विज्ञान – रंजन – महाशिल्प

>> विनायक

आधुनिक  अमेरिकेच्या किंवा आताच्या ‘यूएस’च्या जडणघडणीत पायाभूत काम करणाऱ्या चार महान नेत्यांचं स्मारक आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, जेफरसन, थिओडर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन या चौघांचे हुबेहूब चेहरे माऊंट ‘रशमोर’च्या पाषाणात अप्रतिम पद्धतीने साकारले आहेत. ‘रशमोर’ हे नाव या भागाला नंतर मिळालं. त्यापूर्वी या जागेचा उल्लेख अमेरिकेत गोऱ्या लोकांच्या आक्रमणापूर्वी राहणारे मूळ निवासी ‘सहा पितामह’ (सिक्स ग्रॅन्डफादर्स) असा करत असत. आजच्या ‘माऊंट रशमोर’ इथले मूळ निवासी त्या भागाला त्यांच्या संकल्पनेनुसार सहाच दिशांचे प्रतीक असलेल्या ‘पितामहां’ना मानत असत. हे सहा ‘आजोबा’ पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि उर्ध्व (वर) तसेच अधर (पृथ्वी) अशा सहा दिशांचे स्वामी. त्या लोकांना आपल्याला ठाऊक असलेल्या आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य या दिशा तेव्हा ठाऊक नसाव्यात किंवा त्याची त्यांना गरज भासली नसावी. तर अशा या पर्वतातील सलग महापाषाणांचा भाग पाहू. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाशिल्प घडवलं गेलं. ते आता ‘रशमोर नॅशनल मेमोरियल’ नावाने प्रसिद्ध आहे. गट्झोन बोर्गलम या शिल्पकाराने आराखडा बनवलेल्या या चार स्फूर्तिदायी चेहऱ्यांना अमेरिकेत ‘श्राइन ऑफ डेमॉक्रसी’ किंवा लोकशाहीचं श्रद्धास्थानही म्हटलं जातं. बोर्गलम यांनी त्यांचा मुलगा लिंकन यांच्या सहाय्याने ही ग्रॅनाइट पाषाणातील भव्य शिल्परचना 1927 ते 1941 या काळात केली. हे सर्व ‘चेहरे’ साठ फूट उंचीचे असून ते दूरूनच पहावे लागतात. कारण तरच ते पूर्णपणे दिसतात. दरवर्षी किमान 20 लाख लोक हे महाशिल्प आणि या डोंगरावरच्या पठारावर 1278 एकरवर निर्माण केलेल्या ‘मेमोरिअल पार्क’ला भेट देतात.

अमेरिकन ज्यांना ‘इंडियन’ म्हणतात त्या मूळ निवासींपैकी तत्कालीन लाकोटा भागात ऍटापाहो, केयेन्ने, सिऑक्स वगैरे लोक या भागाला व डोंगराला ‘सिक्स ग्रॅन्डफादर्स’ (त्यांच्या भाषेत साधारण थन्कसिला सॅक्पे) असं म्हणत. या प्रदेशात ‘ब्लॅक एल्क पिक्’ संबोधलं जायचं ते तिथल्या घुबडांच्या निवासावरून. पुढे युरोपीय लोकांनी तिथे आक्रमण केल्यावर नावं बदलली. 1877 मध्ये या भागावाचा ताबा ‘यूएस’कडे आला. तिथे एका खाण कंपनीचे अधिकारी चार्लस रशमोर पाहणी करण्यासाठी गेले. त्यांचेच नाव नंतर या भागासाठी प्रचलित झालं. युरोपीय लोकांनी मूळ निवासींवर विजय मिळवल्यावर आधीची नावं पुसून टाकली. आज मात्र त्याला लोकशाहीचं प्रतीक म्हटलं जातं. या सर्व गोष्टींविषयीची ऐतिहासिक चर्चा आहेच. या लेखात केवळ तिथल्या शिल्पकलेविषयी थोडसं जाणून घेऊ. बोर्गलम यांनी आधी हे शिल्प 150 मीटर उंचीच्या ‘निडल्स’ नावाच्या शिखरावर बनवायचं ठरवलं होतं. 1925 मध्ये त्याचा आराखडा सादर करण्यात आला. त्यातून 1927 ते 41 या काळात हे शिल्प घडलं. उंच डोंगरावर ते घडवताना कोणताही अपघात घडला नाही. 400 कारागीर शिल्पकारांच्या सहाय्याने बोर्गलम यांनी हे आव्हान पेललं. अमेरिकेच्या (यूएस) पहिल्या 150 वर्षांच्या इतिहासाचं त्यात प्रतिबिंब आहे. हे चेहरे घडवताना 4 लाख 10 हजार टन दगड खोदावा लागला. आधी जेफरसन यांचा चेहरा वॉशिंग्टन यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला कोरण्याचं ठरलं, पण तिथला दगड ठिसूळ निघाला. मग तो डाव्या बाजूला कोरला गेला. यातील मुख्य कलाकारी ल्युइगी बियॅन्को या शिल्पकाराची होती. तो इटलीमधून येऊन अमेरिकेत स्थायिक झाला होता. आता तिथल्या म्युझियममध्ये ‘स्कल्प्टर स्टुडिओ’त या शिल्पनिर्मितीच्या आठवणी जपल्या आहेत. ते घडवणाऱ्या कारगिरांपैकी निक् क्लिफर्ड हे अखेरचे कारागीर 2019 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी निधन पावले. या चार चेहऱ्यांपैकी लिंकन यांना अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून जग ओळखतं. अमेरिका त्यांच्याकडची अशी ‘मॉन्युमेन्टस’ मोठय़ा गर्वाने जपते. आपल्याकडे शेकडो वर्षांपूर्वी ‘आधी कळस मग पाया’ अशा पद्धतीने घडवलेलं वेरुळचे कैलास लेणं किती महत्त्वपूर्ण जागतिक शिल्प आहे ते आपल्यालाही अभिमानाने मिरवता यायला हवं.