देवाक काळजी! आषाढीची वारी होणारच!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

मुंबई-पुण्यासह काही शहरे आणि जिह्यांमध्ये कोरोना हळूहळू हातपाय पसरत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र तरीही ‘देवाक काळजी’ असल्याप्रमाणे यंदाची आषाढ वारी होणार आहे. फक्त वारीत सहभागी होणाऱया लाखो वारकऱयांनी काळजी घ्यावी आणि मास्क वापरण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

जुलैमध्ये आषाढी एकादशी आहे. या वारीची सर्व तयारी झाली असून यंदा तब्बल दहा ते पंधरा लाख वारकरी सहभागी होतील असे सांगण्यात आले. एकीकडे पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने वारी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र राज्य सरकारने वारीला हिरवा कंदील दाखवला असून काळजी घेऊनच यंदाची वारी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी कोविड सादरीकरणही झाले. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

वारीत अडचण नाही

जुलै महिन्यातील आषाढी एकादशीच्या वारीबद्दल माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, आता वारीची तयारी पुढे गेली आहे. वारीमध्ये लाखो वारकरी एकत्र येतात. त्यामुळे काळजी घेऊन वारी पूर्ण करावी लागेल अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. यंदाची वारी होईल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

चाचण्या वाढवणार

राज्यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड व पुणे या सहा जिह्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या जिह्यांत तीन ते आठ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे. चाचण्यांमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असले तरी रुग्णालयात दाखल होणाऱया रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही, पण या सहा जिह्यांत कोरोना चाचण्या कठोरपणे वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारनेही दिल्या आहेत.

सेलिब्रेटी, नेतेही

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेले अनेक सेलिब्रेटी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. या पार्टीत सहभागी झालेल्यांना कोरोनाच्या बीए 4 व बीए 5 या व्हेरियंटचा संसर्ग झाला. राजकीय क्षेत्रातील नेतेही कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही ताप येत आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही असे ते म्हणाले.

मास्कचा वापर अद्याप सक्तीचा केलेला नाही. दंडही आकारण्यात येणार नाही, पण सर्वांनी मास्क वापरावा.

लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी बुस्टर डोस घ्यावा. दुसरा डोस घेतल्यावर नऊ महिने झाले असतील तर त्यांनी बुस्टर डोस घ्यावा.