
जहांगीर कलादालनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरावं, अशी प्रत्येक चित्रकाराची अपेक्षा असते. चित्रकार-लेखक प्रभू जोशी यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे, मात्र आपल्या चित्रकृतींचा सन्मान व ही इच्छापूर्ती याची देही याची डोळा पाहायला जोशी मात्र नाहीत. त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत 2021 मध्ये प्रभू जोशी यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा पुनर्वसू याने वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन भरवले आहे.
‘प्रभू जोशी : द फायनल एक्झिबिशन’ हे प्रदर्शन 9 ते 14 मेपर्यंत जहांगीर कलादालनातील गॅलरीत सुरू आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून वडिलांना अनोखी श्रद्धांजली वाहण्याचा पुनर्वसू यांचा प्रयत्न आहे. प्रभू जोशी यांनी तैलरंगांपासून चित्रकलेची सुरुवात केली. जलरंगांमध्ये त्यांची चित्रकला बहरली. आपल्या कल्पनांना त्यांनी मूर्त रूप दिले आणि विशिष्ट शैली निर्माण केली. पुंचल्याचा किमान वापर व जलरंगांचे सहज फटकारे ही प्रभू जोशी यांच्या चित्रांची खासियत आहे, असे पुनर्वसू जोशी यांनी सांगितले.


























































