मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे, मेट्रो रेल्वेचाही अतिरिक्त कार्यभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने आज त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. या नियुक्तीने मुंबई महापालिका आयुक्त पदाचा बहुमान मिळालेल्या भिडे या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. त्यांनी आज भूषण गगराणी यांच्याकडून महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

भूषण गगराणी हे आज सेवानिवृत्त झाले. गगराणी यांच्या निवृत्तीनंतर मुंबई महापालिका आयुक्त पदाची धुरा कुणाकडे सोपवली जाणार याविषयी उत्सुकता होती. महापालिका आयुक्त पदासाठी तीन ते चार ज्येष्ठ सनदी अधिकाऱयांची नावे चर्चेत होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर भिडे यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हाच अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले होते.

मी माझ्या घरी परतले!

मुंबई महापालिकेत आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली आहे. मी माझ्या घरी परतले आहे. चार वर्षे मी येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले. कोविडसारख्या कठीण काळात येथे काम करण्याची मला संधी मिळाली. आता आयुक्त म्हणून शहरासाठी अधिक चांगले काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे अश्विनी भिडे म्हणाल्या.

महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या

भारतीय प्रशासकीय सेवेतील 1995च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या भिडे यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई मेट्रो रेल  महामंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना चालना दिल्यामुळे भिडे या ‘मेट्रो वुमन’ म्हणून ओळखल्या जातात. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात अश्विनी भिडे यांची नियुक्ती केली होती.

मेट्रोचीही जबाबदारी

अश्विनी भिडे यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या  व्यवस्थापकीय चालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.