
ऑस्ट्रेलियन मीडियाने आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच इंग्लिश क्रिकेटच्या ताबुतावर अखेरची माती टाकली. कारणही तसंच होतं. अॅडलेड ओव्हलवर 21 डिसेंबर 2025 रोजी तथाकथित आक्रमक क्रिकेटची गर्जना करणारी इंग्लंड क्रिकेट संघाची ‘बॅझबॉल’ नामक रणनीती अधिकृतरीत्या ‘स्वर्गवासी’ झाली आणि हे निधन इतकं शांत होतं की शोक व्यक्त करणारे ब्रॅण्डन मॅकलम आणि बेन स्टोक्स हे दोघेच होते. बॅझबॉलला वाहिलेल्या या बोचऱया श्रद्धांजलीने इंग्लिश क्रिकेटमध्ये खळबळ माजवलीय. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंडचे रूप कसे असेल, याची चर्चाही सुरू झालीय.
ऑस्ट्रेलियातील एका प्रसिद्ध वृत्तपत्राने सोमवारी आपल्या मागील पानावर बॅझबॉलवर थेट श्रद्धांजलीच छापली. या श्रद्धांजलीत शब्द बोचरे होते, पण वास्तव सांगणारे होते. इन अफेक्शनेट रिमेम्बरन्स ऑफ बॅझबॉल. अर्थात, प्रेमाने आठवण ठेवावी अशी काही गोष्ट उरली होती का, हा प्रश्न वेगळाच! अॅडलेड कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडच्या अडचणी फक्त ड्रेसिंगरूमपुरत्या राहिल्या नव्हत्या. त्या थेट छापील कागदावर उतरल्या. तीन कसोटी सामने, अवघे 11 दिवस आणि अॅशेस हातातून गेली. ऑस्ट्रेलियाने मालिका 3-0 अशी खिशात घातली आणि इंग्लिश संघाची आक्रमकतेची हवा पूर्णपणे काढून टाकली.
या तिसऱया कसोटीत 82 धावांनी झालेला पराभव म्हणजे इंग्लंडच्या अॅशेस स्वप्नावर मारलेला शेवटचा हातोडा ठरला. मोठय़ा नावांचे फलंदाज आले, उतरले आणि परतले. धावफलक पाहता पाहता इंग्लिश चाहत्यांच्या आशाही मावळत गेल्या. संपूर्ण मालिकेत इंग्लंडचा खेळ पाहताना एकच प्रश्न पडत होता, हे कसोटी क्रिकेट आहे की टी-20ची नेट प्रॅक्टिस? चेंडू टिकवण्याऐवजी विकेट्स उडवण्यातच त्यांना जास्त रस. पर्थ असो वा गुलाबी चेंडूचा ब्रिस्बेन कसोटी सामना. संयम नावाची गोष्ट इंग्लिश शब्दकोशातूनच गायब होती.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कसोटी क्रिकेट म्हणजे काय, याचं प्रात्यक्षिकच घडवलं. वेग, अचूकता आणि संयम यांचा सुरेख मिलाफ करत त्यांनी इंग्लिश फलंदाजीची अक्षरशः वाताहत केली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाचा डोलारा ढळला नाही. हेच इंग्लंडसाठी अधिक लाजिरवाणं ठरलं.
सामन्यानंतर बेन स्टोक्सने पराभव मान्य करताना शब्द जपून वापरले, पण वास्तव स्पष्ट होतं, फलंदाजी, गोलंदाजी आणि डावपेच या तिन्ही आघाडय़ांवर इंग्लंड पिछाडीवर होता. आक्रमकतेच्या नादात अनेक संधी गमावल्या गेल्या. हे स्टोक्सला कबूल करायलाच लागलं.
कधी घरच्या मैदानांवर प्रतिस्पर्ध्यांना दडपणाखाली आणणारी बॅझबॉलची रणनीती, परदेशी भूमीवर मात्र स्वतःच्याच संघासाठी ओझं ठरली. त्यामुळेच आज ऑस्ट्रेलियन मीडियाने मिश्किलपणे, पण नेमक्या शब्दांत ती पुरली.
आता प्रश्न एवढाच-बॉक्सिंग डे कसोटीत इंग्लंड खरोखरच धडा घेईल, की बॅझबॉलच्या अस्थींवरच पुन्हा आक्रमकतेचा झेंडा रोवेल?
तोपर्यंत मात्र ऑस्ट्रेलियाने अॅशेस जिंकत इंग्लिश क्रिकेटला एकच संदेश दिला आहे, कसोटी क्रिकेट हे धीराचं-संयमाचं असतं, धुमश्चक्रीचं नव्हे!

























































