अशोक चव्हाणांनी तिकिटासाठी 50 लाख घेतले! नांदेडमधील कट्टर समर्थकाचा खळबळजनक आरोप

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी नगरसेवकाचे तिकीट देतो असे सांगून आपल्याकडून 50 लाख रुपये घेतले, असा खळबळजनक आरोप अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि जुने सहकारी भानुसिंह रावत यांनी केला. रावत हे माजी नगरसेवकसुद्धा आहेत. रावत यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेल्यानंतर अशोक चव्हाण यांना भाजपने खासदार केले आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक आहे. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आले. या वेळी त्यांनी अनेक इच्छुकांचे तिकीट कापले. यामध्ये चव्हाण यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक भानुसिंहसह रावत यांचाही समावेश आहे. अशोक चव्हाण यांनी भानुसिंहसह रावत यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी थेट उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण यांनी तिकीट देतो असे सांगून प्रत्येकाकडून 50 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप रावत यांनी केला. प्रभाग क्रमांक 16मधून मी माझ्या मुलासाठी भाजपकडे तिकीट मागितले होते. परंतु कोणतेही ठोस कारण न देता ऐन वेळी तिकीट नाकारण्यात आले. भाजपने आणि अशोक चव्हाण यांनी आमच्यावर अन्याय केला आहे, असेही रावत या वेळी म्हणाले.

आणखी एका समर्थकाचा आरोप

अशोक चव्हाण यांचे आणखी एक समर्थक असलेले माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनीही भाजपच्या महानगराध्यक्षांवर तिकिटासाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला. महिला आघाडीच्या प्रदेश सचिव महादेवी मटपटी यांनीदेखील आरोप केला होता. कट्टर समर्थकांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परंतु यावर अशोक चव्हाण यांनी अद्याप स्पष्टीकरण दिले नाही.

विश्वासू सहकारी म्हणून ओळख

भानुसिंहसह रावत हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. 1980पासून ते चव्हाण यांच्यासोबत होते. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली तेव्हा रावत यांच्यासह 35 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गाडीपुरा प्रभागातून ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एकाच घरातील पती-पत्नी, वडील-मुलगा आदींना उमेदवारी दिल्यावरूनही रावत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.