वेब न्यूज – नो स्नेक कंट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन 

सोशल मीडियामुळे सगळे जग एकत्र आले आहे. विविध देशांतील करोडो लोक इथे एकमेकांच्या संपर्कात असतात, आपले विचार मांडत असतात आणि अनेकदा आपल्या देशातील विविध परंपरांची, निसर्गसौंदर्याची, सहलीच्या ठिकाणांची, वनसंपदेची, प्राण्यांची, घडणाऱ्या अजब घटनांची माहिती देत असतात. अशा लेखनामुळे जगातल्या विविध देशांत असलेल्या चित्रविचित्र गोष्टींबद्दल लोकांना बऱयाचदा नव्याने माहिती होते. सध्या साप या प्राण्यासंदर्भातली एक रंजक माहिती खूप गाजत आहे. आयर्लंड या देशात एकही साप आढळत नाही ही माहिती सध्या अनेक वाचकांना थक्क करून सोडते आहे. आयर्लंड हा देश ‘नो स्नेक कंट्री’ म्हणून ओळखला जातो. सध्या यासंदर्भात हा देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जगात तीन हजारांपेक्षा जास्त सापाच्या प्रजाती आढळतात. अगदी वाळवंटात आणि पाण्यातदेखील साप आढळून येतात. मग आयर्लंडमध्ये असे काय विशेष आहे की, इथे एकही साप नाही? यासंदर्भात दोन गोष्टी सांगितल्या जातात, एक आहे पौराणिक आणि एक वैज्ञानिक. असे मानले जाते की, आयर्लंडमध्ये सेंट पॅट्रिक नावाचे एक महान संत होते. सेंट पॅट्रिकनी ख्रिश्चन धर्माच्या रक्षणासाठी देशभरातील सर्व सापांना एकत्रितपणे घेरले आणि त्यानंतर त्यांनी सापांना आयर्लंडमधून बाहेर काढले आणि समुद्रात फेकून दिले. सलग 40 दिवस उपाशी राहून त्यांनी हे कार्य पूर्ण केले.

तर वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार इथल्या प्रचंड थंड हवेत सापांना तग धरणे शक्य नाही. असे मानले जाते की, खूप पूर्वी आयर्लंडमध्ये साप होते, पण इथल्या प्रचंड थंडीत ते नामशेष झाले. वैज्ञानिक म्हणतात की, आयर्लंडमध्ये साप कधीच राहत नव्हते. विशेष म्हणजे इथल्या जिवाश्म अभिलेख विभागात एकाही सापाची नोंद नाही. विविध वन्य प्राण्यांनी नटलेल्या न्यूझीलंड या देशातदेखील साप आढळत नाहीत. इथे आजवर एकही साप आढळला नाही, असे सांगितले जाते. इथे सरडा हा प्राणी मात्र आढळतो.