राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन 2023 चा ‘राज कपूर जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना तर ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांना जाहीर झाला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संकलक एन. चंद्रा आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये 10 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे असून विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये 6 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप रुपये 10 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे. तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप रुपये 6 लाख, मानपत्र व मानचिन्ह असे आहे.