शहापूरच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अश्विनी अधिकारी, सुभाष विशे उपनगराध्यक्षपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शहापूर

शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या अश्विनी अधिकारी यांची फेरनिवड तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे गटनेते सुभाष विशे यांची निवड झाली आहे. याकेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लेष केला.

अडीच वर्षांपूर्वी शहापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या योगिता धानके या शहापूरच्या पहिल्या नगराध्यक्ष झाल्या. दरम्यानच्या काळात धानके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ६ नोव्हेंबर २०१७ रोजी शिवसेनेच्या अश्विनी अधिकारी यांचीदेखील बिनविरोध नगराध्यक्षा म्हणून निवड झाली होती. नगराध्यक्षपदाचे आरक्षण फक्त अडीच वर्षांच्या कालावधीकरिता म्हणजेच २९ मेपर्यंतच होते. त्यामुळे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची आज निवडणूक घेण्यात आली.

शिवसेनेचे बहुमत असलेल्या या नगरपंचायतीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी अन्य कोणाचेच अर्ज न आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. नगराध्यक्षा अश्विनी अधिकारी यांना फक्त सात महिन्यांचाच कालावधी मिळाल्याने त्यांची नगराध्यक्षपदासाठी फेरनिवड झाली तर उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे गटनेते सुभाष विशे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी काम पाहिले. यावेळी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे तालुकाप्रमुख मारुती धिर्डे आणि उपजिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी अभिनंदन केले.