तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यास ओवेसींचा नकार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

दलित-मुस्लिम ऐक्याचा पुकारा करून वंचित बहुजन आघाडी स्थापन करणारे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ासही अभिवादन करण्याचे ओवेसींनी टाळल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ मजलीस ए इत्तेहादूल मुसलमीनचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी आज सकाळी शहानूरवाडी ते जहांगीर कॉलनी अशी पदयात्रा काढली. या पदयात्रेत दलित तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. चौसर भागातून पदयात्रा जात असताना तेथील बौद्धविहारात तथागत गौतम बुद्धांना वंदन करण्यासाठी येण्याची विनंती दलित कार्यकर्त्यांनी केली. पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ओवेसी पुढे निघाले. काही कार्यकर्त्यांनी ओवेसींना विहारात येण्याची पुन्हा विनंती केली. मात्र, ओवेसी यांनी ही विनंती धुडकावून लावली आणि ते हातवारे करत बौद्धविहारासमोरून निघून गेले.

ओवेसींची पदयात्रा गुरुगोविंदसिंहपुरामार्गे मिलिंदनगर परिसरात आली. मिलिंदनगरातील उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. दलित कार्यकर्त्यांनी ओवेसींना डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्याची विनंती केली. या विनंतीकडेही दुर्लक्ष करत ओवेसी तसेच पुढे निघून गेले. दलित विकासाच्या गप्पा मारणाऱया ओवेसींचा हा ‘नूर’ पाहून उद्यानात थांबलेली आंबेडकरी जनता नाराज झाली.

जलील यांची धावपळ
दलित, मुस्लिमांचे मसिहा असल्याचे ढोंग करणारे इम्तियाज जलील यांच्या लक्षात हा प्रकार येताच चार कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी धावतपळत बौद्धविहार गाठला. तथागत गौतम बुद्धांना कसेबसे अभिवादन करून पळत पळत त्यांनी पुन्हा पदयात्रा गाठली.