
>> आशुतोष बापट
वैदिक साहित्य किंवा रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये यातून ‘इहामृगे’ ही संकल्पना कशी डोकावते याचे थोडे थोडे विस्कळीत का होईना, पण काही संदर्भ आपण गेल्या लेखात बघितले. आज आपण मूर्तिशास्त्र किंवा मंदिर स्थापत्यातून ही संकल्पना कशी दृग्गोचर होते आहे हे बघणार आहोत.
मूर्तिशास्त्र किंवा मंदिर स्थापत्य या विषयांचे विवेचन करणारे ग्रंथ आहेत. या ग्रंथांतूनही ही संकल्पना डोकावताना दिसते. यातले ‘रायपसेनिया’ किंवा ‘समरांगणसूत्रधार‘ हे ग्रंथ अशा संयुक्त प्राण्यांविषयी बरीच माहिती देतात. ‘रायपसेनिया’ हा ग्रंथ स्थापत्यशास्त्र, त्यातल्या संज्ञा, संकल्पना याविषयी बोलताना इहामृगाचा उल्लेख करतो. त्यातील उल्लेखानुसार कोणा सूर्यभदेवाचा राजवाडा सर्व बाजूंनी तटबंदीच्या विविध पदरांनी वेढलेला होता. सुंदर भिंतींचे कोन विविध सजावटीने मढवलेले होते. राजवाडय़ाच्या प्रत्येक दिशेला एकेक दार होते. त्यावर घुमटाकार छत होते आणि त्या घुमटाकार छतावर ‘इहामृग’, बैल, उसभ, घोडे, माणसाच्या तोंडाचा घोडा, नर-तुरंग, पक्षी, मगरी, किन्नर अशा विविध प्रतिमांचे शिल्पांकन केलेले होते.
विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो. ‘पाण्यावर उडय़ा मारत जाणारा मातंगमकर’ असा एक उल्लेख रघुवंशात आलेला आहे.
त्यानंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या ‘अपराजितपृच्छा’ या शिल्पग्रंथात तर 16 व्याल आणि त्या प्रत्येकाचे 16 प्रकार असे एकूण 256 प्रकार दिलेले आहेत. इ.स.च्या 9 व्या शतकात लिहिलेला ‘धनंजय नाममाला’ हा ग्रंथसुद्धा ‘इहामृग’ किंवा व्याल या संकल्पनेबद्दल विविध दाखले देऊन बरीच माहिती देतो. प्राचीन काळी ‘इहामृग’ हा शब्द कुणा चमत्कारिक किंवा लक्षवेधक अशा प्राण्यांबद्दल वापरला जायचा. परंतु गुप्तकाळापासून ‘व्याल’ हा शब्द जास्त प्रचलित झाल्याचे दिसते. व्यालांच्या अनेक प्रतिमा, त्यांचे आकार, त्यांची प्रारूपे जसजशी निश्चित होत गेली, तसतसे स्थपती, अभियंते, मूर्तिकार, चित्रकार, हस्तिदंत कलाकार यांनी त्यांचा मोठय़ा प्रमाणावर आपापल्या कलेत वापर सुरू केला. प्राचीन हिंदुस्थानी कला सजवण्यासाठी वापरले जाणारे विविध आकृतिबंध इतक्या विपुल प्रमाणात आहेत आणि ते पारंपरिकरीत्या एवढे सुरेख जोपासले आहेत की, या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्याला लाकूड, माती, हस्तिदंत, मौल्यवान खडे यांपासून घडवलेल्या कलेमध्ये पडलेले दिसते. आश्चर्याची बाब म्हणजे हिंदुस्थानी कलेत दिसणारे हे असे कलेचे प्रारूप पश्चिम आशियाई कलेमध्येसुद्धा दिसून आलेले आहेत. याबाबतीत श्री. कुमारस्वामींचे निरीक्षण असे आहे की मौर्य, शुंग आणि प्राचीन आंध्र कलेत आढळणारे असे आकृतिबंध हे हिंदुस्थानी कलेवर झालेल्या ग्रीक प्रभावाच्या कितीतरी पूर्वीपासूनचे आहेत. या आकृतिबंधांचे पश्चिम आशियाई कला म्हणजे सुमेरियन, हिटाईट, असीरियन, मायकेनियन, ाsढटन, ट्रोजन, लायकियन, फिनिशियन, अॅकिमेनिड आणि सिथियन कलेशी आणि त्यातल्या आकृतिबंधांशी साम्य दिसते. यावरून प्राचीन हिंदुस्थानी कला किती समृद्ध, संपन्न आणि निरनिराळ्या आकृतिबंधांच्या रूपाने केवढी श्रीमंत होती याची आपल्याला जाणीव होते.
या आकृतिबंधांची एक छोटीशी झलक बघितली तर त्यात पंख असलेले सिंह, सेंटॉर्स, ग्रीफिन्स, ट्रायटन असे काही पौराणिक दानवसुद्धा दिसून येतात. अशा संयुक्त प्राण्यांचे शिल्पांकन मोठय़ा प्रमाणात प्राचीन कलेत दिसते. अनेकदा पानाफुलांच्या महिरपी करून त्यात या प्राण्यांचे शिल्पांकन केलेले असते. कलेचा एकूण प्रवास बघता नंतरच्या काळात आकाशगामी प्राणी किंवा आकाशगामी माणसं दिसू लागतात. आकाशगामी माणसांना ‘विद्याधर’ म्हटले जाते. आपल्याला अनेक मंदिरांमधून किंवा लेणींमधील शिल्पपटात हे विद्याधर दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱयाच्या द्वारशाखेवर हे विद्याधर शिल्पांकित केलेले दिसतात. हिंदुस्थानी कलेवर बाह्य कलांचा म्हणजेच इतर संस्कृतींचा प्रभाव पडणे स्वाभाविक होते आणि तसा प्रभाव पडलेला दिसूनही येतो. हिंदुस्थानी कलेने बाह्य घटकांना अगदी सहज आपल्यात सामावून घेतले. पण सरसकट त्यातल्या सगळ्या गोष्टी न घेता काही ठरावीक गोष्टीच आपल्या कलेत सामावून घेतल्याचे जाणवते. हिंदुस्थानी कलेची प्रेरणा किंवा त्याचे प्रयोजन समजून घेण्यासाठी वैदिक, पौराणिक साहित्य तसेच तत्कालीन लोककलांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. असा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणी शिल्पांकित केलेले व्याल म्हणजेच संयुक्त प्राणी अभ्यासले पाहिजेत. त्यासाठी सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा तसेच गांधार इथली शिल्पकला आणि अजिंठा इथली भित्तिचित्रे म्हणजे एक मोठे भांडार आहे.





























































