
देशाची घटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) सोशल मीडियावर डीपी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला प्रसारमाध्यमे आणि लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन दिल्लीच्या मंत्री आणि ज्येष्ठ आप नेत्या आतिशी यांनी आज येथे केले. मोदी सरकारच्या दडपशाही आणि हुकुमशाही विरोधात दंड थोपटण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे डीपी मोहीम
– या मोहिमेद्वारे आपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एक्स, फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इतर समाजमाध्यमांवरील त्यांचे छायाचित्र बदलून, मोदी का सबसे बडा डर केजरीवाल अशी फोटोओळ लिहिलेले गजाआड असलेल्या अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र लावणार आहेत, असे आतिशी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतील असे केजरीवाल हेच देशातील एकमेव नेते असल्यामुळे निवडणुकांची घोषणा झाल्यावर लगेचच कोणत्याही पुराव्याविना ईडीने त्यांना अटक केली, असा दावा त्यांनी केला. कथित अबकारी घोटाळाप्रकरणी दोन वर्षे तपास करूनही ईडी एक पैशाचाही पुरावा दाखवू शकलेली नाही, असे त्या म्हणाल्या.
ईडीवर टीकास्त्र
– केजरीवाल यांचा फोन गहाळ झाला आहे वा अन्य काहीही ईडीला सांगायचे असेल तर त्यांनी आरोपपत्र दाखल करावे आणि न्यायाधीशांसमोर ते सांगावे. तसे अधिकार ईडीला नक्कीच आहेत, पण बाहेर काहीही गोष्टी पसरवू नये, अशी टीका आतिशी यांनी केली. ईडी ही काही भारतीय जनता पार्टीची उपकंपनी नाही. तुम्ही या देशाच्या कायद्यानुसार तयार केलेली एक स्वतंत्र तपास यंत्रणा आहात, तसे वर्तन दाखवा, असे त्या म्हणाल्या. केजरीवाल यांनी अबकारी घोटाळय़ाच्या काळात वापरलेला फोन गहाळ आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, तो कुठे आहे, हे माहिती नाही, असे ते म्हणाल्याचे ईडीच्या सूत्रांनी म्हटले होते.
लोकशाही वाचवण्यासाठी लढा
– ‘आप’ देशात ‘हुकूमशाही’विरुद्ध लढा देत आहे. लोकशाही आणि घटना वाचवणे हा केवळ केजरीवालांचा लढा नाही असे म्हणत त्यांनी, जनतेनेही आपच्या या डीपी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
केजरीवाल यांच्या निर्देशांची ईडी तपासणी करणार
– कोठडीत बंद असलेले केजरीवाल दिल्ली सरकारला कारभाराविषयी निर्देश देऊ शकतात की नाही याची ईडी तपासणी करणार आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाशी हे सुसंगत आहे की नाही हे ईडी तपासणार आहे. केजरीवाल यांनी पाणी आणि मलनिःसारणसंबंधी काही कामे सुरू करण्याच्या सूचना पाठवल्या असल्याचे आतिशी यांनी सांगितले होते.




























































