
>> प्रा. आशुतोष पाटील
एकशे सत्तावीस वर्षे परदेशात असलेल्या बुद्धांच्या शरीरधातू आणि रत्नधातूंचे भारतात पुनरागमन झाले असून ‘द लाइट अँड द लोटस ः रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ या प्रदर्शनात ते प्रथमच प्रदर्शित करण्यात आले. या प्रदर्शनाने पिपरहवा येथील अवशेषांचा विस्तृत इतिहास, वसाहतवादी काळातील घटनाक्रम, जागतिक प्रयत्न आणि भारतीय सांस्कृतिक आत्मभान यांचा सुरेख संगम घडवून आणला आहे.
दिल्लीतील 12 व्या शतकातील ऐतिहासिक रायपीठोरा किल्ल्याच्या परिसरात नुकतेच भरलेले ‘द लाइट अँड द लोटस ः रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन’ हे प्रदर्शन केवळ एक पुरातत्त्वीय प्रदर्शन नाही, तर भारतीय संस्कृती आणि बौद्ध वारशाच्या पुनरुज्जीवनाचा एक ऐतिहासिक क्षण ठरले आहे. जवळपास एकशे सत्तावीस वर्षे परदेशात राहिलेल्या बुद्धांच्या शरीरधातू आणि रत्नधातूंचे भारतात पुनरागमन झाले असून ते सर्वसामान्यांसाठी प्रथमच प्रदर्शित करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिह्यातील पिपरहवा गाव हे लुंबिनीच्या (बुद्धाच्या जन्मस्थानाच्या) अगदी समीप असून प्राचीन कपिलवस्तूच्या राजधानीशी निगडित मानला जातो. इ.स. 1898 साली या ठिकाणी ब्रिटिश संपत्ती व्यवस्थापक विल्यम क्लॅक्सन पेप्पे यांनी आपल्या मालकीच्या जागेत असलेली एक महत्त्वाची टेकडी उत्खनित केली. अठरा फूट खोलीपर्यंत जात बांधलेल्या विटांच्या भिंती भेदून तेथे पेप्पे यांना एक विशाल दगडी पेटी सापडली, ज्यामध्ये बुद्धाच्या अस्थिधातूचा संचय होता. या अस्थिधातूच्या एका करंडकावर ब्राह्मी लिपीत शिलालेखही होता, त्यावर ‘सुकिती-भतिनाम सभागिनीकनाम सा-पुता-दलनम् इयं सलिला-निधानं बुधासा भगवते सकियानम्’ असे लिहिलेले होते, ज्याचा अर्थ ‘शाक्य कुळातील भगवान बुद्धांच्या अस्थींचा निधी हा सुकीर्तीचे बंधू, भगिनी, पुत्र आणि पत्नी यांनी दिलेले दान आहे.’ या लेखामुळे हे धातू बुद्धांचे आहेत हे स्पष्ट झाले.
शरीरधातू, रत्न, सुवर्ण अलंकार, क्रिस्टलच्या दागिने, त्रिरत्न आणि अन्य मूल्यवान वस्तूंसह या पेटीत पंधराशेहून अधिक वस्तू होत्या, ज्या बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर त्यांच्या शाक्य कुळीयांनी पवित्रतेने प्रतिष्ठापित केलेल्या असाव्या. यावरून हे अवशेष केवळ धार्मिक परंपरेचे नाही, तर आसपास असलेल्या कपिलवस्तूच्या ऐतिहासिकतेचेही प्रमाण बनले. 1899 साली पेप्पे यांनी या अवशेषांचा एक भाग सियामचे (आताचे थायलंड) राजा राम पंचम यांना भेट दिला, जे त्या वेळी एकमेव जिवंत बौद्ध राजा होते. राजा राम पंचम यांनी मौर्य सम्राट अशोकाची प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित करून बुद्धधातूंचे विभाजन केले – काही भाग म्यानमारला, काही श्रीलंकाला, काही जपानला, तर बहुसंख्य बँकॉकमधील स्वर्णिम पर्वत पगोडामध्ये प्रतिष्ठापित केला. बाकीचे धातू आणि रत्न भारतीय संग्रहालयांमध्ये ठेवले आणि काही पेप्पे कुटुंबाकडे राहिले.
वसाहतवादी कालखंडातील या विभाजनामुळे बुद्धधातू संपूर्ण विश्वव्यापी पसरून गेले – काही भाग लंडन, काही भाग कोलकाता येथील संग्रहालयात, काही भाग बँकॉक आणि पेप्पे कुटुंबाकडे खासगी संग्रह म्हणून. या दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीत एका अवशेषला, एका आध्यात्मिक चिन्हला वेगवेगळ्या ठिकाणी ‘पुरातत्त्वीय वस्तू’ म्हणून पाहिले जाऊ लागले. इ.स. 1900 साली पेप्पे परत लंडनला जाताना त्याच्याकडील अस्थिधातू सोबत घेऊन गेले.
1971 ते 1973 या कालावधीत पिपरहवाला के एम श्रीवास्तव यांनी पुन्हा एकदा उत्खनन केले आणि काही नवीन माहिती समोर आली. त्यांच्या मतानुसार हा स्तूप तीन टप्प्यांमध्ये बांधला गेला, ज्याची सुरुवात बुद्धाच्या परिनिर्वाणाच्या नंतर म्हणजे इ.स.पूर्व 480 च्या सुमारास झाली असावी. दुसरा टप्पा होता इ.स.पूर्व तिसऱया शतकातला जो, पेप्पे यांनी उत्खनित केला होता व तिसऱया टप्प्यात स्तुपाची उंची वाढवण्याबरोबरच आजूबाजूला विहारांची बांधणी झाली. या तिसऱया टप्प्याचा काळ निश्चित नसला तरी तो कुशाण काळ असावा. श्रीवास्तव यांना उत्खननात अनेक टेराकोटा सिलिंग्ससोबत ‘कपिलवस्तू’ असा लेख असलेले भांडेदेखील मिळाले होते, ज्यावरून ही जागा कपिलवस्तूशी संबंधित असावी असे म्हणता येते.
पिपरहवा हे महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ नंतर काहिसे विस्मरणात गेले, पण मे 2025 मध्ये काही असे घडले की, पुन्हा सर्व जगाचे लक्ष या पिपरहवाच्या बुद्धांच्या शरीरधातूंवर गेले. हाँगकाँग देशातील नामवंत लिलाव कंपनी सोथेबी’सने पेप्पे यांच्या संग्रहातील बुद्धांचे अस्थीधातू लिलावासाठी आणले ही एक खळबळजनक घटना होती. मे 2025 मध्ये जेव्हा या ‘पिपरहवा जेम्स’ (पिप्रहवा रत्नधातू) विक्रीसाठी आले, तेव्हा भारतीय संस्कृती मंत्रालय, बौद्ध संघटना, पुरातत्त्ववेत्त्यांकडून व्यापक प्रतिरोध झाला.
मे 5, 2025 रोजी भारतीय संस्कृती मंत्रालयाने सोथेबी’स व पेप्पे कुटुंबाला कायदेशीर नोटीस पाठवली. ज्यात ‘तातडीने नीलाम बंद करावा आणि हे अस्थीधातू भारताकडे परत करावे’ अशी मागणी करण्यात आली. भारतीय दूत, युनेस्कोचे प्रतिनिधी, विविध बौद्ध संस्थांचा समर्थन आणि मीडियाचा दबाव असे तत्काळ प्रयत्न झाले. मे 6-7, 2025 रोजी सोथेबी’सने नीलाम रद्द करण्याचा निर्णय घेतला. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप या मुंबई आधारित कंपनीने निर्णय घेऊन या रत्नधातूंचा संपूर्ण संग्रह खरेदी केला आणि तो भारत सरकारला समर्पित केला. जुलै 2025 मध्ये हे अमूल्य धातू हाँगकाँगहून नियमित व्यावसायिक विमानामधून मायदेशी परत आले- एकशे सत्तावीस वर्षांनी वसाहतवादाची साखळी तुटली आणि भारतीय अस्मितेचे चिन्ह पुन्हा मायदेशी आले.
4 जानेवारी 2026 पासून हे गौतम बुद्धांचे अस्थीधातू किला रायपिठोरा, दिल्ली या ठिकाणी सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आलेले आहेत. या प्रदर्शनामध्ये मध्यभागी सांची स्तूपाची प्रतिकृती तयार केलेली असून तिच्या अंतर्भागात पिपरहवा बुद्धधातू, क्रिस्टलच्या पेटय़ा आणि मूळ दगडी पेटी योग्य अशा प्रकाशयोजनासह मांडलेली आहेत. सभोवताली ऐंशीहून अधिक वस्तू – बुद्धमूर्ती, हस्तलिखिते, चित्र मांडलेली आहेत. जे सहाव्या शतकाच्या ईसापूर्व काळापासून आजपर्यंत बौद्ध संस्कृतीचे विकास दाखवतात. या सर्वांचे ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण असल्याने हे सर्व समजून घ्यायला अधिक सोपे जाते.
शासनाने देशातील महत्त्वाच्या स्थळी या बुद्धधातूंचे प्रदर्शन केल्यास सर्वांना पिपरहवाचे हे अस्थिधातू पाहण्याची संधी मिळेल.
[email protected]
(लेखक पुरातत्त्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)




























































