
>> आशुतोष बापट
होयसळ राजघराण्यातील विष्णुवर्धन राजाने चोळांवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ बेलूरचे सुप्रसिद्ध ‘चेन्नकेशव’ मंदिर बांधले. वेसर स्थापत्यशैलीतील हे मंदिर शिल्पकलेचा अजोड नमुना आहे. मंदिराच्या खांबाच्या कोपऱयावर कोरलेल्या चार पुत्तलिकांपैकी एक आहे नृत्यमुद्रेतील राणी शांतलादेवी.
इ.स.च्या 10 ते 14 व्या शतकातले दक्षिण भारतातले एक प्रबळ राजघराणे म्हणजे होयसळ राजघराणे होय. ते मुळात कल्याणी चालुक्यांचे मांडलिक राजे होते. पुढे स्वतच्या सामर्थ्यावर त्यांनी स्वतंत्र साम्राज्य निर्माण केले. होयसळ हे कलेचे भोत्ते होते. धार्मिक बाबतीत सहिष्णू होते. मुळात हे घराणे जैन धर्माचे अनुयायी होते. मात्र पुढे रामानुजाचार्यांच्या संपर्क आणि प्रभावामुळे होयसळ नरेश बिट्टीदेव याने वैष्णव धर्म स्वीकारला. रामानुजाचार्यांनी या बिट्टीदेवाचे नामकरण ‘विष्णुवर्धन’ असे केले. आधी बेलूर आणि नंतर हळेबिडू ही होयसळांची राजधानी होती. बेलूरचे सुप्रसिद्ध ‘चेन्नकेशव’ मंदिर हे याच विष्णुवर्धन राजाने चोळांवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ बांधलेले आहे.
कर्नाटकातील हसन या जिह्यात वसलेले हे मंदिर होयसळ राजा विष्णुवर्धन याने इ.स. 1117 मध्ये बांधायला सुरुवात केली. आदल्याच वर्षी म्हणजे सन 1116 साली झालेल्या तलक्कड इथल्या लढाईत त्याने चोळांवर मोठा विजय मिळवला होता. त्या विजयाप्रीत्यर्थ या राजाने हे देखणे विष्णुमंदिर उभारले. ‘चेन्न’ म्हणजे सुंदर. सुंदर अशा केशवाचे हे मंदिर ‘विजयनारायण मंदिर’ या नावानेसुद्धा ओळखले जाते. चोळांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक हे कारण या विजयनारायण नावामागे असावे. होयसळांच्या मंदिरांची खासीयत म्हणजे तारकाकृती रचनेचा आकृतिबंध, मंदिर एका जोत्यावर उभारणे आणि मंदिरावर भरगच्च शिल्पकला ही होय. बेलूर, हळेबिडू, सोमनाथपूर इथल्या मंदिरांवर ही लक्षणे प्रकर्षाने दिसून येतात. होयसळांच्या मंदिर स्थापत्याचे अजून एक ठळक लक्षण म्हणजे यांच्या मंदिरावर असलेले ‘वेसर’ शैलीचे शिखर हे होय. वेसर ही नागर आणि द्राविड या दोन शैलींच्या मिश्रणातून तयार झालेली शैली आहे. मंडपाच्या मधोमध चौकोनी रंगशिळा असून त्यावर कोरलेले छत म्हणजे सीलिंग हा तर प्राचीन कोरीव शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणायला हवा. या गोलाकार छताचा व्यास हा जवळपास 10 फूट, तर त्याची खोली 5 ते 6 फूट एवढी असून ते सगळे छत अत्यंत सुंदर मूर्तींनी घडवले आहे. छताचे झुंबर कमळाच्या आकाराचे असून त्यावर नरसिंह कोरलेला आहे. छत ज्या चार खांबांवर तोलून धरले आहे, त्या चारही खांबांच्या कोपऱयावर पुतलिका/अप्सरा कोरल्या आहेत आणि हेच इथले मोठे आकर्षण आहे. या चार पुतलिकांपैकी एक स्वत राणी शांतलादेवी आहे. राणी इथे नृत्यमुद्रेत दाखवली असून तिच्या पायाशी वादक कोरले आहेत. ही राणी आहे कशावरून, तर या चार पुतलिकांपैकी फक्त राणीच्या डोक्यावर मुकुट दाखवला आहे. तिच्या हातात कोपरापर्यंत बांगडय़ा, गळ्यात हार आहे. सगळे राजेशाही घटक राणीच्या मूर्तीत दाखवले आहेत. बाकी तीन अप्सरांच्या डोक्यावर मुकुट नाही. राणी शांतलादेवी ही स्वत नृत्यात निपुण होती. ऐन रंगशिळेवर राणीची मूर्ती कोरणे किती समर्पक, सुंदर आहे हे इथे या मंडपात आल्यावर समजते.
बेलूरचे चेन्नकेशव मंदिर आणि तिथली राणी शांतला हिची नृत्यमूर्ती खूप देखणी आणि महत्त्वाची आहे. या राणीची माहिती घेऊ लागलो की, खूप काही रंजक गोष्टी समोर येतात. राणी शांतला ही होयसाळांच्या एका सरदाराची लावण्यवती लेक. ती उत्कृत्ष्ट नृत्यांगना होती. हिचा विवाह राजा विष्णुवर्धनाशी व्हावा अशी राजाच्या आजीची इच्छा होती. त्यासाठी तिने ठरवून हिच्या नृत्याचा कार्यक्रम राजासमोर आयोजित केला, जेणेकरून राजा हिच्या प्रेमात पडावा आणि त्याने हिच्याशी लग्न करावे आणि झालेही तसेच. ते देखणे नृत्य बघून राजा भारावून गेला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घातली. शांतलेने ही मागणी अमान्य केली. तिच्या मते हे नृत्य तिने एकटीने केले नसून तिच्या समवेत तिची सखी लक्ष्मीसुद्धा सहभागी होती आणि शिवाय शांतला धर्माने जैन होती, तर राजा वैष्णव. राजाने तिच्यासह तिची सखी लक्ष्मी आणि त्याबरोबर तिच्या धर्मातील इतर पाच मुलींशी लग्न केले. मात्र राजाने शांतला हिलाच पट्टराणी म्हणून मान्यता दिली. शांतला राणीने बेलूरच्या परिसरात मंदिरे बांधली आहेत. शांतलेचे माहेर बळ्ळीगावी इथले. तिने त्या गावी केदारेश्वराचे सुंदर देवालय बांधले आहे.
मात्र शांतलेला काही पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे तिने राजापुढे प्रस्ताव मांडला की, तिचे पट्टराणीपद काढून ते तिची सखी लक्ष्मी हिला द्यावे आणि लक्ष्मीला होणारा मुलगा पुढे राज्याचा अधिकारी व्हावा. राजा विष्णुवर्धनाचे शांतलेवर नितांत प्रेम होते. त्याने तिचा हा प्रस्ताव नाकारला. पुढे जेव्हा लक्ष्मी गर्भवती राहिली तेव्हा शांतलेने एक मोठा निर्णय घेतला. ती बंगळुरूजवळ असलेल्या शिवगंगा टेकडीवर गेली आणि तिथून खाली उडी घेऊन तिने आत्महत्या केली. एका सुंदर, लावण्यवती आणि नृत्यनिपुण राणीचा असा दुर्दैवी अंत झाला. काही अभ्यासकांच्या मते राणीने जैन धर्माचे संलेखना व्रत स्वीकारले आणि याद्वारे जैन धर्माच्या अनुयायांना मुक्तीकडे जाण्याचा मार्ग स्वतच्या त्यागाने दाखवून दिला.
बेलूर किंवा हळेबिडू इथली होयसळ मंदिरे बघताना राणी शांतला वारंवार मूर्तिरूपे भेटत असते. राणीच्या आरस्पानी सौंदर्यामागे लपलेली एक करुण छटा त्या मूर्तीतूनही आपल्याला जाणवेल. आजही बेलूरच्या लोकांच्या मनात राणी शांतला जिवंत आहे. आजही राणी या मंदिरांचे रक्षण करते आहे अशी या लोकांची गाढ श्रद्धा आहे. श्रद्धा अपार असतात त्यांना सीमा नसते हेच खरे.