>>दिलीप ठाकूर
गेल्या आठवडय़ात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजकुमार कोहली यांच्या निधनाचे वृत्त समजताच माझ्या डोळय़ांसमोर ‘नागिन’ (1976) चित्रपटाची लॉबी कार्डस् आली. मला आठवते या चित्रपटाचे मुंबईतले मुख्य चित्रपटगृह नॉव्हेटी (ग्रॅन्ट रोड) होते, पण त्याची लॉबी कार्डस् नॉव्हेल्टीचेच मॅनेजमेंट असणाऱ्या ड्रीमलँड थिएटरच्या शो केसमध्ये अशा पद्धतीने लावली होती की, ड्रीमलँडला येणारे चित्रपटप्रेमी झालेच, परंतु त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या आम्हा अनेक चित्रपट रसिकांसाठी ती लॉबी कार्डस् पाहणे हे वैशिष्टय़पूर्ण ठरले. त्यातही विशेष आनंद म्हणजे हा मल्टिस्टार चित्रपट होता.
सहलीला गेलेले सहा जण नागाची शिकार करतात आणि इच्छाधारी नागिण कशा पद्धतीने चुन चुन के बदला घेते याची सूडकथा म्हणजे हा मसालेदार मनोरंजक चित्रपट. हे नाग-नागिण मानवाचेही रूप धारण करतात. तत्कालिक समीक्षकांनी या चित्रपटाला भाकड कथा म्हटले, पण पब्लिकला पिक्चर असा काही आवडला की, राजकुमार कोहली दिग्दर्शक म्हणून स्थिरावले आणि एकाच चित्रपटात अनेक कलाकार अशीही त्यांची ओळख निर्माण झाली. खरे तर राजकुमार कोहलींची साठच्या दशकामध्ये एक निर्माता म्हणून कारकीर्द सुरू झाली. विशेषतः दारासिंगची भूमिका असणारे ‘डंका’, ‘लुटेरा’ अशा मारधाड चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. त्या चित्रपटातील नायिका निशी हिच्या प्रेमात ते पडले आणि त्यांनी लग्नही केले.
त्यांनी ‘सपनी’ ( 1963 यात चक्क प्रेम चोप्रा नायक होता), ‘पिंड दी कुन्ही’ ( 1963), ‘मै जट्टी पंजाब दी’ (1964) या पंजाबी चित्रपटांचीही निर्मिती केली. हे सातत्य खूपच महत्त्वाचे. एक मोठी झेप म्हणून ‘गोरा और काला’ (1972) या चित्रपटाची निर्मिती केली. त्याचे दिग्दर्शन राजेंद्रकुमारचा भाऊ नरेशकुमारचे होते. चित्रपटात राजेंद्रकुमारची दुहेरी भूमिका आणि हेमा मालिनी व रेखा अशा दोन त्या काळातील टॉपच्या नायिका. या अनुभवानंतर राजकुमार कोहली यांनी चित्रपट दिग्दर्शनामध्ये पाऊल टाकले आणि विनोद मेहरा व माला सिन्हा या जोडीच्या ‘कहानी हम सब की’चे दिग्दर्शन केले. हा चित्रपट रसिकांनी पूर्ण नाकारला. मात्र ‘नागिन’ ( 1976) पासून आपला व्यवस्थित जम बसवला आणि फोकस वाटचाल केली. त्यांनी प्रामुख्याने मल्टिस्टारकास्ट चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाला प्राधान्य दिले. ‘जानी दुश्मन’, ‘बदले की आग’, ‘जिने नही दूँगा’, ‘इन्सानियत के दुश्मन’, ‘इंतकाम’, ‘साजिश’, ‘औलाद के दुश्मन’, ‘कहेर’ हे त्यांचे मल्टिस्टारकास्ट चित्रपट. याशिवाय त्यांनी ‘मुकाबला’ (यात दहीहंडीवरचे गाणे आहे), ‘नोकर बिवी का’, ‘बीस साल बाद’, ‘पती पत्नी और तवायफ’ अशाही काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
‘विरोधी’ (1992) या चित्रपटातून त्यांनी आपला मुलगा अरमान याला अभिनय क्षेत्रात आणले. 70-80 च्या दशकात राजकुमार कोहली यांनी सातत्याने आघाडीच्या नायक-नायिकांसोबत चित्रपट दिग्दर्शित केले हे वैशिष्टय़पूर्ण. त्यांच्या चित्रपटाची पोस्टरदेखील आवर्जून पाहण्यासारखी असत. आपल्या चित्रपटातील स्टारकास्टला त्या पोस्टरवर अधिकाधिक प्रमाणामध्ये संधी मिळावी यासाठी राजकुमार कोहली विशेष जागरूक असत. त्यांच्या मल्टिस्टार चित्रपटांची दोन वैशिष्टय़े असत. एक म्हणजे ते हॉररपट आणि दुसरे म्हणजे सूडकथा. उत्तर भारतातील लोकेशनचा ते भरपूर वापर करीत. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वाधिक सुपरहिट चित्रपट ‘जानी दुश्मन’ने मुंबईत नाझ चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी यश संपादले. त्यात एक रहस्यदेखील दडलेले होते आणि त्या रहस्यरंजकतेचा भेद हा त्या चित्रपटाचा क्लायमॅक्स होता. गीत, संगीत, नृत्यालासुद्धा राजकुमार कोहलींच्या चित्रपटांमध्ये विशेष स्थान असे आणि त्यांच्या चित्रपटातील बरीचशी गाणी ही लोकप्रिय झाल्याचे आपल्याला दिसेल. राजकुमार कोहली हे प्रसन्न व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जात. उंच, धिप्पाड, चष्मा लावलेला आणि सोन्याचा दात असणारा क्रियाशील दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती.