
जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ब्रेट ली याने हिंदुस्थानच्या दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘फेसबुक’वर एक भावूक पोस्ट शेअर करत लीने आशाताईंसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2006 मध्ये ‘यू आर द वन फॉर मी’ या गाण्याच्या निमित्ताने या दोन दिग्गज व्यक्तींनी एकत्र काम केले होते, ज्याचा उल्लेख करत त्याने आपला आदर व्यक्त केला.
ब्रेट लीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “आशा भोसले यांच्यासोबत गाणे रेकॉर्ड करण्याची संधी मिळणे, हे माझ्यासाठी भाग्याचे होते. त्यांच्यासारख्या महान गायिकेसोबत काम करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात कृतज्ञतापूर्वक गोष्ट आहे.” लीने पुढे नमूद केले की, आशाताईंचे केवळ गाणेच नाही, तर त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
आशाताईंच्या स्वभावाचे कौतुक करताना ब्रेट ली म्हणाला की, “एवढे मोठे यश संपादन करूनही त्या अत्यंत नम्र आणि प्रेमळ होत्या. त्यांच्यातील साधेपणा आणि इतरांना सामावून घेण्याची वृत्ती मला नेहमीच लक्षात राहील.” आशाताई भोसले यांचा वारसा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील, असा विश्वास व्यक्त करत ब्रेट लीने त्यांच्या कुटुंबाप्रती आणि चाहत्यांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.



























































