वेब न्यूज – ताजमहालचा रंग बदलतोय

>> स्पायडरमॅन

हिंदुस्थानची  शान म्हणजे ताजमहाल. आरस्पानी सौंदर्याने नटलेला, प्रेमाला वाहिलेला ताजमहाल चांदण्यांच्या साक्षीने चंद्रप्रकाशात न्हाऊन निघताना पाहणे हे निव्वळ स्वर्गसुख आहे; जे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवे. या स्वर्गसुखाचा अनुभव घेण्यासाठी देशातूनच नव्हे, तर परदेशातूनदेखील लाखो, करोडो पर्यटक ताजमहालला भेट देत असतात, त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असतात.

पांढऱ्या संगमरवराने बनलेला हा ताजमहाल आता मात्र आपला रंग बदलू लागला आहे. हिंदुस्थानच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. वाढत चाललेल्या प्रदूषणाने आधीच ताजमहालच्या संगमरवराला हानी पोहोचत होती आणि त्यात आता ताजमहालच्या भिंतीवर एका धोकादायक किडय़ाचे अस्तित्व आढळले आहे. या छोटय़ा किडय़ाच्या करामतीमुळे ताजमहालचा रंग हळूहळू हिरवा होण्याचा धोका पुरातत्त्व विभागाने केलेल्या ताजमहालच्या अभ्यासात समोर आला आहे. गोल्डी चिरोनोमस (Goeldichironomus) असे या घातक किडय़ाचे नाव आहे. गोल्डी चिरोनोमस हे अस्वच्छ आणि प्रदूषित पाण्यात मोठय़ा वेगाने वाढतात. मार्च ते एप्रिल आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात यमुना नदीतील या किडय़ाच्या धोका अधिक वाढतो असे अभ्यासात समोर आले आहे.

या कीटकांच्या विष्ठेमुळे ताजमहालचा पांढरा रंग आता हिरवट होऊ लागला आहे. 28 ते 35 अंश तापमानात अत्यंत वेगाने वाढ होणाऱ्या या कीटकांना नष्ट करण्यासाठी पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांचे समूळ उच्चाटन करायला एक वर्षदेखील लागू शकते. 2015-16 साली या कीटकाचे अस्तित्व प्रथम जाणवल्याचे सांगितले जाते. 2018 साली यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिकादेखील दाखल झाली होती; ज्यावर या प्रकाराकडे केंद्र सरकारने अधिक गंभीरतेने बघावे असेदेखील कोर्टाने केंद्राला सुनावले होते.