
>> अरुण
आपल्या महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अवकाशातून प्रचंड वजनाचा एक अशनी सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी कोसळून तयार झालंय. अशा अवकाशी महापाषाणांना ‘अशनी’ म्हणतात. हे सरोवर बेसाल्ट राक किंवा अग्निजन्य खडकातलं जगातील एकमेव ज्ञात अशनी आघात विवर-सरोवर आहे. अवकाशातून पडलेल्या प्रत्येक अशनीपाताने सरोवरच बनतं असं नाही. अमेरिकेतील आरिझोना राज्यात असलेलं बारिंजर क्रेटर (विवर) हा एक प्रचंड खोलगट खड्डा आहे. मात्र तो कोरडाठाक असून लोणार सरोवरापेक्षा लहान आहे. अमेरिकेत सगळय़ाचं ‘मार्केटिंग’ होत असल्याने त्याचा जगात बोलबाला झाला. लोणार 1972 नंतर लोकांना जास्त समजायला लागलंय. जागतिक महत्त्वाचं हे स्थळ आपल्या महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिह्यात आहे.
या सरोवराचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याचं पाणी समुद्राच्या पाण्याच्या अनेक पट खारं आहे. अर्थात त्याचा आणि अशनी आघाताचा संबंध नाही. जगात अनेक ठिकाणी भूगर्भात मिठाचे प्रचंड साठे आहेत. अशनी आघाताने हा भाग उघडा झाला आणि पावसाचं पाणी विवरात साचून ते खारं झालं. लोणार सरोवर आकाशाचं सुंदर प्रतिबिंब वेळोवेळी दाखवतं.
अशी खारी तळी आणि त्यातही आपण पूर्वी वाचलंय ते बोलिवियामधलं ‘सालार डी युनी’ प्रतिबिंब सरोवर कसं तयार झालं? अतिप्राचीन काळी बोलिवियात अनेक तळी, सरोवरं होती. कालांतराने पावसाचं प्रमाण कमी होऊन ती शुष्क होत गायब झाली. तळय़ातील सर्व पाण्याची वाफ झाल्याने पाण्याखालच्या जमिनीतील क्षार आणि खनिजांचे साठे यांचाच पृष्ठभाग तयार झाला. त्यातील सोडियम क्लोराइड, लिथियमचे स्फटिक बनले आणि प्रचंड जागेत विस्तारले. त्यावर वाऱयांचा परिणाम होऊन हा लवणप्रदेश (खारा भाग अतिशय सपाट झाला. त्याच्या तळाशी नंतर सापडलेलं महागडं लिथियम या भागाला श्रीमंत करणारं ठरलं.
या प्रकारची खारी सरोवरे जगात हजारोंच्या संख्येने आहेत. अमेरिकेत उटाहमधलं ग्रेट साल्ट लेक, आफ्रिकेतले लेक आसॅल, चीनमध्ये झिंजियान्ग, हिंदुस्थानात सांभार, चिल्का आणि लोणार तर पानडातील कित्येक ‘साल्ट लेक’ प्रेक्षणीय झाली आहेत. हे लवण तलाव आणि मिठागरातला फरक असा की, मिठागरे समुद्र किंवा खाडीचं पाणी मुद्दाम अडवून त्याचे ‘वाफे’ तयार करून बनतात. नैसर्गिक खारी तळी लहान-मोठय़ा आकाराची असतात, परंतु सर्व बाजूंनी भूभागाने व्यापलेला पास्पियन समुद्र हे एक महाकाय खारे ‘तळे’च म्हणायला हवे. त्याचा विस्तार 3 लाख 86 हजार चारशे चौरस किलोमीटर आहे.



























































