
आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर हिंदुस्थानने अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांत 2 बाद 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानची फलंदाजी हिंदुस्थानच्या गोलंदाजीसमोर पत्त्यांप्रमाणे कोसळली. अफगाणिस्तानला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 111 धावा करता आल्या.
पॉवरप्लेमध्येच अफगाणिस्तान संघाने 5 विकेट गमावल्या. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमारने पाच विकेट घेतल्या. अफगाणिस्तानचे सलामीवीर पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतले. हजरतुल्ला जझाई (0) आणि रहमानउल्ला गुरबाज (0) हे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. दोन धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर भुवीने करीम जनातला बाद केले. यानंतर नजीबुल्ला झदरनलाही खाते उघडता आले नाही. अर्शदीप सिंगने कर्णधार मोहम्मद नबीला बाद करून अफगाणिस्तानला पाचवा धक्का दिला. भुवनेश्वरने आपल्या तिसऱ्या षटकात अजमतुल्ला ओमरझाईला बाद करून अफगाणिस्तानची सहावी विकेट घेतली. दीपक हुडाने राशिद खानला बाद केले. राशिदने 19 चेंडूत 15 धावा केल्या.




























































