बदनामी रोखायची असेल तर फडणवीसांनी आधीच राजीनामा द्यावा – अशोक चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘अजित पवारांकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यांनी कोणत्या जोरावर भाजपला पाठिंबा दिला हे कळतच नाही. त्यांच्यावर नक्कीच कोणता तरी दबाव असणार. पण या दबावतंत्राचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बदनामी रोखायची असेल तर त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा’, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अशोक चव्हाण यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री हवे असल्याचे सांगितले.

‘देशातील राजकारणाचा स्तर भाजपने अत्यंत खालावला आहे. कर्नाटकात आपण पाहिलं की कशाप्रकारे भाजपने आमदार फोडले. तत्त्वांना मोडण्याचे काम भाजपकडून करण्यात येतंय. त्यामुळे भाजपकडून आमदारांचा बचाव करण्यसाठी त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येतंय. जर तसं केलं नाही तर आमदारांना अटक होऊ शकते, त्यांना पैशाचं लालूच दाखवलं जाऊ शकतं’, असं देखील अशोक चव्हाण यांनी आज तकला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

‘शरद पवार यांच्यावर माझा विश्वास आहे. शपथविधी झाल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी परिस्थिती हाताळली ती वाखाणण्याजोगी. त्यांनी सर्व आमदारांना सांगितले की शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती कायम आहे. आम्ही कालच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे यात बदलाव होण्याची काहीच शक्यता नाही. आम्ही 30 तारखेची वाट बघतोय कारण फडणवीस यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे जर फडणवीसांना त्यांची बदनामी रोखायची असेल तर त्यांनी आधीच राजीनामा द्यावा’, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.