
संपूर्ण राज्यांप्रमाणे येथील शिवसैनिक काहीही झाले तरी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उत्स्फूर्तपणे एकवटला असल्याचे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, गद्दार आमदारांविरोधात शिवसैनिकांची संतप्त प्रतिक्रिया उमटत असली, तरी हिंसक घटना घडलेल्या नाहीत. मात्र, जाणीवपूर्वक कोण डिवचत असेल तर शिवसेना कदापि शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी जिह्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी यांची बैठक झाली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, माजी आमदार सुरेश साळोखे, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, महिला संघटक शुभांगी पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिह्यातील सर्व शिवसैनिकांनी यापुढेही आपण शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. पक्षप्रमुख देतील तो आदेश पाळू, असे वचन दिल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.



























































