भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नावावर खूप काही कमावले आणि राजयोग भोगला. महाराष्ट्रातून काँग्रेसला संपवायचा त्यांना प्लॅन होता. बरं झालं आज ते आमच्यात नाहीत, असा टोला कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.
भंडारा-गोंदिया लोकसभेचे काँग्रेस उमेदवार प्रशांत पडोळे यांच्या प्रचाराला जाण्यापूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अशोक चव्हाण आणि वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. अशोक चव्हाण यांना काँग्रेसवर बोलायचा आता अधिकार नाही. त्यांच्या भोकर विधानसभेत त्यांची काय अवस्था आहे? लोक त्यांना येऊ देत नाहीत ही अवस्था आपण बघत आहोत. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोक तुम्हाला माफ करणार नाहीत, असे पटोले म्हणाले.
आंबेडकरांना आघाडी नको होती
समविचारी मतांचे विभाजन टळावे याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू होता; पण त्यांनी आमच्या भूमिकेची वारंवार चेष्टा केली. तरीही काँग्रेसच्या वतीने मी हायकमांडला समजून सांगितले. त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने होतो; पण त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रमध्ये उमेदवार उभे करायचे काम सुरू केले याचा अर्थ त्यांना आघाडी नको होती, असे पटोले म्हणाले.