
सामना प्रतिनिधी । मुंबई
बालदिनानिमित्त यूपीतील एका शाळेत सेलिब्रिटी म्हणून येण्यासाठी पाच लाख रुपये घेऊनही अभिनेत्री अमिषा पटेल तेथे गेली नाही. त्यामुळे तिच्यासाठी दिलेले पैसे आम्हाला दुप्पट करून दे अशी धमकी देत मध्यस्थी तरुणाला धमकावणाऱ्या अरुण गवळी गँगच्या चौघांना अंबोली पोलिसांनी अटक केली. संजय वोर्पे, निवृत्ती यादव, संतोष शिवूरकर आणि ईश्वर शिंदे अशी या चौघांची नावे आहेत. करणसिंग चरणसिंग (28) या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याच्या तक्रारीवरून अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दया नायक, एपीआय रवींद्र कळमकर व पथकाने पैशांसाठी धमकावणाऱ्या त्या चौघांना अटक केली.
यूपीतल्या मोरादाबादमधील मॉडर्न पब्लिक स्कूलमध्ये बालदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी एका सेलिब्रिटीची आवश्यकता होती म्हणून ‘शुभ मंगलम इव्हेंट कंपनी’चे मालक अजय शर्मा यांनी करणसिंग याला संपर्प साधून सेलिब्रिटी उपलब्ध करण्याबाबत सांगितले होते. त्यानुसार करणसिंग याने अमिषा पटेल हिच्याशी संपर्प साधून तिला कार्यक्रमासाठी तयार केले. यासाठी तिला पाच लाख रोकड देण्यात आली आणि करणसिंगने स्वतःचे कमिशन म्हणून एक लाख रुपये घेतले. 13 तारखेला कार्यक्रम होता, पण तिथे अमिषा पटेल गेलीच नाही. त्यामुळे करणसिंगने अमिषा पटेलचा मॅनेजर अनिल जैन याला संपर्प साधून पैसे परत करण्याची विनंती केली तेव्हा ‘पैसे देत नाही, हवे तर कायदेशीर कारवाई करा’ असे जैन याने उत्तर दिले.
खोटा कॉल करून बोलावून घेतले
अमिषा पटेल पैसे देत नसल्याने करणसिंग टेन्शनमध्ये आला होता. त्यामुळे गुरुवारी तो त्याच्या मित्रांसोबत लिंक रोड येथील टॉल ग्रास हॉटेलात बसलेला असताना करणसिंगला एक कॉल आला. ‘आम्हाला एक इव्हेंट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला भेटायचे आहे’ असे सांगून कॉलरने करणसिंगला इन्फिनिटी मॉलजवळ बोलावले. त्यानुसार करणसिंग तेथे गेल्यावर टाटा सफारी गाडीतून चारजण बाहेर आले आणि त्यातील संजय वोर्पे याने अखिल भारतीय सेनेचे कार्ड दाखवून ‘मी अरुण गवळीसाठी काम करतो. तू मॉडर्न स्कूलच्या कार्यक्रमासाठी जे पैसे घेतले आहेस ते आजच परत केले नाहीस तर उद्या तुला 10 लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाहीस तर तुला ठार मारेन’ असे धमकावले.
दुसऱ्या दिवशी मुसक्या आवळल्या
अरुण गवळीच्या नावाने धमकावल्यामुळे घाबरलेल्या करणसिंगने अंबोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर दया नायक, रवींद्र कळमकर यांनी करणसिंगला धीर देत दुसऱ्या दिवशी पैसे मागणाऱ्यांनी ज्या ठिकाणी बोलावले तेथे सापळा रचला. आरोपी त्यांच्या टाटा सफारी कारमधून आल्यानंतर करणसिंग त्यांच्या जवळ गेला आणि हेच आरोपी असल्याचे त्याने खुणावताच नायक, कळमकर व पथकाने संजय, निवृत्ती, संतोष आणि ईश्वर या चौघांच्या मुसक्या आवळल्या.

































































