
वैश्विक, [email protected]
एखादी गोष्ट अगदी जवळ आहे म्हणजे परसदारी आहे असा वाप्रचार आपल्याकडे होता. इंग्लिशमध्ये त्याला ‘इट इज इन द बॅकयार्ड’ असं म्हणतात. मोठमोठे ग्रह आणि दूरस्थ दीर्घिकांच्या तुलनेत आपला चंद्र खूप जवळ म्हणजे पृथ्वीच्या ‘परसात’ (बॅकयार्डमध्ये) असलेला नैसर्गिक उपग्रह असं म्हटलं जातं. आता हे अंतरही सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटर असलं तरी खगोलीय दृष्टीने खूपच जवळचं.
सारे ग्रह आणि उपग्रह आपल्या विविक्षित कक्षेत अब्जावधी वर्षे फिरत आहेत. त्यात बदल होत नाही, मात्र ग्रह, खुजे ग्रह, नैसर्गिक उपग्रह वगळता अंतराळात अनेक ‘भटक्यां’ची गर्दी आहे आणि ती लाखोंच्या संख्येने आहे. हे असतात अवकाशात सूर्यमालेत इतस्ततः भरकटणारे अशनी किंवा महापाषाण! पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने त्यातला एखादा खेचला जाऊन भूपृष्ठावर आदळला तर उत्पात होऊ शकतो. तीच गोष्ट एखाद्या फिरस्त्या धूमकेतूची. त्याविषयी पुढच्या लेखात. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळात आणि हा निळा ग्रह सूर्यकक्षेत बऱयापैकी स्थिरावल्यानंतरही कोटय़वधी वर्षे अशनी, धूमकेतूंचा मारा झेलत होता. हे अवकाशी संकट थांबलं तेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी अवतरली. त्यातले सर्वात शेवटचे प्रगत (!) आपण! तर, पृथ्वीवरच्या मानवी वर्चस्वाच्या काळातही अशनींची धडक बसण्याची नोंद आहे.
माणूस प्रगत प्रजाती म्हणून विकसित होत असताना न्यू क्वबेक, ऍरिझोना, लोणार अशा अनेक ठिकाणी झालेल्या अशनी आघाती विवरांची वैज्ञानिक तपासणीनंतर नोंद झाली आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोणारचे 47 ते 57 हजार वर्षांपूर्वीचे अशनी आघाती विवर हे जगातलं, अग्निजन्य खडकात झालेलं एकमेव ज्ञात असं दुर्मिळ विवर-सरोवर आहे. विज्ञान आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने त्याकडे त्वरित लक्ष देऊन तिथल्या सर्वांगीण सोयीसुविधा वाढवायला हव्यात. तो एक वेगळाच मुद्दा, पण मूळ विषय अशनींचा.
अशा अशनी किंवा अंतराळी महापाषाणाचं अवचित ‘आक्रमण’ झालं तर काय करायचं याचा विचार गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, आधुनिक खगोलशाळा विकसित होत असताना झाला. त्यातून ‘निअर अर्थ’ म्हणजे पृथ्वीच्या सान्निध्यातील किंवा भविष्यात पृथ्वीला धोका ठरू शकतील अशा अंतराळी महापाषाणांची यादी तयार करण्यात आली. असे सुमारे 27 हजार अशनी कधी ना कधी पृथ्वीला धडक देऊ शकतात. त्यांच्या संभाव्य टक्करीपासून आपला ग्रह वाचवायचा तर त्यांचं जवळून निरीक्षण करून, स्वरूप समजून घ्यायला हवं. असाच प्रयत्न ‘इरॉस’ या अशनी उतरलेल्या ‘लिअर शूमेकर’ या यानाने केला. विख्यात ग्रह आणि अशनी अभ्यासक युजीन शूमेकर यांचं नाव या यानाला दिलं गेलं. 1996 मध्ये हा रोबोटिक प्रोब (मोहीम) कार्यान्वित झाला.
पृथ्वीपासून 1.3 ए.यू. म्हणजे सूर्य-पृथ्वी अंतर असलेल्या सुमारे 15 कोटी किलोमीटर या ‘ऍस्ट्रॉनॉमिकल युनिट’ किंवा एककापेक्षा अधिक एक तृतीयांश म्हणजे सूर्यापासून सुमारे 20 कोटी अथवा पृथ्वीपासून 5 कोटींपेक्षा कमी अंतरावर फिरणारे अशनी पृथ्वीला घातक ठरू शकतात असा निष्कर्ष नोंदवून, त्यातल्या एखाद्याचा अभ्यास करण्याचा विचार झाला. निअर शूमेकर 12 फेब्रुवारी 2001 रोजी इरॉसवर उतरलं. या इरॉसचा शोध 13 ऑगस्ट 1898 मध्येच जर्मन संशोधक सी. जी. लिट् यांनी लावला होता. पृथ्वी आणि मंगळ यांच्यामधला हा अशनी कसा असावा याचे फोटो 1908 मध्ये घेतले गेल्यावर समजलं होतं, पण त्यावर ‘यान’ उतरवण्याची क्षमता तेव्हा नव्हती.
17 बाय 11 किलोमीटर आकाराच्या या अशनीवर उतरलेल्या निअर युजीन शूमेकर यानाने त्यावरील द्रव्य, त्याची घनता, या अशनीचे चुंबकीय क्षेत्र वगैरेची नोंद घेण्यासाठी इफ्रारेड (अवरक्त) तसेच सीसीडी इमेजिंगचा वापर केला. लेझर रेंजफाइन्डर, मॅग्नॅटोमीटर अशी उपकरणंही या पन्नास किलो वजनाच्या यानात होती. 80 वॅट ऊर्जेवर ते चालत होतं.
साधारण 20 मीटर व्यासाचा अशनीसुद्धा पृथ्वीचं प्रचंड नुकसान करायला पुरेसा ठरतो, मात्र 90 टक्के पृथ्वी निकट (निअर अर्थ) अशनी हे 1 किलोमीटर व्यासाचे आहेत. तेव्हा त्यांच्यापासून सावध राहणे आणि ते आपल्या ग्रहावर आदळण्यापूर्वीच त्यांचा परस्पर अंतराळात निकाल लावणे, असे उपाय योजले जाऊ शकतात. रशियात तुंगुस्का जंगलात 1908 मध्ये कोसळलेल्या अशनीने तिथला बराच प्रदेश भस्मसात केला होता हे लक्षात ठेवलेलं बरं.
कदाचित अशा अंतराळी धोक्यांपासून वैज्ञानिक आपल्या ग्रहाचं संरक्षण करण्याचा उपाय शोधूनही काढतील, पण मानवनिर्मित प्रदूषण, भयंकर शस्त्र्ाास्त्र्ा स्पर्धा आणि सत्तेच्या उन्मादातून युद्धखोरी याचा विपरित परिणाम तोपर्यंत पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व कितपत टिकवेल हाच मोठा प्रश्न आहे. इतर मूक प्रजाती मात्र माणसाच्या विपरित करणीने नष्ट होऊ शकतात.





























































