
महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याला 17 मार्चला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्यावर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे 8 तर आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आज एसआयटी चौकशी समितीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली. तसेच या प्रकरणातील पीडितांबाबत गोपनीयता आणि त्यांच्या संरक्षणासाठी सोशल मीडियातून पीडितांचे व्हिडीओ हटवण्यात आले आहेत. यामध्ये 4650 लिंकदेखील काढल्याची माहिती त्यांनी दिली.
महिला लैंगिक अत्याचारातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीकरिता तीन आठवडय़ांपूर्वी नेमण्यात आलेल्या एसआयटी चौकशी समितीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणातील कारवाईची माहिती दिली. अशोक खरातला पहिल्या गुह्यात 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसऱ्या गुह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खरात प्रकरणात 20 मार्चपासून एसआयटीने तपास सुरू केला आहे. एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. सदर विशेष तपास पथकामध्ये दोन पोलीस उपाधीक्षक, तीन सहाय्यक तपास अधिकारी, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 जणांचे पथक तपासासाठी कार्यरत आहे.
…तर अधिकाऱ्यांवरही कारवाई
प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य कोणत्याही अधिकाऱ्याने भोंदू खरातला गुह्यात सहाय्य केल्याचे पुराव्यानिशी निष्पन्न झाले, तर त्या अधिकारी, पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही सातपुते यांनी स्पष्ट केले. संपूर्ण कारवाईची माहिती महत्त्वाच्या टप्प्यांवर दिली जाईल. मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत गोपनीयता पाळावी लागेल, असे त्या म्हणाल्या.
451 अकाऊंट बंद, सहा जणांना अटक
खरात प्रकरणाचा तपास सुरू असताना गोपनीयतेचा भंग करून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी 451 अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत. तसेच पीडिताचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस ठाणे अहिल्यानगर या ठिकाणी दोन गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.





























































