
कसदार अभिनय आणि लाजवाब कॉमिक टायमिंगच्या जोरावर अभिनेते अशोक सराफ यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळखून हसवले. 4 जूनला त्यांनी पंच्याहत्तरीत पदार्पण केले आहे. यानिमित्ताने ‘‘सगळ्यांच्या आयुष्यात आनंद वाटणारा श्रीमंत’’ अशी पोस्ट करत ‘सही’ अभिनेता भरत जाधव याने खास अंदाजात लाडक्या अशोक मामांना शुभेच्छा दिल्या आहेत.
चित्रपटाच्या सेटवरचा थ्रोबॅक फोटो शेअर करत भरतने म्हटलेय, ‘‘हिरो म्हणून करिअरचा पहिलाच सिनेमा ‘चालू नवरा भोळी बायको’ आणि समोर सहकलाकार होते दस्तुरखुद्द अशोक सराफ! सुरुवातीला जाम टेन्शन आले होते, पण त्यांनी सहजपणे आपलंसं केलं. जितक्या सहजतेने गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. त्यांच्याबद्दल लिहावं बोलावं तितकं कमीच आहे.’’
पुढे भरतने लिहिलंय, ‘‘त्यांच्या ‘आयत्या घरात घरोबा’ सिनेमातला शेवटचा सीन खूप सुंदर आहे. हातातली छत्री गोल गोल फिरवत जाणाऱया अशोक मामांकडे बोट दाखवत सचिनजी म्हणतात, ‘‘बघितलंस मधुरा, सर्वांच्या आयुष्यात आनंद वाटून जगातला सर्वात मोठा श्रीमंत चाललाय!’’ खूप खरं आहे ते… अशोक मामा तुमच्यासारखा श्रीमंत माणूस शोधूनही सापडणार नाही.’’
माझ्यासाठी सबकुछ!
सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर करत निवेदिता सराफ म्हणतात, ‘‘प्रिय अशोक… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मी माझ्या मागील आयुष्यात काहीतरी चांगले केले असावे म्हणूनच तू मला माझा नवरा म्हणून लाभलास. तू माझे सामर्थ्य, माझा गुरू, माझा जिवलग मित्र, माझे पालक, माझा सर्वकाही आहेस. तू एक सर्वेत्कृष्ट अभिनेत्यासोबतच एक चांगला माणूस आहेस!’’
























































