ठसा – स्नेहा नगरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेधा पालकर

आयुर्वेदात  निरोगी जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहेत. अभ्यंग मसाजदेखील यापैकीच एक आहे.  अलीकडे धकाधकीच्या जमान्यात केवळ दिवाळीत अभ्यंग म्हणजे तेल लावून अंघोळ केली जाते, पण आपल्याकडे पूर्वीपासून अभ्यंगाला खूप महत्त्व आहे, ते वेळीच ओळखून स्नेहा नगरकर यांनी ज्या महिलांना पक्षाघात झाला आहे, ज्यांना संधीवाताने चालता येत नाही, कोणाचा खांदा तर कोणाला पाठदुखी आहे असे एक नाही तर शेकडो रुग्ण बरे केले आहेत.22वर्षे टिळक महाराष्ट्र विद्यापीठात अभ्यंग आणि मसाज यांचे शिक्षण दिल्यानंतर त्यांनी स्वतः अशा वेदनेने त्रासलेल्या अनेक महिलांना बरं केलं आहे. वेदनामुक्त आयुष्य देऊन त्यांना आनंदी केलं आहे.

आजकाल धावपळीच्या जमान्यात स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ नाही. त्यामुळे बरेचसे शारीरिक त्रास सहन करावे लागतात. शिवाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय, ज्यामध्ये तासन्तास संगणकावर बसून काम केलं जातं, सतत  मोबाईल पाहणे, लॅपटॉपवर बसून काम यामुळे हात, मान, पाठ आणि कंबरदुखीसारखे त्रास ओढवून घेतले जातात. कामात ठरावीक  वेळ अंतर, योग्य व्यायाम, आहार याकडे लक्ष दिले तर हे त्रास कमी होतात. आज काळाबरोबर न चालून कसं चालणार? त्यामुळे हे सगळं करत असताना स्वतःच्या शरीराकडेही लक्ष द्यायला हवं, असं स्नेहा नगरकर सांगतात. सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरेपर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द ‘मसाज’ सगळ्यांनीच घ्यायला हवा. त्यातही वात प्रकृती असणाऱ्यांनी आवर्जून घ्यायला हवा. आजच्या जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास करणाऱ्यांनी, रात्री कामानिमित्त जागरण करणाऱ्यांनी, कामाचा अतिरिक्त ताण असणाऱ्यांनी, बौद्धिक, शारीरिक परिश्रम करणाऱ्यांनी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य प्रतिदिन अभ्यंग करावे.

सर्वसाधारण 30 ते 40 मिनिटे संपूर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालीश करावी.  अभ्यंग म्हणजे  शरीरातील वेगवेगळ्या स्नायूंना दिला गेलेला विशिष्ट प्रकारचा व्यायाम होय. या क्रियेमुळे स्नायूंना गती, चालना मिळून ते अबाधितरीत्या काम करू लागतात. अभ्यंगामुळे रक्तवाहिन्या व रक्तात घर्षण क्रियेने उष्णतेची निर्मिती होते. परिणामी रक्ताधीन असलेली विजातीय द्रव्ये तसेच त्वचेखालील अतिरिक्त फॅट वेगवेगळे होऊन विविध मार्गाने शरीराबाहेर फेकले जातात. परिणामी शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक रक्त शुद्ध होऊन शरीराची कांती निखळून येते. शरीरात असणाऱ्या वेदना, सूज या तैलाभ्यंगाने नष्ट होऊन अस्थी, सांध्यांना पुष्टता व दृढता प्राप्त होते.   थोडक्यात, संपूर्ण आरोग्यच जर अभ्यंगासारख्या सहजसोप्या उपायाने मिळत असेल तर प्रत्येकाने त्याचा अवश्य लाभ घ्यायला  हवा, असं नगरकर सांगतात.

अभ्यंग आणि मसाज हा अभ्यासक्रम ‘टिमवि’मध्ये (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ) 22 वर्षे शिकविल्यानंतर खूप महिला रुग्णांना मसाज देऊन बरं केलं, त्यांच्या असह्य वेदना कमी करता आल्या याचं समाधान आहे. मी स्वतः इलेक्ट्रिक इंजिनीअर आहे. मला इंजिनीअरिंग झाल्यानंतर नोकरी लागली, पण त्या वेळा पाळून पुन्हा कुटुंबाला पुरेसा वेळ देता येईना. तिकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. त्यामुळे मला कुटुंबाकडे लक्ष देऊन काही वेगळं करता येईल या विचारातून मी अभ्यंग आणि मसाज हा अभ्यासक्रम  शिकले. तो शिकल्यावर महिला रुग्णांना मसाज केला. पुढे हाच विषय सलग 22वर्षे मी ‘टिमवि’मध्ये शिकविला. तेव्हाही प्रात्यक्षिक म्हणून 150हून अधिक ससून रुग्णालयातील रुग्णांवर उपचार केले. हे समाधान माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टी असतात, ज्या आपण सहज रोज करत असतो, पण जेव्हा हे करणं अचानक थांबतं तेव्हा त्याची आपल्याला जाणीव होते. सहज, पण तितक्याच महत्त्वाच्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी व्यायाम, योग्य आहार, वात, पित्त, कफ प्रकृतीचे संतुलन साधलं पाहिजे. म्हणजे त्रास होणार नाही. त्यासाठी अभ्यंग महत्त्वाचा आहे.