाठी 1988 साली त्यांना सर्वेत्कृष्ट गायकाचा फिल्म फेअर पुरस्कार प्राप्त झाला होता. 1985 मध्ये एन. एस. गाला अवॉर्ड, 2003 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सन्मान, 2006 साली पद्मश्री, 2012 मध्ये महाराष्ट्र गौरव व आयफा पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. चित्रपटाचे गाणे आणि गझल गायन हा त्यांचा प्रवास परस्पर पूरकच होता. 1980 मध्ये ‘आहत’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर 1981 मध्ये मुकरार, 1982 मध्ये तरन्नम, 1983 मध्ये मेहफील, 1984 मध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पंकज उधास लाइव्ह, 1984 मध्ये नयाब आणि 1988 मध्ये ‘फ्री’ अशे अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली. गझल गायक म्हणून यश मिळवले.

पंकज यांची लव्ह स्टोरी फिल्मी अशीच म्हणावी लागेल. त्यांच्या शेजारच्या नातेवाईकांनी पंकज यांची भेट फरिदा यांच्याशी करून दिली. तेव्हा ते पदवी शिक्षण घेत होते. फरिदा या हवाई सुंदरी होत्या. भेटीनंतर दोघांच्या गाठी-भेटी वाढल्या. परस्परांच्या सान्निध्यात ते वेळ घालवू लागले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व नंतर लग्नात झाले. यात धर्माची अडचण असली तरी पंकज आपल्या निर्णयावर ठाम होते. लग्नानंतर नायाब आणि रिवा या दोन मुली झाल्या आणि या दोन्ही मुलीही आपल्या वडिलांप्रमाणेच संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत.

लोकप्रिय गायक सुरेश वाडकर आपल्या श्रद्धांजली प्रतिक्रियेत म्हणतात, ‘उधास यांनी आपल्या गझलेतून समस्त दुनियेला आनंद दिला. त्यांचा ‘खजाना’ हा अल्बम येणार होता आणि त्यांच्या गाण्याची तालीम ही आमच्याच शाळेत सुरू होती.’ ‘गझलनवाज’ भीमराव पांचाळे आपल्या श्रद्धांजली प्रतिक्रियेत म्हणतात, ‘आमच्या गाठीभेटी या कमीच झाल्या असल्या तरी त्या लक्षात राहणाऱ्या होत्या. पंकज मोठा माणूस होता, साधा होता. ते संवादी पद्धतीने गझल सादर करीत असत; तीच अतिशय लोकप्रिय पद्धत होती.’

गझल-गीत गायनाच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी सर्व वयोगटातील व वर्गातील रसिकांच्या मनात घर केले होते.