सिंधुदुर्ग-कोल्हापूरला जोडणाऱया भैरीची पाणंद घाटासाठी 32 कोटी खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग–कोल्हापूर या दोन जिह्यांना जोडणाऱया भैरीची पाणंद घाटाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या घाट रस्त्याच्या बांधकामासाठी 32 कोटी 36 लाख रुपये खर्च असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत दिली.

या दोन जिह्यांना जोडणाऱया या घाटाचा रस्ता अपूर्णावस्थेत असलेले काम पूर्ण करण्याबाबत कालिदास कोळंबकर, ऍड. आशीष शेलार, प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सिंधुदुर्ग-कोल्हापूर या दोन जिह्यांना सर्वात कमी अंतराने तोडणारा भैरीची पाणंद हा शिवकालीन घाट सिंधुदुर्ग जिह्यातील आंजिवडे व कोल्हापूर जिह्यातल्या भुदरगड तालुक्यातील पाटगावदरम्यान आहे. केवळ साडेचार किमी अंतराच्या या घाटाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

या चर्चेला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, या दोन जिह्यांना जोडणाऱया घाट मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून 5. 110 किमी घाट मार्गाचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. यातील                 4. 110 किमी लांबीचा मार्ग वन क्षेत्राच्या हद्दीतून जातो. त्यापैकी 3.110 किमी लांबीचा रस्ता सिंधुदुर्ग तर 1 किमीचा रस्ता कोल्हापूरच्या हद्दीतून जातो. या घाटरस्त्याच्या बांधकामासाठी 32.36 कोटी रुपये खर्च आहे, पण या घाटमार्गाचे काम कोणत्याही योजनेतून मंजूर झाले नसल्याने अद्याप पूर्ण झालेले नाही. या घाटमार्गाचे काम निधी निकषानुसार प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची योजना असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. या घाटाचे काम मार्गी लागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे टाळंबा धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष बाळा सावंत यांनी लेखी मागणी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.