भाजपच्या शिस्तीचा पर्दाफाश झाला आहे! सत्तास्थापनेतील विलंबामुळे अशोक गेहलोत यांची टीका

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी अद्याप मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झालेली नाही. 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले असून आता त्याला सहा दिवस उलटून गेले आहेत. तरीही अद्याप राजस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या नावाविषयी स्पष्टता झालेली नाही. याच विलंबावरून राजस्थानचे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी भाजपच्या शिस्तीचा पर्दाफाश झाल्याची टीका केली आहे.

गेहलोत यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या शिस्तीचा खरा चेहरा उघड होत आहे. जो पक्ष सहा दिवस उलटले तरी मुख्यमंत्री कोण हे निश्चित करू शकत नाही, तो पक्ष आपल्या पक्षांतर्गत शिस्तीच्या गमजा करतो. हेच जर काँग्रेसकडून झालं असतं तर भाजप नेत्यांनी आमच्यावर अंतर्गत वाद आणि फुटीचा आरोप केला असता. पण आता मी विचारतो की इतका उशीर का केला जातोय? सहा दिवसांनंतरही भाजप राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा का करत नाही? नेमकं काय कारण आहे? असे प्रश्न गेहलोत यांनी विचारले आहेत.

ते पुढे म्हणाले की, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येसाठीही मला केंद्र सरकारला पत्र लिहून हे सांगावं लागलं की आम्हाला या प्रकरणाच्या एनआयए तपासणीवर काहीही आक्षेप नाहीत. वास्तविक हे काम नवीन मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं. पण, नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपर्यंत गव्हर्नर साहेबांनी मला काळजीवाहू मुख्यमंत्री बनवून ठेवलं आहे, म्हणून मलाच हे काम करावं लागलं. माझी इच्छा आहे की भाजपने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असंही गेहलोत म्हणाले.