भटकंती – काळ्याभोर दगडातलं शिल्पवैभव

590

>> नीती मेहेंदळे

क्षेत्र महाबळेश्वराच्या एका कड्यावर वसलेलं प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर म्हणजे कृष्णाबाई मंदिर. अतिशय सुरेख धाटणीचं हे मंदिर त्याच्यावरील शिल्पकाम आणि मंदिर स्थापत्य यामुळे स्तिमित करतं. काळ्याभोर दगडातलं हे शिल्पवैभव पाहण्याजोगं आहे.

नव्या क्षणिक चकचकाटापेक्षा जुन्या व रेखीव अजूनही शाबूत गोष्टींचं आकर्षण बहुतेक आपल्याला असतंच. म्हणून जुनं महाबळेश्वर थोडं महाबळेश्वरच्या पंचतारांकित आणि तत्सम हॉटेल्सच्या भाऊगर्दीपासून हटके असलं तरी खुणावत होतं. या परिसराला जुनं म्हणायचं कारण हे असावं की इथली प्राचीन मंदिरं. ही बहुतांशी सर्वच मंदिरं यादवकालीन आणि त्यानंतरच्या काळात बांधलेली. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या महाराष्ट्रातील प्रसिद्ध नद्या या महाबळेश्वर डोंगररांगेत जन्म घेतात म्हणून तेराव्या शतकात इथे पंचगंगा मंदिर यादवराजा सिंघण याच्या कारकीर्दीत बांधलं गेलं. या परिसरात मंदिरांचा समूहच दिसला. पंचगंगा मंदिरापासून काही फुटांच्या अंतरावर श्रीक्षेत्र महाबळेश्वर व अतिबळेश्वर अशी दोन सुरेख पुनरुज्जीवित दगडी मंदिरे लागली. चौकशीअंती तीही त्याच काळातली आहेत असं समजलं. अजून पुढे अहिल्याबाई होळकरांनी बांधून काढलेलं शिवमंदिरही चांगल्या अवस्थेत दिसलं. या रांगेत सर्वात शेवटचं ते हनुमान मंदिर. जिथून पूर्ण जुन्या महाबळेश्वर मंदिर समूहाचा नकाशा स्पष्ट दिसत होता. पण या सर्वात थोडं दृष्टीआड झालेलं अतिशय सुरेख धाटणीचं एक मंदिर त्याच परिसरात होतं. खरं तर बस डेपोपासून एक दिशादर्शक बाण त्याचा मार्ग सांगत होता. अर्धा किमी पायवाटेने चालत थोडंसं झाडीत दडलेलं असल्याने तिथे फारशी वर्दळ नव्हती. आम्हीही जवळजवळ तिथून निघालोच होतो, पण एका वृद्ध स्थानिकाने हे बघितलं नाहीत तर काय बघितलेत, असा आग्रह करून आम्हाला तिथे नेलं.

खरोखर हे मंदिर तिथल्या इतर मंदिरांहून निराळं आहे हे लांबून पाहूनच लक्षात आलं. मंदिराचं प्रवेशद्वार कडय़ाला सन्मुख असं होतं. समोर कृष्णेचं विस्तीर्ण खोरं तिची महती लक्षात आणून देत होतं. मागे दूरवर केंजळगड आणि कमळगड आपली शिखरं उंचावून उपस्थिती देत होते. महाबळेश्वर डोंगररांगेची अख्खी धारच समोर उभी ठाकलेली दिसत होती. तिच्याकडे पाठ करत देवळात शिरलो. दुतर्फा काही तत्कालीन नक्षी कोरायचा प्रयत्न केलेले खांब अजून बऱयापैकी टिकून होते. इंग्रजी ‘यू’ आकाराच्या रचनेत मधोमध एक पुष्करणी व त्यात गोमुखाच्या जागी अख्खी गायच दिसली. तिच्या पाठीवर शेपूट वळवून ठेवलेली फार सुंदर कोरली आहे. अतिबळेश्वरच्या मंदिरात अशीच छोटी गाय आहे ते आठवलं.

गाभाऱयात शिरण्यापूर्वी छतावर काही गोलाकारात शिल्पं कोरली होती ज्यात टोप्या घातलेले शिवगण दिसले. ASI ने लक्ष घातल्याने मंदिर व परिसर आता देखरेखीखाली आहे. स्थानिक लोक त्याला कृष्णाबाई मंदिर म्हणून संबोधतात, पण तशी कृष्णा नदीची मूर्ती तिथे दिसली नाही. मात्र गाभाऱयात वैशिष्टय़पूर्ण तीन स्तरांची शिवपिंड होती. सर्वात खाली योनीपीठ त्यावर डमरूच्या आकाराचा एक स्तर व पुन्हा वर योनीपीठ ज्यात एक खाच होती. बाहेर देवकोष्ठांत काही विशेष मूर्ती दृष्टीस पडल्या ज्यांत एक नागाच्या फण्यावर पाय देऊन बसणाऱया गरुडाची, एक नागदेवतेची, पण जिच्या हातात शंख, गदा, चक्र, पद्म आहे व तिसरी गणपतीची होती जी आता गाभाऱयात आणून ठेवली आहे.

या मंदिराचा काळ सांगायचा झाला तर यादवकाळानंतरचा. नवीन मंदिर शैली विकसित व्हायची होती व परकीय आक्रमणं होत होती. त्यात जुनी स्थापत्य शैली विस्मरणात गेली होती, त्यामधल्या संधीकालातलं हे अनोखं मंदिर आहे. एका बाजूला काळ्याभोर दगडातून कोरून उभं केलेलं मंदिर स्थापत्य तर विरुद्ध बाजूस डोंगरांची अखंड ओळ आणि मधोमध कृष्णेचा सुपीक खोऱयाचा प्रदेश. जुन्या महाबळेश्वराची सहल हा अद्भुत देखावा पाहिल्याशिवाय पूर्ण कशी होईल?

आपली प्रतिक्रिया द्या