मराठा आंदोलकांनी अमिता चव्हाण यांचीही गाडी अडवली

नुकतेच भाजपमध्ये आलेले खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाणांना कोंढाच्या ग्रामस्थांनी वेशीवरूनच परत पाठवले होते. अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे मराठा आंदोलकांनी गावात प्रवेश करू दिला नाही. आंदोलकांचा रोष पाहून त्यांनाही आल्यापावली परत जावे लागले.

भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे काल सकाळी त्यांच्याच मतदारसंघातील कोंढा येथे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांना गावात येण्यास मज्जाव केला. आंदोलकांचे उग्र रूप पाहून पोलिसांनी अशोक चव्हाणांना बंदोबस्तात गावाबाहेर काढून दिले. सोमवारी रात्रीच अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनाही मराठा आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला. अमिता चव्हाण या प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारासाठी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे गेल्या होत्या. मात्र त्यांची गाडी गावात शिरताच मराठा आंदोलकांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला.